तुमची मूलं संकटात आहे? असतील तर या नंबरवर करा कॉल..! 

child image.png
child image.png

औरंगाबाद : काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या मदतीसाठी २४ तास तत्पर असलेली ‘चाइल्डलाइन’ बालकांसाठी मोलाची कामगिरी बजावत आहे. देशभर आणि प्रत्येक राज्यात कुठल्याही बालकांना कुठलीही मदत सहजपणे उपलब्ध होत आहे. असे असले तरीही अनेक प्रकरणे मात्र चाइल्डलाइनपर्यंत पोचतच नाहीत. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनीही जागरूक राहून बालकांच्या मदतीसाठी हात पुढे करण्याची गरज आहे. 

महिला बालकल्याण विभाग आणि चाइल्ड इंडिया फाउंडेशन मुंबई यांच्यातर्फे चाइल्डलाइन टोल-फ्री (क्रमांक १०९८) उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. कायद्याने बालक म्हणजे १० ते १८ वयोगटातील मूल होय. काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या कुठल्याही बालकाला ही संस्था चोवीस तास उपलब्ध आहे.

 स्थानिक संस्थांची मदत 

चाइल्डलाइन ही संस्था देशपातळीवर कार्यरत आहे. प्रत्येक राज्यात स्थानिक पातळीवरील विविध सामाजिक संघटनांच्या मदतीने ही संस्था कार्यरत आहे. कुठल्याही ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत कसल्याही अडचणीत बालकांना मदत मिळवून देण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी दिवसरात्र कायम सतर्क असतात. 

 
कुणाला मिळते मदत... 
 
काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या कुठल्याही बालकाला समुपदेशनापासून ते कायदेशीर मदत मिळवून देण्याचे काम संस्थेच्या वतीने केले जाते. बालकामगार म्हणून कामावर जुंपणे, बालकांवर अन्याय-अत्याचार करणे, बालकांना मारहाण करणे, बालकांची तस्करी करणे, बालकांना जबरदस्तीने भीक मागण्यास भाग पाडणे, बालविवाह करणे अशा प्रकरणांत मदत मिळवून दिली जाते. याशिवाय बालकांचे समुपदेशन, बालकांच्या शालेय शिक्षणाच्या समस्या सोडवणे, औषधोपचार मिळवून देणे अशा कुठल्याही पातळीवरील समस्या सोडविण्याचे काम संस्थेमार्फत केले जाते. 

अशी लागते तड 

स्वतः बालक, त्यांचे पालक किंवा बालकांना मदत मिळवून द्यावी असे वाटणारा कुणीही चाइल्डलाइनच्या टोलफ्री क्रमांकावर (१०९८) फोन करून मदत मागू शकतो. चोवीस तास केव्हाही फोन आल्यानंतर मुंबईच्या सेंट्रल हेल्पलाइनकडून स्थानिक संस्थेला माहिती कळवली जाते. स्थानिक पातळीवर प्रोजेक्ट डायरेक्टर आणि को-ऑर्डिनेटर यांच्यासह संपूर्ण टीम तातडीने कामाला लागते. बालकाची सुटका करण्यासाठी स्थानिक पोलिस किंवा गरजेनुसार जिल्हा प्रशासनाची मदत घेऊन प्रकरण तडीस जाईपर्यंत पाठपुरावा करण्यात येतो. स्थानिक पातळीवर (क्र. ८८३०१७१८६४, ८८३०१२०७०९) यावरही संपर्क साधून माहिती देता येते. 

अशी आहे टीम 

औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेमार्फत काम करण्यात येत आहे. प्रकल्पप्रमुख म्हणून अप्पासाहेब उगले, कार्यक्रम अधिकारी अन्नपूर्णा ढोरे, समुपदेशक मिलिंद अकोलकर, प्रणाली घोरपडे, योगेश उगले, उज्ज्वला भालेराव, विक्रम वाळके, राजेश सरकटे, आकाश बेडवाल, आम्रपाली बोर्डे, निवृत्ती कवडे हे काम पाहत आहेत.

अडचणीत सापडलेल्या बालकांना किंवा ज्यांना कुठल्याही मदतीची गरज असलेल्या बालकांना मदत, न्याय मिळवून देण्यासाठी चाइल्डलाइनच्या माध्यमाने काम करीत आहे. यासाठी चोवीस तास कर्मचारी कामावर असतात. त्यामुळे कुठल्याही अडचणीतील मुलांच्या मदतीसाठी बिनधास्त संपर्क साधावा. 
अप्पासाहेब उगले, सचिव, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com