येथील मॅटिनी शोज आता आठवणीपुरतेच; ताडदेवचे गंगा-जमुना थिएटर झाले जमीनदोस्त

येथील मॅटिनी शोज आता आठवणीपुरतेच; ताडदेवचे गंगा-जमुना थिएटर झाले जमीनदोस्त

मुंबई : लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहे कधी सुरु होतील, याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. येत्या एक-दोन महिन्यात ते सुरु झाले तरी प्रेक्षक चित्रपट बघायला येतील का हाही मोठा प्रश्न आहे. त्यामुळे चित्रपटगृह मालकांच्या विशेषतः सिंगल स्क्रीन चित्रपटगृह मालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सिंगल स्क्रीन चित्रपटगृहाकडे प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी मिळत आहे. त्यामुळे चेंबूर येथील सहकार चित्रपटगृह नुकतेच बंद झाले आणि आता त्यापाठोपाठ गेली काही वर्षे बंद असलेले ताडदेव येथील गंगा-जमुना हे जुळे चित्रपटगृह काल जमीनदोस्त करण्यात आले. कोरोना महामारीचा अधिक फटका मल्टिप्लेक्सपेक्षा सिंगल स्क्रीनला बसलेला आहे. आता आणखी अनेक सिंगल स्क्रीन बंद पडण्याची शक्यता आहे.  

सन 1970-71 दरम्यान गंगा-जमुना चित्रपटगह उभे राहिले. मुंबईत अनेक ठिकाणी जुळी किंवा तिळी चित्रपटगृहं आहेत. त्यांची सुरुवात गंगा जमुनामुळे झाली होती. त्या काळात वातानुकूलित असलेल्या या चित्रपटगृहाची सुरुवात ‘हरे रामा, हरे कृष्णा’ या सुप्रसिद्ध चित्रपटापासून झाली. दोन्ही चित्रपटगृहांची आसनव्यवस्था जवळपास आठशे होती. अनेक चित्रपटांनी तेथे रौप्यमहोत्सवी आणि सुवर्णमहोत्सवी यश मिळविले आहे. सुहाग, मि. नटवरलाल, दोस्ताना, कालिचरण, खुद्दार, सबसे बडा रुपय्या असे कित्येक चित्रपट या चित्रपटगृहात लागले आणि सुपरडुपर हिट ठरले. राजश्री प्रॉडक्शनचे चित्रपट येथे मॅटिनी शोला अधिक प्रदर्शित होत असत. 

गेल्या काही वर्षांपासून हे चित्रपटगृह बंद होते. सन 2008 मध्ये या चित्रपटगृहाची पुनर्बांधणी करण्यात येणार होती. त्याबाबतचा आराखडाही तयार झाला होता. मात्र, त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. अखेर काल हे चित्रपटगृह पाडण्यात आले. या चित्रपटगृहाचे मालक गुल आचरा म्हणाले, की पालिकेची परवानगी घेऊनच चित्रपटगृह पाडण्यात आले आहे. आता त्या जागी नेमके काय बांधणार आहोत याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. सध्या कोरोनामुळे बाहेरही कुठे जाता येत नाही. शिवाय चित्रपटगृहात प्रेक्षकही म्हणावे तसे येत नाहीत. हल्ली प्रेक्षक मोबाईलवर घरच्या घरी चित्रपट पाहणे पसंत करतो. त्यामुळे चित्रपट पाहायला थिएटरात येत नाही. आता तेथे काय बांधणार याचा निर्णय लवकरच घेऊ.
---
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com