ऑन स्क्रीन : ‘लुई’ : मुक्तप्रवाही मालिका

लुई सी. के. या अमेरिकी विनोदी कलाकाराच्या विनोदात आत्मघृणेला कायमच महत्त्वाचे स्थान राहिलेले आहे.
Louie
LouieSakal
Summary

लुई सी. के. या अमेरिकी विनोदी कलाकाराच्या विनोदात आत्मघृणेला कायमच महत्त्वाचे स्थान राहिलेले आहे.

लुई सी. के. या अमेरिकी विनोदी कलाकाराच्या विनोदात आत्मघृणेला कायमच महत्त्वाचे स्थान राहिलेले आहे. सभोवतालची माणसे आणि घटनांकडे तटस्थपणे पाहत त्याविषयी अनोखी आणि तीव्र मते नोंदवत लोकांचा रोष ओढवून घेण्यात लुईला मजा वाटते. अगदी गुळगुळीत वाक्य वापरून सांगायचे झाल्यास, अतिशयोक्ती नि उपहासाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अंतर्मुख करण्याचे काम त्याने वेळोवेळी केलेले आहे. त्याचे अनेकविध कॉमेडी स्पेशल्स, त्याने निर्माण केलेल्या मालिका, इतकेच काय, तर त्याने अभिनय केलेल्या ‘ट्रम्बो’सारख्या चित्रपटातील भूमिकेमध्येही लुई सी. के.चा (खरेतर त्याच्या गेल्या चार दशकांच्या कारकिर्दीमध्ये त्याने निर्माण केलेल्या व्यक्तिमत्त्वाचा) हा विशिष्ट ठसा दिसून येतो. लुई सीकेच्या सबंध कारकिर्दीमध्ये त्याने बरेच महत्त्वपूर्ण काम केलेले असले, तरी ‘लुई’ (२०१०-१५) ही त्याने निर्माण केलेली मालिका त्याच्या कारकिर्दीचा सर्वोच्च बिंदू ठरते.

मालिकेमध्ये लुई सी. के. हा स्वतःच्याच आयुष्यावर आधारलेल्या एका कल्पोकल्पित लुईची भूमिका साकारतो. दोन लहान मुलींचा बाप असलेला हा घटस्फोटित लुई न्यू यॉर्कमध्ये राहणारा स्टॅंड-अप कॉमेडियन आहे. स्टेजवर अनेक क्लिष्ट संकल्पनांकडे उपरोधाने पाहत विनोदनिर्मिती करणारा लुई सभोवतालच्या बदलत्या जगातील घटनांचा अर्थ लावताना मात्र पुरता गोंधळून जाणारा एक माणूस म्हणून समोर येत राहतो. एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या आयुष्यावर आधारलेली भूमिका साकारणे, त्या व्यक्तीचे कॉमेडियन असणे यासारख्या काही बाबींमुळे ‘लुई’ वरकरणी लॅरी डेव्हिडच्या ‘कर्ब युवर एन्थुजिॲजम’सारख्या मालिकेच्या जवळ जाणारी वाटते. मात्र, ‘लुई’ ही ‘कर्ब युअर एन्थुजिॲजम’सारखी आखीवरेखीव नसून बरीचशी पसरट आहे. हा पसरटपणा या मालिकेला एक प्रकारचा मुक्तप्रवाहीपणा मिळवून देतो. याखेरीज प्रत्येक सीझननंतर ‘लुई’ अधिकाधिक तात्त्विक होत जाते. मानवी आयुष्य, त्यातील पुनरावृत्ती, मृत्यू व आत्महत्येविषयी भाष्य आणि आयुष्याचे गूढ स्वरूप अशा बऱ्याच संकल्पना मालिकेत ओघवत्या रूपात येतात.

‘लुई’चे सामर्थ्य हे तिच्यात जाणवणाऱ्या उपजत सहजतेमध्ये आहे. उदाहरणार्थ, संपूर्ण मालिकेत लुईच्या आयुष्यात येणाऱ्या निरनिराळ्या स्त्रियांशी निर्माण होणारे नातेसंबंध एरवी चित्रपट-मालिकांमध्ये दिसणाऱ्या स्त्री-पुरुष नात्यांहून ठळकपणे वेगळे आहेत. हे वेगळेपण नातेसंबंधांमधील गुंतागुंत लुई ज्या पद्धतीने सोडवते, त्यांना जे सूक्ष्म आणि अलवार कंगोरे प्राप्त करून देते, त्यात आहे. शिवाय, हे करत असताना मालिकेतील विनोदी अंग, लुईच्या मनातील आत्मघृणा आणि हतबलता, इ. बाबी अबाधित राखल्या जातात. कथानक, पात्ररचना, संगीत अशा अनेक स्तरांवर अस्तित्वात असणारी ही सहजता मालिकेतील स्थायीभाव आहे.

‘लुई’मध्ये लुई सी. के.च्या कलाकृतींमध्ये आढळणाऱ्या अनेकविध संकल्पना पुरेशा ताकदीनिशी दिसतात. पालकत्व आणि लग्न किंवा रोमॅंटिक नातेसंबंध याविषयी त्याच्या मनात असलेला भयगंड, आत्मघृणा, आयुष्याकडे पाहण्याचा निराशावादी दृष्टिकोन, क्वचित काही भागांमध्ये डोकावणारा अतिवास्तववाद, इत्यादी संकल्पना ‘लुई’चे अवकाश व्यापतात. या बाबतीत ‘लुई’वर असलेला वुडी ॲलन या अमेरिकन लेखक, दिग्दर्शक, कॉमेडियनचा प्रभाव ठळकपणे जाणवतो. न्यूयॉर्क हे शहर एक स्वतंत्र व्यक्तिरेखा म्हणून दिसणे, हे आणखी एक साम्य दोन्हीकडे आहे. या प्रेरणांखेरीज, गेल्या दशकातील एक महत्त्वपूर्ण अमेरिकन मालिका म्हणूनही ‘लुई’ पाहणे गरजेचे ठरते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com