नाट्यसंमेलनाध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेलच; पण एकमतासाठी लागले पाच तास!

Dr-Jabbar-Patel
Dr-Jabbar-Patel

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100 व्या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या नावावर रविवारी (ता.15) नियामक मंडळाच्या बैठकीत एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयाची माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी यशवंत नाट्य मंदिरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

मात्र, डॉ. पटेल यांचे नाव निश्चित करण्यासाठी चक्क पाच तास लागल्याची माहिती मिळाली. सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या बैठकीत नाव निश्‍चित करण्यासाठी पाच तास का लागावेत?, याबाबत अधिकची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता नियामक मंडळाच्या सभेपूर्वी संमेलनाध्यक्षांच्या नावाची घोषणा का करण्यात आली? यावरच चर्चा रंगल्याचे काही सदस्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

त्यात शेवटी सामोपचाराने एका सदस्याने 100 व्या संमेलनाचे अध्यक्षपदी पटेल यांची एकमताने निवड करावी आणि 101व्या संमेलनाचे अध्यक्ष मोहन जोशी यांना करावे, असे निश्‍चित केल्यावरच या वादावर पडदा पडल्याचे सांगण्यात आले.

तत्पूर्वी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. पटेल यांच्या नावावर कार्यकारिणीच्या सभेत एकमत झाल्याचे कांबळी यांनी 20 नोव्हेंबर रोजीच जाहीर केले होते. त्यावर नियामक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल, असेही सांगितले होते. मात्र कार्यकारिणीला अध्यक्षपदाच्या नावाची घोषणा नियामक मंडळाच्या सभेपूर्वी घेणे घटनाबाह्य असल्याचे सांगून काही सदस्यांनी आक्षेप नोंदवला होता.

त्यावर रविवारी कांबळी म्हणाले, "घटनेनुसार कार्यकारिणी बैठकीत ज्या नावाचा ठराव मंजूर होतो. तोच ठराव नियामक मंडळाच्या बैठकीत मांडला जातो. त्यानुसार, नियामक मंडळाने एकमताने डॉ. जब्बार पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.' 

100 व्या संमेलनाध्यक्षपदासाठी डॉ. जब्बार पटेल आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचे अर्ज प्राप्त झाले होते. 7 नोव्हेंबर रोजी कार्यकारिणीची बैठक झाली. पटेल यांच्या नावावर एकमत झाले. त्याची घोषणा 20 नोव्हेंबर रोजी प्रसाद कांबळी यांनी चित्रफितीद्वारे दिली. 15 डिसेंबरला नियामक मंडळाच्या सभेत निवडीवर शिक्कामोर्तब होईल, असे सांगितले होते. त्यानुसार, रविवारी घेतलेली नियामक मंडळाची बैठक सुमारे पाच तास चालल्याची माहिती आहे.  

नियामक मंडळाच्या निर्णयापूर्वी कार्यकारिणीने नाव जाहीर करणे चुकीचे होते. त्याबाबत बैठकीत चर्चा झाली. एकमत होत नव्हते तेव्हा दोन्ही नावांसाठी गुप्त मतदान करण्याचा ठराव मांडण्यात आला. परंतु तो मान्य करण्यात आला नाही. सदस्यांना बैठकीत त्यांची बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला नाही. नाट्य परिषदेच्या अध्यक्षांच्या या कारभाराला कंटाळून मी नियामक मंडळाच्या सदस्याचा राजीनामा देणार आहे. याबाबत मी काही सदस्यांची चर्चा करून निर्णय घेईल. 
- सविता मालपेकर, सदस्य, नियामक मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com