शिक्षकांच्या मागण्यांसाठी शिक्षण बचाव पदयात्राः आमदार सावंत

अभय जोशी
गुरुवार, 13 जुलै 2017

आमदार सावंत म्हणाले, पंधरा ते वीस वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांची उपासमार थांबवण्यासाठी 1 व 2 जुलै 2016 ला पात्र झालेल्या शाळा व तुकड्यांना त्वरीत अनुदान मंजूर करावे, उच्च माध्यमिक शाळेतील वाढीव पदांना मंजूरी द्यावी, राज्यातील मूल्यांकन झालेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांची पात्र म्हणून यादी घोषीत करावी

पंढरपूर : शिक्षकांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षण बचाव पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेचा प्रारंभ सोमवार (ता. 17) रोजी पुणे येथून होणार असून रविवार (ता. 23) रोजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या मुंबई येथील सेवासदन बंगल्यावर पोचणार आहे अशी माहिती पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी "सकाळ" ला दिली. या पदयात्रेत अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे व शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर हे देखील सहभागी होणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. 

आमदार सावंत म्हणाले, पंधरा ते वीस वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांची उपासमार थांबवण्यासाठी 1 व 2 जुलै 2016 ला पात्र झालेल्या शाळा व तुकड्यांना त्वरीत अनुदान मंजूर करावे, उच्च माध्यमिक शाळेतील वाढीव पदांना मंजूरी द्यावी, राज्यातील मूल्यांकन झालेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांची पात्र म्हणून यादी घोषीत करावी. यासह अनेक मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पदयात्रा काढण्यात येणार आहे. 

शिक्षणाची सोय करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातील भिडे वाड्यापासून मुंबईतील शिक्षण मंत्र्यांच्या बंगल्या पर्यंत निघणार आहे.ही पदयात्रा सोमवार (ता.17) रोजी या पदयात्रेचा प्रारंभ होणार असून रविवार (ता.23) रोजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या मुंबई येथील सेवासदन बंगल्यावर पोचणार आहे. विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना आर्थिक परिस्थितीमुळे सात दिवस बाहेर राहण्याचा किंवा आंदोलनाला जाण्यायेण्याचा खर्च होऊ नये तसेच शिक्षक आंदोलनात सहभागी झाले. तर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील यामुळे पदयात्रेत श्री.सावंत, श्री.देशपांडे व अभ्यंकर हे चालत जाणार आहेत.मात्र पदयात्रेच्या पहिल्या व शेवटच्या दिवशी राज्यातील हजारो शिक्षक पदयात्रेत सहभागी होणार आहेत असे आमदार सावंत यांनी सांगितले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

 

Web Title: Solapur news teachers agitation mla Dattatraya Sawant