एसटीतील चालक महिलांच्या प्रशिक्षणाला ब्रेक; 236 महिला कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात

प्रशांत कांबळे
Sunday, 9 August 2020

राज्यात 22 मार्चपासून कोरोनामुळे एसटी महामंडळातील सर्व प्रशिक्षण थांबवण्यात आले. त्यानंतर 22 मे पासून एसटीची जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरू झाली. काही प्रमाणात कार्यालय, कार्यशाळा पण सुरू झाल्या. परंतु चालक कम वाहकांचे थांबलेले प्रशिक्षण मात्र सुरू झाले नाही.

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात महिलांच्या हाती एसटीचे स्टेअरिंग येणार असल्याचे सांगून एसटी महामंडळाने सवंग प्रसिद्धी मिळवली होती. शिवाय माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, तत्कालीन परिवहन मंत्री आणि उच्च पदस्थ नेत्यांच्या उपस्थितीत सोहळा सुद्धा पार पडला होता. मात्र, आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमूळे सरळ सेवा भरतीतील 215 आणि 21 आदिवासी महिलांचे चालक तथा वाहकांचे प्रशिक्षण बंद असल्याने तब्बल 236 महिला कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात असल्याचे दिसून येत आहे.
 
चौदा वर्षांपूर्वी लोकलमध्ये त्यांचे पाकिट हरवले; अन् लॉकडाऊनमध्ये पोलिसांचा फोन आला की...

राज्यात 22 मार्चपासून कोरोनामुळे एसटी महामंडळातील सर्व प्रशिक्षण थांबवण्यात आले. त्यानंतर 22 मे पासून एसटीची जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरू झाली. काही प्रमाणात कार्यालय, कार्यशाळा पण सुरू झाल्या. परंतु चालक कम वाहकांचे थांबलेले प्रशिक्षण मात्र सुरू झाले नाही. आर्थिक बचतीसाठी 17 जुलैरोजी एसटी प्रशासनाने सर्व पदावरील प्रशिक्षण थांबविण्याच्या स्वंतत्र सूचना करून महिलांचे प्रशिक्षण थांबविण्यात आले. त्यामुळे या चालक  महिलांच्या उर्वरित प्रशिक्षण आणि उदरनिर्वाहाच्या आणि रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

लॉकडाऊनमुळे विणकामगार उपाशी; उत्सवच बंद असल्याने दोऱ्या विकणार कुणाला?

प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्या व मोलमजुरी करणार्‍या, खाजगी ठिकाणी तुटपुंज्या पगारावर नोकरी करणाऱ्या या महिला रोजगार मिळावा व एका वेगळ्या क्षेत्रात झेप घेण्याची संधी मिळावी म्हणून त्यांनी चालक कम वाहक या पदासाठी अर्ज केले होते. त्यांच्या हातात असलेले खासगी रोजगार सोडून या महिलांनी एसटी महामंडळातील चालक कम वाहक पदासाठी अर्ज केले होते. प्रशिक्षण कालावधीत विद्यावेतन मिळत नसताना स्वतः खर्च करून त्यांनी प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली होती. मात्र, मध्येच हे प्रशिक्षण थांबविण्यात आल्यामुळे त्यांचे भविष्य अंधारमय झाले असून एसटी महामंडळ लॉकडाऊनंतर प्रशिक्षण सुरू करेल की नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटीच्या प्रशिक्षीत महिला कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या राज्य महिला संघंटक शीला नाईकवाडे यांनी केली आहे. 

राज्यातील इतर 300 गडकोट-किल्ले संवर्धनाची जबाबदारी कोणाची? वाचा कोणत्या संघटनेने विचारला हा महत्वपुर्ण सवाल

2019 मध्ये राबविली होती भरती प्रक्रिया
एसटी महामंडळाने 2019 मध्ये प्रथमच चालक कम वाहक या पदावर महिलांची सरळ सेवा भरती राबविली होती. त्याअंतर्गत 215 महिलांची निवड करण्यात आली. महामंडळाने पहिल्यांदाच  महिलांना चालक कम वाहक या पदाद्वारे एसटीचे स्टेअरिंग हातात देण्याची संधी उपलब्ध करुन दिली. तर 23 ऑगस्ट 2019 रोजी प्रशासनातर्फे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचेहस्ते पुणे येथे या महिलांना चालक कम वाहक नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला होता.

गणेशोत्सवासाठी मुंबईतून गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 'ही' आनंदाची बातमी, नक्की वाचा

आदिवासी महिलांचे सक्षमीकरण रखडणार ?
राज्य शासनाने आदिवासी समाजातील महिलांचे सक्षमीकरण व्हावे, या हेतूने 21 आदिवासी महिलांना चालक म्हणून निवड केली होती. त्यांना रीतसर प्रशिक्षण देऊन सेवेत रूजू करण्यात येणार होते. मात्र, या आदिवासी महिला कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण रखडल्याने आता या महिलांच्या सक्षमीकरणावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

मुंबईकर, जाणून घ्या तुमच्या शहरातील कोरोनाची परिस्थिती

यापूर्वी मी एका कंपनीत जॉब करत होती. त्यानंतर 2019 मध्ये एसटीची परिक्षा देऊन निवड सुद्धा झाली आणि नियुक्ती पत्र सुद्धा मिळाले, तर 18 नोव्हेबर 2019 रोजी प्रशिक्षण सुद्धा सुरू झाले. त्यामध्ये 100 दिवस वर्ग प्रशिक्षण सुद्धा सुरू केले. दरम्यान विद्यावेतन सुद्धा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, विद्यावेतन मिळाले नाही. जवळचे सोने विकून आणि जमा केलेल्या पैशांतून प्रशिक्षण केले आहे. मात्र, आता प्रशिक्षण अपूर्ण राहिल्याने एसटीत नोकरी मिळणार की नाही अशी चिंता लागली आहे. 
- वैशाली तायडे, बुलढाणा विभाग

---
संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: training session of woman drivers in msrtc is stopped due to lockdown