सीमावादाचे पडसाद! कर्नाटक-महाराष्ट्र एसटी सेवा ठप्प! 

सीमावादाचे पडसाद! कर्नाटक-महाराष्ट्र एसटी सेवा ठप्प! 

मुंबई : महाराष्ट्र एकीकरण समितीबाबत कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या नेत्याने केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि बेळगावात कन्नड संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केल्यानंतर त्याचे पडसाद दोन्ही राज्यांत उमटले. त्यामुळे कर्नाटक सीमा भागातून महाराष्ट्रात ये-जा करणारी एसटी सेवा रविवारी (ता. 29) दुपारपर्यंत ठप्प झाली होती. या वादाचा कोल्हापूर आणि सांगली विभागाला सर्वाधिक फटका बसला असून, सुमारे 400 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. 

महाराष्ट्र एकीकरण समितीबाबत वादग्रस्त वक्तव्यानंतर दोन्हीकडून आरोपांच्या फैरी सुरू झाल्याने राज्याच्या एसटी सेवेला फटका बसला. सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही राज्यांतील एसटी सेवा रविवारी दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही राज्यांत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. कोल्हापूर विभागातील 300; तर सांगली विभागातील 100 अशा सुमारे 400 पेक्षा जास्त फेऱ्या रद्द करण्यात आल्या. 

महामंडळाचे लाखोंचे नुकसान 
महाराष्ट्रातही शिवसेनेने कर्नाटक नवनिर्माण सेनेविरोधात आंदोलनाची हाक दिली असताना, सीमाभागातही दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. त्यामुळे एसटीचे नुकसान टाळण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. परिणामी, दोन विभागातील शेकडो फेऱ्या रद्द झाल्याने महामंडळाला लाखो रुपयांच्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. सीमाभागातील वातावरण निवळत नाही, तोपर्यंत या फेऱ्या रद्द ठेवणार असल्याचे एसटी महामंडळ प्रशासनाने सांगितले. 

कोल्हापूर विभागामध्ये दुपारी 2 वाजेपर्यंत 231 फेऱ्या रद्द केल्या. त्यानंतर संध्याकाळपर्यंतचे अपडेट मिळू शकले नाही. त्यामुळे यामध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे. 
- रोहन पलांगे, विभाग नियंत्रक, कोल्हापूर 

सांगली विभागामध्ये दुपारपर्यंत 50 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. मिरज आणि जत या बस स्थानकांवरून कर्नाटक सीमा भागात या बस जातात. 
- अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक, सांगली 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com