सुशांतच्या आत्महत्येनंतर दिग्दर्शकाने केला सलमानवर आरोप, बॉलिवूडमध्ये नव्या #Meetoo ची सुरुवात?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

दबंग चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव सिंग कश्यप यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये खळबळजनक आरोप केले आहेत.  तसंच #metoo सारखी मोठी चळवळ सुरु होण्याची भीतीही व्यक्त केली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर नैराश्यावर जितकी चर्चा झाली त्याहून अधिक आता फिल्म इंडस्ट्रीमधील एक वेगळी बाजूच समोर येत आहे. करण जोहरने आपण सुशांतला फोन करू शकलो नाही याबाबत स्व:ताला दोष दिला. पण त्यानंतर कंगना राणावत, निखिल द्विवेदी, बबिता फोगट यांनी फिल्म इंडस्ट्रीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यातच आता दबंग चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव सिंग कश्यप यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये खळबळजनक आरोप केले आहेत. अभिनव यांनी म्हटलं की, वायआरएफ सारख्या संस्था कलाकाराचे करिअर बनवत नाहीत तर बिघडवतात. तसंच या पोस्टला पोलिस स्टेटमेंट म्हटलं तरी चालेल असंही लिहिलं आहे.

'सुशांतच्या आत्महत्येस हिंदी चित्रपटसृष्टी जबाबदार'; कंगनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील लाॅबीवर ओढले ताशेरे

सुशांतच्या आत्महत्येनं फिल्म इंडस्ट्रीतील मोठी समस्या समोर आली आहे. ज्याच्याशी जवळपास सगळेच लढत आहेत. प्रत्यक्षात असं कोणतं कारण असू शकतं की कोणाला आत्महत्या करण्यासाठी मजबूर व्हावं लागेल? मला भीती आहे त्याच्या मृत्यूनंतर #metoo सारखी मोठी चळवळ सुरु होईल. बॉलिवूडमध्ये भेदभाव, ठराविक लोकांचे वर्चस्व, फिल्म इंडस्ट्रीतील, इंडस्ट्रीच्या बाहेरचा, मोठ्या कुटुंबातील, कोणी गॉडफादर असलेला तर कोणी अभिनयाच्या जोरावर आलेला अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कंगना राणावत, कोएना मित्रा, अनुभव सिन्हा, निखिल द्विवेदी, सपना मोती भवनावनी, बबिता फोगट यांच्यासारख्या अनेकांनी प्रश्न विचारले आहेत.

सुशांतला आत्महत्या करायला भाग पाडलं? बॉलिवूडची काळी बाजू येतेय समोर

अभिनव कश्यप यांनी म्हटलं की, बहुतेक YRF एजन्सीने सुशांत सिंगला हे पाऊल उचलायला भाग पाडलं आहे. या प्रकरणाची अशा अँगलने चौकशी व्हायला हवी. या संस्था कलाकाराचे करिअर बनवत नाहीत तर बिघडवतात. मी बऱ्याच काळापासून हे भोगलं आहे. हे न बोलता कोड ऑफ कंडक्ट आहे. अशा संस्था कलाकारासोबत करार केल्यानंतर मनमानी कारभार करतात. 

दबंग चित्रपटाच्यावेळी आलेला अनुभव अभिनव यांनी शेअर केला आहे. यात त्यांनी म्हटलं की, दबंग चित्रपट निर्मितीवेळी माझ्याशी असंच झालं. अरबाज खान, सोहेल खान आणि त्यांचे कुटुंब मला धमकी देत होते. एवढंच नाही तर माझं करिअरही कंट्रोल करायचं होतं. अरबाजने यानंतर माझ्या दुसऱ्या चित्रपटाचं कामही काढून घेतलं होतं. यामुळे माझं नुकसान झालं आणि दबंग रिलिज करताना मला चुकीचं ठरवून प्रसिद्धी केली गेली. 

हेही वाचा: का..का..का..? सुशांत असं का केलंस?..अमिताभ बच्चन यांनी लिहिला ब्लाॅग...

अभिनव कश्यप म्हणाले की, माझ्या वैयक्तिक आयुष्यात बरेच चढ उतार झाले आणि एवढ्यावरच थांबलं नाही. मला वेगवेगळ्या नंबरवरून धमक्याही दिल्या गेल्या. तेव्हा मी पोलिसांत तक्रार दिली होती. सुशांतच्या आत्महत्येनंतर आता या लोकांना समोर आणणं गरजेचं आहे जे मनमानी कारभार करून कलाकारांशी असं वागतात. या लोकांमध्ये सर्वात वर सलमान खान असल्याचा आरोपही अभिनव यांनी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dabbang director abhinav kashyap fb post on sushant singh rajput