‘RTE’ प्रवेशातील बदलाचे राजपत्र प्रसिद्ध! सर्वच शाळांचे होणार मॅपिंग! पुढील आठवड्यापासून प्रवेश; विद्यार्थ्यांना शासकीय शाळांचाच पर्याय

‘RTE’अंतर्गत यापुढे विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून एक किमी अंतरावरील शासकीय, अनुदानित शाळांमध्येच प्रवेश दिला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने राजपत्र प्रसिद्ध केले असून आता पहिल्यांदा शाळांचे रजिस्ट्रेशन करून सर्व शाळांचे मॅपिंग केले जाणार आहे.
mantralay
mantralaysakal

सोलापूर : महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत आता यापुढे विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून एक किमी अंतरावरील शासकीय किंवा अनुदानित शाळांमध्येच प्रवेश दिला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राजपत्र प्रसिद्ध केले असून आता पहिल्यांदा शाळांचे रजिस्ट्रेशन करून सर्व शाळांचे मॅपिंग केले जाणार आहे. त्यानंतर पुढील आठवड्यापासून ‘आरटीई’ प्रवेशाला सुरवात होणार आहे.

दरवर्षी राज्यातील एक लाख नऊ हजार विद्यार्थ्यांना ‘आरटीई’तून मोफत इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये प्रवेश दिला जात होता. त्यासाठी राज्य सरकारला दरवर्षी तिजोरीतून ८०० ते ९०० कोटी रूपये मोजावे लागत होते. अजूनही मागील काही वर्षातील खासगी इंग्रजी शाळांचे अंदाजे तेराशे कोटी रूपये सरकारकडे प्रलंबित आहेत. मराठी माध्यमांच्या विशेषत: जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषदांच्या शाळांमधील पटसंख्या कमी होवू लागली आहे. तरीदेखील इंग्रजी शाळांमध्ये आपल्याच मुलांना त्याठिकाणी पैसे भरून प्रवेश द्यावा लागत होता. या पार्श्वभूमीवर आता कायद्यातच दुरूस्ती करण्यात आली आहे. त्यानुसार आता यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना ‘आरटीई’तून प्रवेश दिले जाणार आहेत.

राज्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास ६३ हजार शाळा असून महापालिका, नगरपालिकेच्या शाळांची संख्या देखील दहा हजारांवर आहे. तसेच अनुदानित शाळांसह अंशत: अनुदानित शाळांची संख्या देखील ३० हजारांपर्यंत आहे. त्यामुळे या शाळांचे मॅपिंग होणार असून विद्यार्थ्यांना आता त्यांच्या घरापासून एक किमी अंतरावरील शासकीय शाळेतच ‘आरटीई’तून प्रवेश मिळणार आहे.

‘आरटीई’च्या नवीन राजपत्रानुसार...

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा २००९च्या कलम ३८ मधील उपकलम एक व दोननुसार प्रदान करण्यात आलेल्या प्राधिकारास अनुसरून व यासंदर्भात इतर प्रदत्त शक्तीनुसार महाराष्ट्र शासनाद्वारे कायद्यात सुधारणा करताना महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क (सुधारित) नियम २०२४ असे म्हणावे. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क (वंचित व दुर्बल गटातील बालकांचे इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर कमीत कमी २५ टक्के प्रवेश करण्याची पद्धत) नियम २०२३ नुसार वंचित व दुर्बल घटकातील २५ टक्के प्रवेशासाठी ज्या खासगी विनाअनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात शासकीय शाळा किंवा अनुदानित शाळा आहेत अशा शाळा स्थानिक प्राधिकरणाकडून निवडण्यात येणार नाहीत.

‘त्या’ विद्यार्थ्यांनाच खासगी इंग्रजी शाळेचा पर्याय

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांमधील विद्यार्थ्यांनाही आता शासकीय शाळांमध्येच प्रवेश घ्यावा लागणार आहे. पण, ज्या विद्यार्थ्याच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद किंवा विनाअनुदानित शाळा, अंशत: अनुदानित शाळा नाहीत, त्या परिसरातील इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत प्रवेश घेता येणार आहे. पण, तत्पूर्वी राज्यातील सर्वच आस्थापनाच्या शाळांचे मॅपिंग होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com