आपल्या पोरांच्या हट्टापायी 'बाप' नेते गेले सत्तेबाहेर!

प्रशांत बारसिंग
बुधवार, 4 डिसेंबर 2019

राज्यात पुन्हा एकदा युतीचेच आणि त्यातल्या त्यात भाजपची सत्ता येईल, असा अंदाज बांधून अनेक नेते भाजपात गेले. यामध्ये अनेक पिता-पुत्रांच्या जोड्या असून, यात मुलांच्या हट्टामुळे पिताश्रींनादेखील भाजपात दाखल व्हावे लागले.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय स्थलांतरे झाली असून, आधीच्या सत्तापक्षात जाण्याच्या पुत्रांच्या हट्टामुळे राज्यातील बाप माणसांवर सत्तेबाहेर राहण्याची नामुष्की ओढवली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

मोदी लाटेमुळे सन 2014 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने केंद्रात सत्ता काबीज केल्यामुळे राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला.

- सुप्रिया सुळेंची वडिलांवर भावूक पोस्ट; म्हणतात, श्रमलेल्या बापासाठी...

राज्यात पुन्हा एकदा युतीचेच आणि त्यातल्या त्यात भाजपची सत्ता येईल, असा अंदाज बांधून अनेक नेते भाजपात गेले. यामध्ये अनेक पिता-पुत्रांच्या जोड्या असून, यात मुलांच्या हट्टामुळे पिताश्रींनादेखील भाजपात दाखल व्हावे लागले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांना खासदार व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी भाजपात उडी घेतल्यावर राधाकृष्ण विखे हेदेखील भाजपात गेले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हे पिता-पुत्र विजयी झाले.

- महाविकासआघाडीत 'या' मित्रपक्षाला मोठे मंत्रीपद?

हीच अवस्था मधुकर पिचड यांची झाली. वैभव पिचड यांच्यासह मधुकर पिचड यांना भाजपचा रस्ता धरावा लागला होता. विधानसभा निवडणुकीत वैभव पिचड यांचा पराभव झाल्यानंतर पिचड पिता-पुत्राची अवस्था केविलवाणी झाली होती.

तसेच नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते गणेश नाईक अगदी शेवटच्या क्षणी भाजपात दाखल झाले. त्यांच्या आधी पुत्र संदीप नाईक यांनी भाजपप्रवेश केल्याने नाईक यांनाही जावे लागले. विधानसभा निवडणुकीत गणेश नाईक निवडून आले.

- गुजराती कंपनीचे कंत्राट रद्द; ठाकरे सरकारचा मोदींना दणका

दुसरीकडे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची अवस्था थोडी वेगळी आहे. राणे यांचा राजकीय आलेख खालावण्यास त्यांचे पुत्र जबाबदार असल्याची राजकीय चर्चा लपून राहिलेली नाही. काँग्रेसमध्ये असताना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासोबत राणे यांचा संघर्ष झाला होता.

पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत मुंबईतील गोरेगाव येथे झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात यामुळेच गोंधळही झाला. हा गोंधळ राणेसमर्थकांनी केल्याचा मेसेज सोनियांपर्यंत विलासरावांनी पद्धतशीरपणे पोहोचविल्याने राणे यांना काँग्रेसचे मुख्यमंत्रिपद कधीही मिळाले नाही. आता राणे पिता-पुत्र भाजपात आहेत. पण, येथेही त्यांचा हिरमोड झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to insistence of children these political leaders had to go out of power