'मुगल-ए-आझम'ला 60 वर्षे पूर्ण;  चित्रपटाची पटकथा ऑस्करच्या ग्रंथालयात होणार जतन... 

संतोष भिंगार्डे
Wednesday, 5 August 2020

'मुगल-ए-आजम' हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलं. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, सेट, कलाकारांचा अभिनय, चित्रपटातील गाणी या सगळ्यांनीच प्रेक्षकांची मनं जिंकली.

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील एक भव्यदिव्य कलाकृती म्हणजे 'मुगल-ए-आझम' हा सुप्रसिद्ध चित्रपट. आज या चित्रपटाच्या रिलीजला 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. 5 ऑगस्ट 1960 रोजी हा चित्रपट पडद्यावर आला आणि आजही तो बॉलिवूडमध्ये बनवलेल्या महान चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. के. आसिफ दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटात पृथ्वीराज कपूर, दिलीपकुमार, मधुबाला आणि दुर्गा खोटे यांनी भूमिका साकारल्या आहेत. हा एकमेव भारतीय चित्रपट आहे ज्याचे शूटिंग अनेक वर्ष चालू होते. भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अनमोल ठेवा म्हणून 'मुगल-ए-आझम'ची पटकथा ऑस्कर लायब्ररीत संग्रहित करण्यात आली आहे.

मुंबईची लाईफलाईन पुन्हा ठप्प; तीनही रेल्वेमार्गावर पाणी भरले...

याबद्दल बोलताना के. आसिफ यांचा मुलगा अकबर आसिफ यांनी सांगितले की, "मुगल-ए-आझम चित्रपटाची पटकथा अमन, कमल अमरोही, वजहात मिर्झा, एहसान रिझवी आणि के. आसिफ यांनी लिहिलेली आहे. 'मुगल-ए-आझम'चा प्रवास हिंदी चित्रपटसृष्टीत जन्मलेल्या महान लेखकांनी लिहिलेल्या शब्दांनी सुरू झाला आणि मला वाटते की त्यांचा सन्मान करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे जगातील नामांकित फिल्म लायब्ररीत त्यांची पटकथा कायमची जतन करणे होय. मला वाटते की पुढच्या पिढ्यांनी माझ्या दिवंगत वडिलांच्या आणि 'मुगल-ए-आझम' चित्रपट लिहिलेल्या लेखकांच्या टीमच्या कामातून शिकून त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. ही पटकथा स्वीकारल्याबद्दल मला अकादमी पुरस्कारांचे नम्रपणे आभार मानायचे आहेत."

नवी मुंबई आयुक्तांचा कामाचा धडाका, कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरु

'मुगल-ए-आजम' हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलं. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, सेट, कलाकारांचा अभिनय, चित्रपटातील गाणी या सगळ्यांनीच प्रेक्षकांची मनं जिंकली. मूळतः ब्लॅक अँड व्हाईट असलेल्या या चित्रपटाची रंगीत आवृत्ती 2004 साली थिएटरमध्ये पुन्हा रिलीज करण्यात आली. त्यानंतर 2016 मध्ये या फिल्मवर आधारित अधिकृत लाइव्ह संगीत नाटक शापूरजी पालनजी ग्रुपनी रंगमंचावर आणले जे फिरोज अब्बास खान यांनी दिग्दर्शित केले आहे. यावरून मुगल-ए-आजम चित्रपटाने
प्रेक्षकांना किती प्रभावित केले आहे याचा साक्षात्कार होतो.
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood movie mugal-e-azam completes sixty years, script will store in oscar library