कोरोनाच्या सावटातही परिचारिका संवर्गाला रिक्त पदांची कीड, नर्सेसची रिक्त पदे वाचून तुम्हालाही बसेल धक्का

केवल जीवनतारे
Friday, 26 February 2021

राज्यात नागपुरातील मेडिकल आणि मेयोसह पुणे, मुंबई, औरंगाबाद, लातूर, अंबेजोगई, यवतमाळ, गोंदिया, अकोला, मीरज, कोल्हापूर, नांदेड, जळगाव, बारामती, सोलापूर, चंद्रपूर अशा १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सरळसेवा भरतीतून ३६ हजार ८९४ पदे भरावयाची आहेत.

नागपूर : राज्यात कोरोनाविरुद्ध डॉक्टर, परिचारिकांपासून तर आरोग्य सेवा देणारे कर्मचारी युद्धातील सैन्याप्रमाणे लढत आहेत. मात्र, हे सैन्य तोकडे पडत आहे. राज्यात १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात खाटांची संख्या लक्षात घेता परिचर्यां संवर्गातील अधीक्षकपदापांसून तर अधिपरिचारिकांपर्यंतची सुमारे ४२ हजार ८९० पदे मंजूर आहेत. मात्र, यापैकी अवघी २८ हजार ५६० पदे भरली आहेत. उर्वरित १४ हजार ३३० पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कोरोना संकटाच्या काळात परिचर्या सेवेचे महत्त्व अधोरेखित झाले असताना पदांच्या तुटवड्याचा प्रश्न समोर उभा ठाकला आहे. मात्र, या तुटवड्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. 

हेही वाचा - नातेवाईकांच्या घरी पाहुणचार आटोपून परतीला निघाली महिला, रेल्वे स्थानकावर पोहोचली अन् सर्वच संपलं

राज्यात नागपुरातील मेडिकल आणि मेयोसह पुणे, मुंबई, औरंगाबाद, लातूर, अंबेजोगई, यवतमाळ, गोंदिया, अकोला, मीरज, कोल्हापूर, नांदेड, जळगाव, बारामती, सोलापूर, चंद्रपूर अशा १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सरळसेवा भरतीतून ३६ हजार ८९४ पदे भरावयाची आहेत. तर ५ हजार ९९६ पदे पदोन्नतीच्या प्रक्रियेतून भरण्यासाठी मंजूर आहेत. अशी एकूण ४२ हजार ८९० पदे मंजूर आहेत. यापैकी सरळसेवा भरतीची केवळ २४ हजार ४५१ पदे भरलेली आहेत. तर पदोन्नतीद्वारे ४ हजार १०९ पदे भरली आहेत, अशी एकूण २८ हजार ५६० पदे भरली आहेत. उर्वरित १४ हजार ३३० पदे रिक्त आहेत. 

खाटांच्या तुलनेत संख्या तोकडी - 
राज्यातील १८ वैद्यकीय महाविद्यालयातील खाटांची संख्या १६ हजार ५०० इतकी आहे. खाटांच्या तुलनेत सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये सुमारे तीन रुग्णांच्या मागे एक असे परिचारिकांचे प्रमाण असावे, तर सुपर स्पेशालिटीमध्ये एका रुग्णाच्या मागे एक परिचारिका असे प्रमाण रुग्णसेवेदरम्यान असावे. या प्रमाणात परिचारिकांची संख्या मंजूर आहे. मात्र, ती पदे भरण्यात आली नाही. दिवसेंदिवस निवृत्त होणाऱ्या परिचारिकांची संख्या वाढत आहे. यावर तात्पुरती मलमपट्टी म्हणून कंत्राटीचे धोरण सरकारने राबवू नये. 

हेही वाचा - पोलिसांना जंगलात दिसले भांडे, भाजीपाला, राशन; आत शिरताच बसला मोठा धक्का

राज्यसरकारने पुढील तीन वर्षात ११ हजार ३३० पदे भरण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू करावी. परियर्चा संवर्गातील पदोन्नतीने भरण्यात येणारी १ हजार ८८७ तर सरळ सेवा भरतीने भरली जाणारी १२ हजार ४४३ पदे भरण्यात यावी. या मागणीचे निवेदन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे सादर करण्यत आले आहे. 
-त्रिशरण सहारे, अध्यक्ष -विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय आरोग्य कर्मचारी संघटना, नागपूर. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: most of nurses position vacant in state even in corona nagpur news