
बुरा ना मानो होली है; जुना व्हिडीओ शेअर करत मनसेचा उध्दव ठाकरेंना खोचक टोला
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) सातत्याने शिवसेनेवर टीका करत असतात. आज होळीच्या पार्श्वभूमीवरही संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. देशपांडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा जुना व्हिडीओ शेअर करत बुरा ना मानो होली है, असा टोला लगावला. या व्हिडीओच्या माध्यमातून मनसेने उद्धव ठाकरेंना त्यांच्या जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे.
राज्यात सध्या शेतकऱ्यांच्या वीजतोडणीचा मुद्दा तापलेला आहे. यातच आज संदीप देशपांडे यांनी एका वृत्तवाहिनीचा व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका प्रचारसभेत बोलताना शेतकऱ्यांना एक विशिष्ट उपकरण देण्याचं आश्वासन देताना दिसत आहेत. हा व्हिडीओ जुना असून निवडणूक प्रचाराचा आहे, असे दिसतेय.
या व्हिडीओत उद्धव ठाकरे म्हणतात, “अनेक ठिकाणी विहिरीला पाणी असतं, पण वीज नसते म्हणून तुम्ही ते पाणी पिकाला देऊ शकत नाहीत. मला सत्ता द्या, मी तुमच्यासाठी एक उपकरण तयार ठेवलं आहे. वीज तर देईनच. पण जोपर्यंत वीज देता येणार नाही, तोपर्यंत ते उपकरण तुम्हाला देईन. ते उपकरण तुमच्या बैलाच्या सहाय्याने चालेल. त्यातून जी वीज निर्माण होईल ती या विजेच्या शिवाय तुमचा कृषीपंप चालवू शकेल. वीज नसताना देखील तुम्ही तुमच्या पिकाला त्या पंपाच्या माध्यमातून पाणी देऊ शकाल”
काही दिवसापुर्वी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजतोडणी स्थगित केल्याची घोषणा केली होती. थकीत वीजबिलांच्या पार्श्वभूमीवर संबंधित शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्याचा मुद्दा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रचंड गाजला होता. त्यानंतर नितीन राऊत यांनी वीजतोडणी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यावरुनच मनसेने उद्धव ठाकरेंना त्यांच्या जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली.