महाविकास आघाडी सत्तेत स्थिरावतेय!

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

राजकारणात नवा मित्र आणि नवे सूत्र या नीतीने महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षाची महाविकास आघाडी सत्तेवर आली आणि राजकीय विचारधारा व सत्ता यांच्यातील द्वंद्वाला पुन्हा धुमारे फुटले; पण भिन्न विचारांच्या या तिन्ही पक्षांच्या सरकारला बघताबघता शंभर दिवस पूर्ण झाले. फार काळ हे सरकार टिकणार नाही असे दावे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सतत केले; पण महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये विश्वासाचे आणि समन्वयाचे वातावरण अधिकच वाढताना दिसतो आहे.

शंभर दिवसांचा कार्यकाल पूर्ण करताना महाविकास आघाडीला अत्यंत खडतर अशा राजकीय प्रवासातून जावे लागले आहे. ज्या विचारधारेवर पक्षाचे संघटन अवलंबून आहे त्या विचारधारेला तडा देणारे राष्ट्रीय आणि धार्मिक विषय कठोरतेने समोर आले. परंतु महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार आणि संयमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील अफलातून परस्पर विश्वासामुळे या राष्ट्रीय मुद्द्यांवर सरकारमध्ये एकमत होताना दिसते आहे. एनआरसी, सीएए आणि एनपीआर या मुद्यावर महाविकास आघाडीत मोठी फूट पडेल, असा दावा विरोधी पक्षांसह राजकीय विचारवंत करत होते. पण उद्धव ठाकरे यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर सफाईदारपणे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याशी सुसंवाद ठेवत सत्तेच्या राजकारणात मिठाचा खडा पडणार नाही याची दक्षता घेतली. 

मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर सत्तेमध्ये सर्व मंत्र्यांना अधिकाराचे विकेंद्रीकरण करून देत अधिकाराचे वाटप केले. अजित पवार यांच्या सारख्या नेत्याला उपमुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक अधिकार दिले. कामाचा उरक अन् प्रशासकीय वचक यामुळे अजित पवार सत्तेत कायम प्रभावी ठरतात. शंभर दिवसांच्या कार्यकाळात सीएए आणि एनआरसी या अत्यंत जटिल मुद्द्यांवर मंत्रिमंडळात चर्चा झाली असली तरी खल होऊ न देता संवादाची भूमिका राहील यावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी भर दिला आहे. त्यातच कोरेगाव भीमा प्रकरणी देखील या तिन्ही पक्षांत विसंवाद होईल, असा दावा केला जात होता. पण उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संयमी भूमिका घेत हा मुद्दा देखील महाविकास आघाडीला धोक्याचा ठरणार नाही याची काळजी घेतली.

मुख्यमंत्री ठाकरे यांचे सत्तेतील रूप पहिल्यांदाच महाराष्ट्र अनुभवत आहे. ज्या शंकेने त्यांच्याकडे पाहिले जात होते त्या सर्व शंकाकुशंकांचा उद्धव ठाकरे यांनी १०० दिवसांतच बिमोड केल्याचे मते सर्वत्र ऐकायला मिळत आहेत. सहजता आणि संयमी स्वभाव यामुळे ते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मुरब्बी नेत्यांनाही भुरळ पाडताना दिसत आहेत. सर्व राजशिष्टाचाराचे सोपस्कार अत्यंत कुशलतेने पार पाडताना निर्णय प्रक्रियेत परस्पर समन्वय राहील याबाबत कटाक्षाने ते काळजी घेत आहेत. काँग्रेससारख्या पूर्णतः विचारांवर आधारित राजकीय भूमिका घेणाऱ्या पक्षाला देखील समान किमान कार्यक्रमाच्या धाग्यातील महाविकास आघाडीच्या सत्तेत विश्वास देण्यात ठाकरे यांना यश येत असल्याचे दिसते. 

या शंभर दिवसांच्या कालखंडात शेतकरी कर्जमाफी सारखा अत्यंत महत्त्वाकांक्षी निर्णय पारदर्शक पद्धतीने घेतल्याची जाणीव राज्यातील प्रशासन आणि शेतकऱ्यांना देखील झाली आहे. कुठल्याही प्रकारे शेतकरी कर्जमाफीचा गुंता वाढणार नाही यासाठीची पूर्वतयारी ठाकरे यांनी अगोदरच करून ठेवली. त्यासाठी प्रशासनातील सक्षम आणि कुशल अधिकाऱ्यांना त्यांनी जबाबदारी दिली. प्रशासनाला हाताळण्याचा ठाकरे यांचा हा वकूब राजकारणाला निश्चितच नवा असल्याचे वाटते. अत्यंत सहजतेने आणि सभ्यतेने प्रशासनासोबत ठाकरे कारभार करत असल्याची चर्चा सर्वस्तरातून होताना दिसते. शिवभोजन योजनेचा निर्णय हा राज्यभरात चर्चेचा ठरतो आहे. 
अजित पवार यांच्या सारख्या आक्रमक नेत्याला अत्यंत मनमिळाऊपणे सोबत घेऊन काम करण्याचे कौशल्य देखील या शंभर दिवसांत ठाकरे यांच्याकडून दिसले आहे.

काँग्रेसच्या नेत्यांनी सुरुवातीला किमान समान कार्यक्रमाच्या  बाबतीत आग्रह ठेवण्याची भूमिका दिसत होती. पण काँग्रेस देखील शिवसेनेच्या सोबत सत्तेत समरस होवू शकते असा विश्वास ठाकरे यांनी दिला आहे.  महाविकास आघाडीच्या सत्तेचे शंभर दिवस ही तशी तारेवरची कसरतच होती. पण शंभर दिवसांत ठाकरे यांनी ही कसरत पार करून दाखवली आहे.

विधिमंडळात समोर १०५ आमदारांचे पाठबळ असलेला भाजप आणि देवेंद्र फडवणीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यांच्यासारखे आक्रमक नेते असतानाही ठाकरे यांनी सर्वांनाच चकित करणारी भाषण केली. राजकीय भूमिका आणि राजकारणातील मुत्सद्दीपणा यावर भाजपला ठाकरे यांनी वारंवार घेरले. नागपूर अधिवेशनातही ठाकरे यांनी त्यांच्या चातुर्याची चुणूक दाखवली. त्यामुळे १०० दिवसांच्या खडतर कालावधीत महाविकास आघाडीचे सरकार हेलकावे घेत असल्याचे दिसले तरी सत्तेचा दोलक स्थिरावताना दिसतो आहे. 

मित्र पक्षाच्या कोणत्याही भाष्यावर तात्काळ प्रतिक्रिया न देता विरोधीपक्ष भाजपला सतत राजकीय विश्वासघात केल्याची जाणीव करून देणे हा ठाकरे यांच्या शंभर दिवसांच्या कार्यकाळातील सर्वात प्रभावी अस्त्र ठरते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com