Tanhaji Movie Review : तान्हाजीचे डायलॉग, ऍक्‍शन लय भारी!

Tanhaji
Tanhaji

चित्रपट - तान्हाजी...द अनसंग वॉरियर :

ऐतिहासिक चित्रपट बनविणे खूप खर्चिक आणि जोखमीचे काम असते. त्याकरिता खूप संशोधन आणि अभ्यास करावा लागतो. ऐतिहासिक चित्रपट बनविण्यात आताच्या काळात संजय लीला भन्साळी आणि आशुतोष गोवारीकर ही दोन नावे प्राधान्याने घ्यावी लागतील. त्यांनी आतापर्यंत इतिहासाची अनेक पाने चाळली आहेत. काही भव्य-दिव्य कलाकृती त्यांनी दिल्या आहेत आणि भविष्यातही देतील अशी आशा आहे.

आता ओम राऊतने 'तान्हाजी..द अनसंग वॉरियर' हा चित्रपट आणला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा शूरवीर मावळा. "आधी लगीन कोंढाण्याच मग माझ्या रायबाचं..'असं ठासून सांगणाऱ्या आणि स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सुभेदार तानाजी मालुसरे यांची ही वीरगाथा. चित्रपटाची कथा अशी- 

पुरंदर करारानुसार 23 किल्ले औरंगजेबाला (ल्यूक केनी)कडे सुपूर्द केले जातात. त्यामध्ये कोंढाणा (आताचा सिंहगड) किल्ल्याचा समावेश असतो. औरंगजेबासाठी कोंढाणा किल्ला राजनैतिकदृष्ट्या महत्त्वाचा असतो. या किल्ल्यावरून तो संपूर्ण दक्षिण भारतावर लक्ष ठेवू शकतो. त्याचवेळी मोघलांच्या ताब्यात गेलेला हा किल्ला मराठे जोपर्यंत ताब्यात घेणार नाहीत तोपर्यंत आपण अनवाणी राहणार अशी शपथ राजमाता जिजाबाई घेतात. हा किल्ला आपल्यासाठी महत्त्वाचा असल्यामुळे औरंगजेब या किल्ल्याच्या संरक्षणासाठी क्रूर पराक्रमी उदय भानला (सैफ अली खान) मोठा फौजफाटा घेऊन तेथे पाठवितो.

इकडे छत्रपती शिवाजी महाराज कोंढाणा परत मिळविण्यासाठी मोहीम आखत असतात. ते आपल्या मावळ्यांना या मोहिमेबद्दल आपला विश्‍वासू मित्र तान्हाजींना काही कळता कामा नये असे सांगतात; कारण तान्हाजी आणि त्याची पत्नी सावित्रीबाई (काजोल) आपल्या मुलाच्या अर्थात रायबाच्या लग्नाच्या गडबडीत असतात. लग्नाच्या घरात युद्धाची गोष्ट कळू नये आणि तेथे काही व्यत्यय येऊ नये म्हणून ते असा निर्णय घेतात. तरीही जेव्हा आपल्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी तान्हाजी शिवाजी महाराजांच्या दरबारी येतो तेव्हा त्याला या मोहिमेबद्दल समजते.

साहजिकच तो छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांच्याकडे आपणालाच या मोहिमेवर पाठविण्यात यावे, अशी त्यांना विनवणी करतो आणि हट्टही धरतो. मग तो त्या मोहिमेवर निघतो. त्यानंतर उदय भानशी त्याची घनघोर लढाई होते आणि पुढे काय होतो तो इतिहास सर्वांना ठाऊक आहे.

दिग्दर्शक ओम राऊत आणि त्याच्या टीमचे कौतुक. त्यांनी इतिहासाचे एक वेगळे पान रुपेरी पडद्यावर आणले. अजय देवगण, काजोल, सैफ अली खान, शरद केळकर, अजिंक्‍य देव, शशांक शेंडे, देवदत्त नागे या सगळ्याच कलाकारांनी समरसून अभिनय केला आहे. विशेष म्हणजे अजय आणि सैफ यांच्या अभिनयाची चांगलीच जुगलबंदी रंगलेली दिसते. दोन्ही कलाकार ग्रेट आहेत आणि त्यांनी डोळ्यांतून व्यक्त केलेले भाव पाहण्यासारखे आहेत. दोघांची ऍक्‍शन लय भारी आहे. 

काजोलच्या वाट्याला काही मोजकेच सीन्स आले आहेत आणि तिने नेहमीप्रमाणे ते सहजरीत्या केले आहेत. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी छान. चित्रपटात व्हीएफएक्‍सचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे तांत्रिक बाबतीत चित्रपट सरस ठरला आहे. 'हर मराठा पागल है शिवाजी राजे का...स्वराज्य का..और भगवे का..' असे दमदार आणि स्फूर्तिदायक संवाद चित्रपटात आहेत. चित्रपटाच्या कथेला चांगल्या पटकथेची साथ लाभली आहे. त्यामुळे चित्रपट कंटाळवाणा वाटत नाही. चित्रपटातील संगीत धमाकेदार झाले आहे. काही ठिकाणी दिग्दर्शकाने सिनेमॅटिक लिबर्टी घेतली आहे आणि चित्रपट करमणूकप्रधान करण्याचा प्रयत्न केला आहे.

चित्रपटाचा तामजाम मोठा आहे. भव्य-दिव्य सेट्‌स आणि कॉश्‍च्युम नजरेत भरणारे आहेत. चित्रपटातील काही गोष्टी खटकणाऱ्या आहेत; परंतु ही सुभेदार तान्हाजीची वीरगाथा प्रत्येकाने पाहायलाच हवी अशी आहे. 

दर्जा : चार स्टार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com