म्हणून भाजप नेते शपथविधीला राहिले गैरहजर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 December 2019

  • निमंत्रण वेळेत न आल्याने विरोधी नेते गैरहजर
  • विरोधकांचा शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार 
  • राज्याच्या इतिहासातील पहिलीच घटना 

मुंबई : शपथविधीचे निमंत्रण विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे नेते प्रवीण दरेकर यांना ऐनवेळी टपालाने पाठविल्याची घटना आज चर्चेचा विषय होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुख्यमंत्री कार्यालयातर्फे प्रोटोकॉल म्हणून शपथविधी तसेच विस्तार समारंभाचे निमंत्रण विरोधी पक्षनेते तसेच महत्त्वाच्या राजकीय पक्षांना पाठत्त्विले जाते. मात्र, या प्रघाताला या वेळी हरताळ लागला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार समारंभास जाऊ शकले नाहीत. यातील बहुतांश नेते आज मुंबईत होते. मात्र, योग्य पद्धतीने निमंत्रणच मिळाले नसल्याने हजर राहणे शक्‍य झाले नाही. भाजपचा समारंभावर बहिष्कार नव्हता. निमंत्रण योग्य वेळी मिळाले नसल्याने हजर राहता आले नाही, असे मुख्य प्रवक्‍ते माधव भंडारी यांनी स्पष्ट केले. 

शरद पवारांचे धक्कातंत्र; 'या' विश्वासू नेत्याला दिले गृहमंत्री पद?

राज्याच्या इतिहासातील पहिलीच घटना 
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पक्षाने या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातला. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडत असल्याची खंत या शपथविधी सोहळ्याला उपस्थित नेत्यांनी व्यक्‍त केली. 

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार म्हणतात, 'गांभीर्यपूर्वक...

राजकारणात कितीही टोकाचे मतभेद असले तरी, शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्षनेत्यांसह विरोधी पक्षातील अनेक नेते उपस्थित राहतात. लोकशाहीत सरकार व विरोधी पक्षातला हा संवाद व राजशिष्टाचार असतो. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी या शपथविधी सोहळ्यावरच बहिष्कार टाकल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले जात होते. राज्यातील शेतकऱ्यांना या सरकारने फसवी कर्जमाफी दिल्याचा निषेध करत हा बहिष्कार टाकल्याचे विरोधी पक्षाने स्पष्ट केले. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत सर्व आमदारांच्या फोटो काढण्याच्या कार्यक्रमातही देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील व आशिष शेलार यांनी दांडी मारली होती. 

पुणे : शिवाजीनगरऐवजी आता 'या' ठिकाणावरून सुटणार एसटी

मुख्यमंत्र्यांसोबत सर्व नवनिर्वाचित आमदारांचा विधानभवनच्या समोर फोटो काढण्याची विधिमंडळाची परंपरा आहे. या वेळी फडणवीस यांनी हजेरी लावली नाही, तर चंद्रकांत पाटील या फोटोच्या ठिकाणाच्या समोरून सर्व आमदारांच्या साक्षीने निघून गेले. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या ठिकाणी पोचण्यास वेळ होत असल्याचे कारण देत निषेध व्यक्‍त करून काढता पाय घेतला होता. या प्रकाराची आठवणदेखील सत्ताधारी सदस्य या शपथविधी सोहळ्याच्या दरम्यान काढत होते. 

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी आग; आगीची तीव्रता कमी, आगीचे कारण अस्पष्ट

विरोधी पक्षनेते व विरोधी पक्षाने अशा प्रकारे शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा प्रकार पहिल्यांदाच महाराष्ट्रात घडत असल्याची खंतदेखील अनेक आमदारांनी व्यक्‍त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to This reason BJP leaders absent on Cabinet oath Program