खासगी एजन्सीमार्फत पाणीपट्टी वसुली शक्य? प्रस्ताव सादर करण्याच्या जलसंपदामंत्र्यांच्या सूचना

Jayant-Patil
Jayant-Patil

पुणे : सिंचन आणि बिगर सिंचनासाठी पाणीवाटप तसेच पाणीपट्टी वसुली खासगी एजन्सीमार्फत करता येईल का, याची शक्‍यता तपासून प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. तसेच, या बैठकीत कृष्णा खोऱ्यातील अपूर्ण असलेले 49 प्रकल्प येत्या पाच वर्षांत पूर्ण करण्याबाबत नियोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातील अपूर्ण प्रकल्प मार्गी लावण्यासह पाणीवाटप आणि पाणीपट्टी वसुलीच्या मुद्यांवर शुक्रवारी (ता. 21) जलसंपदा मंत्री पाटील यांनी आढावा बैठक घेतली. महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी, मुख्य अभियंता राजेंद्रकुमार मोहिते, अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता या वेळी उपस्थित होते. 

कृष्णा खोरे महामंडळामध्ये सध्या कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे पाणी वाटप आणि पाणीपट्टी वसुलीवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. ऊसपिकांसह सिंचनासाठी लागणारे पाणी तसेच बिगर सिंचनाच्या पाणीपट्टी वसुलीसह नियंत्रण ठेवण्याचे काम खासगी एजन्सीकडून करता येईल का, याचा अभ्यास करून प्रस्ताव सादर करावा.

कृष्णा खोरे महामंडळांतर्गत लहान, मध्यम आणि मोठे असे 49 प्रकल्प अपूर्ण आहेत. त्यात प्रामुख्याने दूधगंगा, कुकडी, वारणा, निरा देवघर, टेमघर, गुंजवणी प्रकल्पांसह टेंभू उपसा सिंचन, सिना-माढा, वाकुर्डे उपसा प्रकल्प, बार्शी-परिसपूर-एकरूख, धामणी, आंबेओहोळ, नागनवाडी, उचगी, सोनुर्ली या लहान आणि मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे.

ते पूर्ण करण्यासाठी सुमारे साडेअकरा हजार कोटींचा खर्च येणार आहे. त्यासाठी निधी उभारून पाच वर्षांत हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com