Dark-Net
Dark-Net

डार्क नेटद्वारे सेलिब्रिटींपर्यंत पोहचतात अमली पदार्थ

मुंबई - केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) मुंबई व दिल्लीमध्ये शोधमोहीम राबवून साडेतीन किलो बड (सुकवलेला गांजा) मंगळवारी (ता. १) जप्त केला. या रॅकेटकडून सेलिब्रिटींना अमली पदार्थांचे वितरण होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यासाठी डार्क नेट व आभासी चलनाचा वापर होत असल्याने त्यांना पकडणे जवळपास अशक्‍य असल्याचे सूत्रांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिल्लीवरून हा साडेतीन किलोचा गांजा मुंबईत येणार होता. मुंबईत जप्त झालेले अमली पदार्थ कॅनडावरून आले होते. ते गोव्यात पोचवण्यात येणार होते. बड्या पार्ट्यांमध्ये पाच हजार रुपये किलोने त्यांची विक्री होते. कॅनडा व अमेरिकेतून आणल्या जाणाऱ्या या गांजाला मुंबईत मोठा भाव आहे. परदेशी पार्सल सर्व्हिसने तसेच डार्क नेटद्वारे तो मागवला गेला होता. त्यासाठीची रक्कम ही क्रिप्टोकरन्सीद्वारे देण्यात येते. त्यामुळे खरेदी करणारा व विकणारा कोण आहे, हे समजून येत नाही. मुंबईतील या कारवाईची तार गोव्यापर्यंत पोहोचली असून, त्यात एफ अहमद नावाच्या व्यक्तीचे नाव पुढे आले आहे. तो गोव्यातील कलंगुट येथील एका प्रसिद्ध रिसॉर्टमध्ये चालक म्हणून काम करतो.

अहमदकडून हे बड बंगळुरूमध्ये जायचे. त्या व्यक्तीचे सेलिब्रिटींशी तार जुळले आहेत. अनेक सेलिब्रिटी त्याच्याकडून बड खरेदी करत असल्याची प्राथमिक माहिती यंत्रणेला उपलब्ध झाली आहे. शिवाय दिल्लीत जप्त केलेले बड अमेरिकेतून आले होते. तेथून ते मुंबईत येणार होते. याप्रकरणी अनेकांची चौकशी होण्याची शक्‍यता आहे.

वैद्यकीय चाचण्यांनाही चकमा
पार्ट्यांमध्ये मशरूम, फ्लॅक्का, स्पाईस हे ड्रग्सही वापरले जातात. वैद्यकीय चाचणीतही ते उघड होत नाही. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेबरोबर पालकांसमोरही नवे आव्हान उभे झाले आहे. भारतातील ड्रग्जचा व्यापार गुंतागुंतीचा आहे. झोपडीपासून आलिशान बंगल्यांपर्यंत हे मायाजाल पसरले आहे. त्यामुळे यातील उलाढालीचा अंदाज अद्याप सुरक्षा यंत्रणांना आला नाही.

पार्ट्यांपर्यंतची वितरण साखळी
अमली पदार्थ महाविद्यालयीन तरुणांपर्यंत पोहचवण्यासाठी व्हॉट्‌सऍप ग्रुप किंवा फेसबुकवर एका सांकेतिक भाषेत कोड वापरून पार्टीचे आयोजन केले जाते.

ड्रग्सची बदलती काळी दुनिया
हप्ते वसुली, सोनेचांदीच्या तस्करीपासून सुरू झालेले मुंबई अंडरवर्ल्ड कालांतराने बॉम्बस्फोट घडवण्याबरोबरच ड्रगची तस्करी करू लागले. अमेरिका, युरोप, लॅटिन अमेरिका या देशांमध्ये तस्करांनी बलाढ्य साम्राज्य उभे केले. ते पाहून भारतातील तस्करही या धंद्यात घुसले. परिणामी अफू, गांजा, चरस यापुढे जाऊन ८०-९० च्या दशकात कोकेन ब्राऊन शुगरने भारतातील तरुणांना पोखरण्यास सुरुवात केली. आता कोकेन, ब्राऊन शुगरला मागे टाकतील अशी भयानक नशा देणारे आणि काही वर्षात आयुष्य उद्‌ध्वस्त करणारे मशरूम, फ्लॅक्का, स्पाईस असे नवे ड्रग्स आले आहेत. सध्या मुंबईत एमडी ड्रगची चलती आहे.

असे काम करते डार्क नेट
मेसेजिंग ऍप्लिकेशन, डार्क नेट व क्रिप्टोकरन्सीच्या (आभासी चलन, बीटकॉईन) मदतीने कुरिअरद्वारे घरपोच ड्रग्स पोचवण्याची मोडस ऑपरेंडी सध्या आंतरराष्ट्रीय तस्कर वापरत आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे तपास यंत्रणांसमोर एक आव्हान आहे. डार्क आणि डीप अशा दोन प्रकारांत हा व्यवहार होतो. त्यासाठी इंटरनेटवरील या तस्करांच्या साईटवर मेंबरशिप घ्यावी लागते. बीटकॉईनवर ही मेंबरशीप मिळत असे; मात्र डार्क वेबवर सर्वांना पोचणे शक्‍य नसल्याने आता मेसेजिंग ऍप्लिकेशनचा वापर केला 
जात आहे. डार्क नेटवर असे क्रमांक व लिंक्‍स उपलब्ध आहेत. त्यामार्फत मेसेंजरद्वारे ऑर्डर दिली जाते. त्याची रक्कमही क्रिप्टोकरन्सीमार्फत दिली जाते. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com