FILM REVIEW- 'खुदा हाफिज' : अधिक ताणलेली छोटीशी गोष्ट 

संतोष भिंगार्डे
Friday, 14 August 2020

विद्युत जामवालने काहीसा हतबल आणि असहाय अशा पतीची भूमिका दमदार साकारली आहे. शिवालिका ओबेरॉयही नर्गीसच्या भूमिकेत छान दिसली आहे. तिच्या वाट्याला काही मोजकेच सीन्स आलेले आहेत. 

अभिनेता विद्युत जामवालने आतापर्यंत अॅक्शनबाज भूमिका केल्या आहेत. त्याच्या प्रदर्शित झालेल्या एकूणच चित्रपटांवरून ते दिसून येते. मुळात विद्युत मार्शल आर्टसमधये तरबेज आहे आणि त्याची कमांडो, जंगली अशा काही चित्रपटातील अॅक्शन सीन्स डोळ्यांचे पारणे फेडणारे आहेत. परंतु खुदा हाफीज या चित्रपटामध्ये त्याने काहीशी वेगळी भूमिका केली आहे आणि या भूमिकेला त्याने योग्य असा न्यायदेखील दिला आहे. फारूख कबीरने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. फिर भी दिल है हिंदुस्थानी, प्यार इश्क और मोहब्बत अशा काही चित्रपटासठी फारूकने सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. 

कामगार तर मुंबईत परतायत; मात्र हाताला पुरेसे कामच नसल्याने करायचे तरी काय?

खुदा हाफीज हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. एका वर्तमानपत्रात त्याने याबाबतची बातमी वाचली आणि तेव्हाच फारूख कबीरने ठरविले की या घटनेवर चित्रपट काढायचा. त्यादृष्टीने त्याने कथेवर काम सुरू केले आणि कलाकार तसेच अन्य बाबी फायनल होताच चित्रपट पूर्णदेखील केला. आता हा चित्रपट डिस्नी हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. समीर चौधरी (विद्युत जामवाल) आणि नर्गीस चौधरी (शिवालिका ओबेरॉय) हे या चित्रपटात पती आणि पत्नी आहेत. ते दोघेही एका कंपनीत कामाला असतात. अचानक आर्थिक मंदीचे वारे सगळीकडे वाहू लागतात आणि त्याचा फटका या दोघांच्याही कंपनीला बसतो. अचानक दोघांना कामावरून डच्चू देण्यात येतो. 

मुंबईकरांनो काळजी घ्या! मलेरिया फोफावतोय, जुलै महिन्यात रुग्णांमध्ये दुपटीने वाढ...महापालिकेचे आवाहन

साहजिकच ते दोघेही खूप निराश आणि हताश होतात. या परिस्थितीतून बाहेर पडावे आणि अधिकाधिक पैसे कमवावेत याकरिता ते दोघेही परदेशात जाण्याचा निर्णय घेतात. त्यासाठी ते एका एजंटला भेटतात आणि त्याच्यामार्फत नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करतात. कर्मधर्मसंयोगाने पहिल्यांदा नोकरी मिळते ती नर्गीसला. खरंतर समीर तिला एकटीला तेथे पाठविण्यास तयार नसतो. परंतु हातात आलेली संधी जाऊ नये याकरिता तो तयार होतो. नर्गीस लकनौहून परदेशात जाण्यास निघते. तेथे ती पोहोचते आणि नंतर अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडतात. 

ठाणेकर तयारी करा! उद्यापासून 'या' वेळेत सुरु होतील दुकानं, असे असतील नियम

परदेशात गेल्यानंतर नर्गीस बेपत्ता होते आणि मग तिला शोधण्यासाठी समीरदेखील तेथे जातो. तेथे पहिल्यांदा त्याची भेट टॅक्सीचालक (अन्नू कपूर) बरोबर होते. मग तो टॅक्सीचालक आणि समीर नर्गीसचा शोध घेतात का? नर्गीस बेपत्ता झालेली असते का? झाली असेल तर तिचे अपहरण कोण आणि कशासाठी करते? या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी 'खुदा हाफीज' हा चित्रपट पाहावा लागेल. हा चित्रपट म्हणजे खऱ्या प्रेमाची परीक्षा पाहणारा, एकमेकावार जीवापाड प्रेम करणाऱ्या नवपरिणित दाम्पत्याची कथा आहे. विद्युत जामवालने काहीसा हतबल आणि असहाय अशा पतीची भूमिका दमदार साकारली आहे. शिवालिका ओबेरॉयही नर्गीसच्या भूमिकेत छान दिसली आहे. तिच्या वाट्याला काही मोजकेच सीन्स आलेले आहेत. 

सामनाचा आजचा अग्रलेख 'आजोबा- नातवा' वर, शिवसेनेला वाटतंय...

संपूर्ण चित्रपटात अधिक भाव खाऊन गेले आहेत अन्नू कपूर. ते अष्टपैलू कलाकार आहेत आणि आपल्या प्रत्येक भूमिकेत ते त्यांनी सिद्ध केले आहे. या चित्रपटातील उस्मान अली या टॅक्सीचालकाची भूमिकाही त्यांनी खुमासदार साकारली आहे. शिव पंडित, आहना कुमरा आदी कलाकारांनी चांगलाच हातभार या चित्रपटाला लावला आहे. मात्र, चित्रपटाच्या कथेचा जीव छोटा आहे आणि दिग्दर्शकाने नको तेवढा चित्रपट खेचला आहे. एखाद्या उत्तम कथेवर पटकथा बांधताना सारासार याचा विचार होणे आवश्यक होते. ते झालेले दिसत नाही. बाकी चित्रपटातील संगीत, चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी अगदी उत्तम आहे. हरवलेल्या प्रेमाची उत्कंठावर्धक कथा आहे. या प्रेमकथेला अॅक्शनची फोडणी दिग्दर्शकाने देण्याचाही प्रयत्न केला आहे. 

रेटिंग : तीन स्टार
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: film review about newly release bollywood movie khuda hafiz