
Maharashtra : CM शिंदेंची शक्ती जास्त की सत्तारांची? शपथविधीनंतर नव्या वादाला सुरुवात
Abadas Danve On Abddul Sattar : शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता नव्या वादाला तोंड फुटलं असून, काही मंत्र्यांना देण्यात आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांची शक्ती जास्त की अब्दुल सत्तरांची असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सत्तारांवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच सत्तारांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकण्याचं काम केले आहे असा आरोपही दानवे यांनी केला आहे.
टीईटी परीक्षा घोटाळ्यात सत्तारांच्या मुलांची नावं समोर आल्यामुळे मंत्रीपदाच्या शर्यतीतून सत्तारांचा पत्ता जवळपास कापले गेल्याची चर्चा होती. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी सत्तारांच्या नावाचा समावेश करण्यात आलाय यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, कालच्या विस्तारात संजय राठोड यांचादेखील समावेश करण्यात आला आहे. यावरून बाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर खुद्द मुख्यमंत्र्यांनादेखील राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान का देण्यात आले यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं.
चित्रा वाघ यांच्या या उघड नाराजीमुळे शिंदे गटातील काही नावांबाबत भाजप आणि शिंदे गटात एकसूर नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सत्तार आणि राठोड यांच्या समावेशावरून भाजपचे इतर नेते आणि विरोधी पक्षातील नेते नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
रात्रभर अब्दुल सत्तार शिंदेंच्या बंगल्यावर चर्चा करत राहिले अन्...
दोन दिवसांपूर्वी टीईटी घोटाळ्यातील धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे अब्दुल सत्तार यांची मंत्रीपदाची शक्यता कापली जाण्याची दाट वर्तवण्यात येत होती. असे झाले असते तर शिंदे गटातील दुसऱ्या एखाद्या नेत्याला संधी मिळण्याची शक्यता होती. मात्र, विस्तारापूर्वी मुख्यमंत्र्यासोबत रात्रभर चाललेल्या बैठकीनंतर सकाळी सत्तार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र, त्यानंतर आता मंत्रिमंडळात सत्तांरांना संधी देण्यात आल्यामुळे विरोधकांना टीका करण्यासाठी आयतं कोलीत मिळाले असून, अंबादास दानवे यांनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदे काय उत्तर देतात हे महत्त्वाचे आहे.