
Maratha Reservation : मराठवाड्यामध्ये निजामकालीन दस्तऐवजांमधून कुणबी नोंदी शोधण्यास यापूर्वी कधी प्राधान्य न दिल्याने संपूर्ण मराठवाड्यात १९८६ ते २३ ॲाक्टोबर २०२३ पर्यंत केवळ दोन हजार ३६३ कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप झाले होते.
मात्र राज्य सरकारने माजी न्या. संदीप शिंदे समितीची स्थापना करून कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम हाती घेतल्यानंतर गेल्या चार महिन्यात २० हजार ९२७ कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप मराठवाड्यात करण्यात आले आहे.
मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात एकूण ३८ लाख ९७ हजार ३९१ कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप केले आहे. राज्यात सर्वाधिक २६ लाख १५ हजार २२७ कुणबी नोंदी अमरावतीमध्ये सापडल्या आहेत तर सर्वात कमी छत्रपती संभाजीनगरमधील आठही जिल्हे मिळून केवळ २३ हजार २९० नोंदी सापडल्या.
मराठवाड्यातील या आठही जिल्ह्यांमध्ये अल्पप्रमाणात कुणबी प्रमाणपत्राचे वाटप झालेले आहे.त्यामध्ये लातूरमध्ये ३१० आणि हिंगोलीमध्ये ३१६ कुणबी जात प्रमाणपत्र वाटप झाली आहेत.
माजी न्यायाधीश संदीप शिंदे समितीने १२ विभागांचे पुरावे, आणि त्या विभागातील ४८ दस्तऐवज ग्राह्य धरण्यासाठी तशी सुधारणा सामाजिक न्याय विभागाच्या नियमात केली आहे. रक्त नात्यातील नोंदींच्या आणि काही मोजक्या पुराव्यांच्या पलिकडे जाऊन सरकारी दस्तऐवजातील कुणबी नोंदी शोधल्या गेल्याने ५७ लाख ४१ हजार २४१ कुणबी नोंदी सापडू शकल्या. त्यासाठी १५ कोटींपेंक्षा जास्त पुरावे शोधावे लागले आहेत.
कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीने मागील चार महिने अहोरात्र मेहनत घेतल्याचे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे यांनी सांगितले. तसेच कुणबी नोंदीचे काम सर्व जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील गांभीर्याने केले. कमी कालावधीत असे काम करण्यासाठी चांगली साथ लागते. माझ्या सपूर्ण चमूने मेहनत घेतली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्यावर विश्वास टाकल्याचेही भांगे यांनी आवर्जून सांगितले.
शिंदे समितीने कुणबी नोंदी शोधण्यासाठी १२ विभागांतील जवळपास ४७ पुराव्यांचा आधार घेतला आहे. त्यातून ५७ लाख ४१ हजार २४१ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. शिंदे समितीला अजून एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.
स गेसोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीत झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक. मराठा समाजात गणगोतांशी लग्नाच्या सोयरीकी होतात ते सर्व सगेसोयरे, मात्र सगेसोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल.
तसेच लग्नाच्या ज्या सोयरीकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत हे पुराव्याच्या आधारे सिद्ध करावे लागेल. त्यासाठी गृहचौकशी केली जाईल. हे विवाह सजातीय विवाहातून तसे नातेसंबंध तयार झाले असतील तर त्यांनाच कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार आहे..
कुणबी मराठा जातीची नोंदी असलेले पुरावे
कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका, पुतणे, भाव-भावकीतील नातेवाईक
पितृसत्ताक पद्धतीतील सगेसोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगेसोयरे आहेत, अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून द्यावे लागेल. तसेच गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सग्यासोऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळेल
कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र घेऊन प्रमाणपत्र देता येतील
ज्या मराठा समाजाकडे कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सग्यासोयऱ्यांना वरील बांधवांच्या नोंदीचा आधार घेऊनच सर्व सग्यासोयरे पात्र ठरतील
कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्याअंतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगेसोयरे
अर्ज करताना सादर करावयाचे पुरावे
कुणबी नोंदीच्या पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षांकित प्रत आणि अर्जदाराच्या रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्ख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाइकांचे किंवा सगेसोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.