नांगरे-पाटलांच्या SMS नंतर मुख्यमंत्र्यांनी केला मध्यरात्री फोन; म्हणाले 'विश्वासराव... '

Vishwas_Uddhav
Vishwas_Uddhav

मुंबई : मुंबईचे सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्‍वास नांगरे-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेसेज केल्यानंतर क्षणार्धात मुख्यमंत्र्यांनी नांगरे-पाटील यांना मध्यरात्री कॉल केला. निमित्त होतं नववर्षाच्या शुभेच्छांचं.  

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री सामान्य जनतेप्रमाणे मुख्यमंत्री ठाकरे आणि सहपोलिस आयुक्त नांगरे-पाटील यांनीही आपल्या जवळच्या व्यक्तींना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मध्यरात्री केलेल्या मेसेजला मुख्यमंत्र्यांनी तत्काळ फोन केल्याने नांगरे-पाटील यांना सुखद धक्का बसला. "विश्वासराव मला नवीन वर्षाची सुरवात माझ्या मुंबई पोलिस दलातील बहाद्दर जवानांसोबत करायची आहे. रात्रभर तुम्ही काम करून थकाल. मी दुपारी एक वाजता येतो,'' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी फोन ठेवून दिला. 

ही आठवण नांगरे-पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे सर्वांना कळवली. ते आपल्या पोस्टमध्ये सांगतात की, कोरोनाशी लढा देताना गेल्या वर्षभरात ९८ अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले. हजारोजणांनी योद्धयाप्रमाणे या आजाराशी झुंज दिली. कोरोना शहिदांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मिळणारी ५० लाख आणि पोलिस आयुक्तांच्या पुढाकाराने मिळणारी १० लाख रुपयांची मदत ही पथदर्शी आहे. अशा कर्मचाऱ्यांसाठी राज्याच्या प्रमुखांची अशी दिलासादायक भेट ही मनोबल वाढवणारी ठरली.

गेले वर्षभर दक्षिण मुंबईतील सुमारे ३०० जणांच्या चोरीला गेलेल्या मालमत्ता हस्तगत केल्या होत्या. मंगळसूत्र म्हणजे सौभाग्याचं लेणं! चोर ज्यावेळी असा दागिना खेचतो, त्यावेळी महिलेला मानसिक धक्का पोहोचतो. आमच्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्र्यांनी आम्ही चोरांकडून परत मिळवलेली २५ मंगळसूत्रे त्या भगिनींना देऊ केल्यावर त्यांच्या डोळ्यात अश्रू उभा राहिले.

यावेळी आमच्या उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. असाधारण सूचना पदक प्राप्त पोलिस उपायुक्त गणेश शिंदे आणि एएसआय मुनीर शेख यांचेही कौतुक झाले. एकंदरीत वर्षाची सुरुवात उमेद वाढवणारी ठरली, अशी भावना नांगरे-पाटील यांनी व्यक्त केली.

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com