तिढा सुटला; काँग्रेसला मिळणार 'ही' अधिकची तीन खाती; पण...

संजय मिस्कीन
Friday, 3 January 2020

  • आता कॉंग्रेस पक्षांतर्गत खातेवाटपाचा पेच

मुंबई : महाविकास आघाडीच्या खातेवाटपाचा तिढा अखेर सुटला असला तरी आता कॉंग्रेस पक्षांतर्गत कोणत्या मंत्र्याला कोणते खाते द्‌यायचे याचा पेच कायम आहे. यामुळे, कॉंग्रेसच्या मंत्र्याची खातेनिहाय यादी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मिळण्यास विलंब होत असल्याने खातेवाटपाची घोषणा सोमवार (ता.6) पर्यंत लांबणीवर पडण्याचे संकेत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अधिकची खाती मिळावी यासाठी कॉंग्रेसने खातेवाटपात खोडा घातला होता. कॉंग्रेसची मनधरणी करण्यासाठी बंदरे, खार जमिन, खनिकर्म, पणन, मत्सपालन यापैकी तीन अधिकची खाती कॉंग्रेसला देण्याची तयारी राष्ट्रवादी व शिवसेनेनं दर्शविली आहे. मात्र कृषि, जलसंपदा अथवा ग्रामविकास विभाग कॉंग्रेसला देण्यास राष्ट्रवादी व शिवसेनेनं स्पष्ट नकार दिला.

धनंजय मुंडेची जागा रिक्त; 'या' नेत्याला मिळणार संधी

महाविकास आघाडीच्या सुरूवातीच्या खातेवाटपात प्रमुख खात्यांची विभागणी झाली होती. तीन्ही पक्षाच्या नेत्यांनी खातेवाटपाचा करार संमत करून त्यावर सह्या केल्या होत्या. मात्र, प्रमुख विभागांना जोडून असलेल्या पुरका विभागांचे वाटप झाले नव्हते. त्यावरूनच कॉंग्रेसने खातेवाटपात अधिक चर्चेची आवश्‍यकता असल्याची मागणी केल्याने खातेवाटप लांबणीवर पडले होते.

मोदींच्या 'या' महत्त्वकांक्षी योजनेत मोठा घोटाळा

परिवहनला जोडून बंदरे विकास हा विभाग असतो. तर, उद्‌योग व खनिकर्म, वने व खार जमिन, पशु व दुग्ध संवर्धन आणि मत्सपालन, सहकार व पणन असे काही विभाग एकत्रित आहेत. या जोडविभागांचे वाटप व्हावे यासाठी कॉंग्रेसने आग्रह धरला होता. यापैकी बंदरे विकास, खार जमिन व पणन अथवा खनिकर्म हे विभाग कॉंग्रेसला मिळणार असल्याचे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले आहे. कॉंग्रेसला सुरूवातीला नऊ कॅबिनेट मंत्रीपदे देण्यात आली होती. त्यामधे बदल करत दहा कॅबिनेट मंत्रीपदे देण्यात आली. त्यामुळे, अधिकचे एक महत्वाचे खाते मिळावे यासाठी कॉंग्रेसने दावा केला होता.

केवळ मुख्यमंत्रिपदासाठी सेनेने भगव्याशी तडजोड केली : गडकरी

दरम्यान, कॉंग्रेसने खातेवाटपावर सहमती दर्शविली असली तरी कॉंग्रेस अंतर्गतच आता खातेवाटपाचा पेच सुरू आहे. महसुल विभाग बाळासाहेब थोरात यांच्याकडे राहणार असून सार्वजनिक बांधकाम माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना देण्यात येणार आहे. मात्र, ऊर्जा विभागावरून कॉंग्रेसच्या नेत्यांमधे जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ऊर्जा विभागासाठी विजय वडेट्‌टीवार यांनी आग्रह धरला असल्याचे सांगण्यात येते. ऊर्जा विभाग कोणत्या मंत्र्याकडे द्‌यावा यावर कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अद्‌याप निर्णय घेतलेला नसून हायकमांडच्या निर्णयानंतरच कॉंग्रेसचे खातेवाटप पुर्ण होईल असे सुत्रांचे मत आहे. त्यासाठी कॉंग्रेसच्या मंत्र्याचे खातेवाटप हायकमांडच्या सहमती साठी दिल्लीला पाठवण्यात आले असल्याने अंतिम निर्णयासाठी आणखी दोन दिवसांचा वेळ लागू शकतो असा दावा सुत्रांनी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP and Shiv Sena agree to Three more Ministerys to Congress