esakal | रंगकर्मी, कलावंतांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे भावनिक साद
sakal

बोलून बातमी शोधा

Emotional appeal to CM Uddhav Thakre through letter by Theater artists

रंगकर्मी, कलावंतांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे भावनिक साद

sakal_logo
By
टिम ई सकाळ

नाशिक : कोरोना संसर्गामुळे (Corona Virus) लागू केलेल्या निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर सांस्कृतिक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. नाट्यक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. आगामी टप्प्यात नाट्यक्षेत्र खुली व्हावी, अशी अपेक्षा कलाकार, दिग्दर्शक व्यक्त करत आहेत. नाट्यगृहांचा पडदा उठवा आणि पहिल्यासारखे नाटकांचे प्रयोग व्हावेत, अशी आशा कलाकारांमध्ये आहे.
आणि त्या अनुषंगाने अतुल पेठे (पुणे), शंभू पाटील (जळगाव), वामन पंडित (कणकवली), दत्ता पाटील (नाशिक), अभिजित झुंजारराव (मुंबई), अनिल कोष्टी (भुसावळ) आणि अनेक गावांतील रंगकर्मी, कलावंतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे भावनिक साद घातली आहे.

(Emotional appeal to CM Uddhav Thakre through letter by Theater artists)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्राचा आशय...

सप्रेम नमस्कार.

आमचे हे पत्र तुमच्यापर्यन्त पोहोचेल की नाही कल्पना नाही. आम्ही सारे प्रायोगिक नाटक करणारे कलावंत आहोत. आम्हाला पूर्ण कल्पना आहे की सारे जग गेले दीड वर्ष अतिशय संकटातून जात आहे. विविध क्षेत्रांसमोर जीवघेणे प्रश्न कोविडने उभे केले आहेत. त्याकरता आपला देश आणि आपले राज्य आपापल्या पातळीवर उपायही करू पाहात आहे. या संकटातून बाहेर पडण्याकरता इथल्या नागरिकांनीही आपापल्या मगदुराप्रमाणे मदत केली आहे. त्यात आम्हीही आपापल्या कुवतीने मदत केली आहे. कोविडची स्थिती नक्की आणि पक्की कोणालाच वर्तवता येत नसल्याने सरकार आपल्या परीने जबाबदार पावले टाकत आहे हेही आम्हाला कळत आहे. शिक्षण या अतिशय महत्वाच्या गोष्टीला अजून कुलूप आहे हेही आम्ही जाणत आहोत. हे सर्व सुरळीत सुरू झाल्यावर मग करमणूक या नावाखाली जे काही क्षेत्र येते ते सुरू होणार याबाबतही आम्ही सहमत आहोत. पण हे सर्व आता दीड वर्ष सुरू आहे. आधीपेक्षा आता थोडीफार सुधारणा होत आहे. लसीकरण त्यात मोलाची भर घालत आहे. लोक आता हॉटेलात काही दिवस का होईना, पण जाऊन जेवूखाऊ लागलेले आहेत.
बदलत्या या चित्रात सर्वांनी कोविडची काळजी घेणं अर्थातच आवश्यक आहे. त्याबाबत सतत जनजागृती होणं गरजेचं आहे. या संकटाने आर्थिक प्रश्न जसे निर्माण केले तसे मानसिक प्रश्न गंभीर केलेले आहेत. त्याकरता समुपदेशन आणि मार्गदर्शन काही डॉक्टर्स करत आहेत. आपल्यावरील हे असह्य ताण दूर होण्याचा एक मार्ग नाटक ही जिवंत कला पाहाणे हाही आहे. पहिली लाट ओसरल्यावर मराठी रंगभूमीवर काही लोकांनी सर्व काळजी घेऊन नाट्यप्रयोग केले. प्रायोगिक रंगभूमीवर केवळ २५/३० लोकांसमोर आम्ही काही लोकांनी अतिशय सुरक्षित आणि यशस्वीरीत्या प्रयोग केले. सभा, समारंभ, मंडई, हॉटेल अशा जागांपेक्षा 'थिएटर' ही अधिक सुरक्षित जागा आहे. याचा आम्ही अनुभव घेतला आहे.
आपणांस नम्र विनंती अशी की निदान ५० लोकांकरता छोट्या स्वरूपातील प्रयोग करायला आपण परवानगी द्यावीत. यामुळे समाजात मनस्वास्थ्य टिकायला नक्की मदत होईल.
कृपया आमच्या या रंगभूमीच्या प्रातिनिधिक पत्राचा आपण गंभीरपूर्वक विचार करावा ही विनंती.
कोरोनाविरुद्धच्या या संकटात आमची साथ होतीच आणि पुढेही असेलच.

-असे पत्रात या नमूद केले आहे.

हेही वाचा: आमिरचा लाल सिंग वादाच्या भोवऱ्यात, चित्रिकरण स्थळावर केलं प्रदुषण

अनेकांना अन्य व्यवसायांचा पर्याय निवडावा लागला

लॉकडाउनमध्ये अनेकांनी नव्या नाटकांच्या प्रदर्शनाचे नियोजन करून नाटकांच्या लेखनाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, अद्यापही नाटकांवर निर्बंध असल्याने निर्मितीप्रक्रिया रखडली आहे. लॉकडाउनमुळे नाटकांवर परिणाम झाल्याने आर्थिक नुकसानीबरोबरच आगामी प्रकल्पही रखडले आहेत. अनेक तंत्रज्ञांना अन्य व्यवसायांचा पर्याय निवडावा लागला आहे.

(Emotional appeal to CM Uddhav Thakre through letter by Theater artists)

हेही वाचा: 'हा तर मराठीतला रणवीर सिंग'; अभिजीतच्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस

loading image