KBC14 च्या मंचावर येणार कारगिल योद्धा,ज्याला डॉक्टरांनी केलं होतं मृत घोषित Amitabh Bachchan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amitab Bachchan Show Kaun Banega Crorepati 14 ,Indian Major D.P. Singh Story will inspire india

KBC14 च्या मंचावर येणार कारगिल योद्धा,ज्याला डॉक्टरांनी केलं होतं मृत घोषित

Kaun Banega Crorepati 14 'कौन बनेगा करोडपती'चा नवीन सिझन सुरु झाला आहे. ७ ऑगस्टला केबीसीच्या मंचावर स्वातंत्र्य दिनाचं सेलिब्रेशन केलं जाणार आहे. या खास दिनी आमिर खान, मेरी कॉम आणि मेजर डी.पी सिंग(D.P.SIngh) त्यांच्या संघर्षाची कहाणी शेअर करताना दिसणार आहेत. मेजर.डी.पी.सिंग देशाचे शूर सैनिक आहेत,जे मृत्यूला हरवून जिवंत परत आले आहेत.(Amitab Bachchan Show Kaun Banega Crorepati 14 ,Indian Major D.P. Singh Story will inspire india)

२६ जुलै,१९९९ चा दिवस, हा तोच दिवस ज्यादिवशी भारतीय सैन्याने आपल्या पराक्रमानं पाकिस्तानला आपल्यासमोर गुडघे टेकण्यास भाग पाडलं. कारगिल युद्ध जवळपास दोन महिने चाललं. या युद्धात कॅप्टन विक्रम बत्रा, कॅप्टन सौरभ कालिया, कॅप्टन मनोज पांडे अशा कितीतरी शूर वीरांना आपण गमावलं. तर दुसरीकडे याच युद्धातले असे कितीतरी हिरो आहेत, जे आज आपल्यासोबत आहेत,आणि ज्यांच्यामध्ये पहिल्यासारखाच दुश्मनांशी दोन हात करण्याचा जोश बाकी आहे.

याच बहादूर नायकांपैकी एक मेजर डी.पी.सिंग, ज्यांच्यासमोर शत्रूचा टीकाव लागला नाही. बोललं जातं की, जम्मू आणि काश्मिरच्या अनखूर सेक्टरच्या बॉर्डरवर असलेल्या एका पोस्टची जबाबदारी मेजर डी.पी.सिंग यांच्यावर होती. पाकिस्तानी पोस्ट त्यांच्या पोस्टपासून जवळपास ८० मीटरच्या अंतरावर होती. १५ जुलै रोजी पाकिस्तानकडून फायरिंग करण्यास सुरुवात झाली. मेजर आपल्या बंकरच्या बाहेर शत्रूशी दोन हात करण्यासाठी तैनात होते. मेजर डी.पी.सिंग यांचे भाग्य की ते पहिल्या हल्ल्यातून बचावले, पण पाकिस्तानकडून केल्या गेलेल्या दुसऱ्या हल्ल्यात ते जबरदस्त जखमी झाले.

पाकिस्तानकडून केल्या गेलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या मेजर डी.पी.सिंगना अखनूरच्या आर्मी हॉस्पिटलात तातडीनं दाखल केलं गेलं. पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पण बोलतात ना, 'देव तारी,त्याला कोण मारी'. हल्ल्यात मेजर डी.पी. सिंग यांच्या शरीराची खूप वाईट अवस्था झाली होती. त्यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांचा एक पाय देखील कापला गेला. खूप कळा सहन केल्या पण मेजर हिम्मत नाही हारले. तब्बल तीन दिवसानंतर मेजरना शुद्ध आली, ज्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. हा एक चमत्कार सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देणारा ठरला. एका मुलाखतीत मेजरनी आपला पुनर्जन्म झाला असं म्हटलं होतं.

निवृत्तीनंतरही मेजर डी.पी. सिंग यांच्यात तोच जोश पहायला मिळतो. ते म्हणतात, की मी ठरवलं होतं, एका पायावर मी आयुष्य जगून दाखवीन. एवढंच नाही तर एका पायाच्या सहाय्यानं २००९ मध्ये ते मॅराथॉनमध्ये देखील सहभागी झाले होते. केबाीसीच्या प्रोमोमध्ये डी.पी.सिंग बोलताना दिसत आहेत की,जेव्हा ते जखमी झाले,तेव्हा प्रत्येक जाती-धर्माच्या माणसानं त्यांना रक्त दिलं. त्यामुळे त्यांच्या शरीरात देशाचं रक्त वाहतंय. डी.पी.सिंग आपल्या यशाचं श्रेय शासनाला आणि आपण घेतलेल्या सैन्याच्या ट्रेनिंगला देतात.

केबीसीच्या मंचावर डी.पी.सिंग यांनी सांगितलं आहे की,माझ्या शरीरात ७३ जखमांच्या खुणा आजही स्पष्ट दिसतात. त्यांच्या वीरतेचे किस्से ऐकून तर अमिताभ बच्चन यांनीही टाळ्या वाजवत त्यांना सलाम केला.