
मी विधान परिषदेची निवडणूक लढणार नाही : सुभाष देसाई
औरंगाबाद : मी उमेदवार ठरविणारा आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत बसून निर्णय घेतो. यावेळी मी विधान परिषदेची निवडणूक लढणार नाही, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी (ता.आठ) सांगितले. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी २० जूनला निवडणूक होणार आहे. ९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून शिवसेनेकडून दोन जागांसाठी उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे (Aurangabad) पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) मुंबईतील सचिन अहिर व आमसा पाडवी यांची नावे चर्चेत होती. (Subhash Desai Says, I Won't Contest Legislative Council Election)
या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना सुभाष देसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यसभा निवडणुकी संदर्भात ते म्हणाले, महाविकास आघाडी भक्कम असून, आमच्या चारही जागा निवडून येतील. भाजपने आणखी एक उमेदवार टाकून अपशकून करण्याचा प्रयत्न केला आहे. २४ वर्षांत राज्यसभेची कधी निवडणूक झाली नाही. सर्व निवडणूका बिनविरोध झाल्या.
राजकीय वातावरण चांगले खेळीमेळीचे असावे. यासाठी आम्ही पुढाकार घेतला. शिष्टमंडळाने भाजप नेत्यांची भेट घेतली. पण भाजपला वातावरण नासवून टाकायचे आहे. त्यामुळे त्यांनी आणखी एक उमेदवार दिला, असा आरोप देसाई यांनी केला.