Bandish Bandits Review: 'जुनं ते सोनं म्हणून ते हवं' असा अट्टाहास असणारी 'बंदिश बँडिट'!

युगंधर ताजणे
Sunday, 22 November 2020

बंदिश बँडिटमध्ये रागदारी, लयकारी, त्यातील उत्कटता हे सारं आहे. राजस्थानातील एका शहरात घडणारं हे सारं कथानक आपल्या मनाचा ठाव घेणारे आहे.

पुणे : पंडित राधे मोहन राठोड हे पूर्ण राजस्थानची शान आहेत. त्यांच्या शब्दाला मान आहे. त्यांची गायकी प्रसिध्द आहे. ते आपल्या वेळ आणि शब्दांचे पक्के आहेत. संगीत त्यांच्यासाठी पूजा आहे. तो केवळ स्वर नाही तर त्यांच्या जीवनाचे सार आहे. मात्र त्यांचा नातू राधे हाही त्यांच्या सारखाच ध्येयवादी. वयानुसार थोडा अल्लड आहे. पंडितची त्याच्यावर लक्ष ठेऊन आहेत. आपल्या राजस्थानी घराण्याच्या गायकीची परंपरा नेण्याची क्षमता ही राधेमध्ये आहे हे पंडितजी ओळखून आहेत. परिस्थिती अशी काही बदलते त्यामुळे सगळा 'सूर' बदलून जातो. तो कसा यासाठी बंदिश बँडिट पाहावी लागेल.

बॉलिवूड सोडलेल्या अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न; पाहा VIDEO​

अॅमेझॉन प्राईमवर काही दिवसांपूर्वी आलेल्या या मालिकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. वेगळी कथा, प्रभावी अभिनय, सुश्राव्य संगीत, आकर्षक संवाद यामुळे ही वेबसीरीज लक्षात राहते. पारंपारिक आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम या मालिकेत पाहता येतो. राधेला आपल्या घराण्याचा वारसा पुढे न्यायचा आहे, मात्र त्याला नव्याने बदलणा-या संगीतालाही आपलंसं करायचं आहे. त्यासाठी त्याचा आटापिटा सुरु आहे. करड्या शिस्तीच्या पंडितजींच्या नजरेला नजर देण्याचं बळ अद्याप त्याच्यात आलेलं नाही. काही झालं तरी चालेलं पण रियाजात खंड पडता कामा नये हा पंडितजींचा नियम तो मोडतो. त्यानंतर राधेला घ्यावं लागलेलं प्रायश्चित त्याची परिक्षा पाहते. 

'हरिव्दारला गेले होते त्यावेळी तिथे मंदिरात माझ्यासोबत...'

तमन्नाचं एक स्वप्न आहे. तिला एकदा का होईना एलेच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये गायचं आहे. त्या स्वप्नाचा पाठलाग करत असताना ती राजस्थातील जोधपूरमध्ये येऊन पोहचते. आता यापुढे तिलाही माहिती नाही की आपल्याला किती वळणा वळणाचा प्रवास करावा लागणार आहे ते. एकीकडे परंपरागत संगीत, दुसरीकडे नव्या जमान्याचे संगीत याच्यातून मध्यम मार्ग काढण्यासाठी चाललेला संघर्ष या मालिकेचं एक महत्वाचं सुत्र आहे. नवं की जूनं कोणतं संगीत श्रेष्ठ, परंपरा मोडीत काढायची तर त्यामुळे दुखावले गेलेल्यांची समजूत कशी काढायची हा काही राधे आणि तमन्ना पुढील प्रश्न नाही. तर पंडितजींच्या हवेलीतील त्या प्रत्येक माणसाचा आहे. हे ही मालिका पाहत असताना आपल्या लक्षात येते.

आता काय बोलायचं,प्रसिध्द कलाकारानं चारवेळा केला आत्महत्येचा प्रयत्न​

बंदिश बँडिटमध्ये रागदारी, लयकारी, त्यातील उत्कटता हे सारं आहे. राजस्थानातील एका शहरात घडणारं हे सारं कथानक आपल्या मनाचा ठाव घेणारे आहे. या मालिकेत भूमिका करणा-या नसरुद्दीन शहा, अतुल कुलकर्णी, श्रेया चौधरी, ऋत्विक भूमिक यांनी कमाल केली आहे. प्रत्येक भाग संपल्यानंतर लक्षात राहतो तो पात्रांचा अभिनय. दिग्दर्शक आनंद तिवारी यांनी मोठ्या कलात्मकरित्या ही मालिका दिग्दर्शित केली आहे. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या काही मालिकांपैकी या मालिकेचा विषय थोडा वेगळा आहे. शास्त्रीय संगीतात रस असणा-यांना ही मालिका विशेष भावेल यात शंका नाही. 

पंडितजींना आपलं संगीत आणि घराणं याबद्दल विशेष प्रेम आहे. कुठलाही प्रसंग आला तरी तत्वांशी तडजोड करायची नाही हा त्यांचा करारीबाणा घरातील अनेकांचा विरोध ओढावून घेतो. पंडितजींनी त्यांच्या तीन दशकांच्या संगीत कारकीर्दित केवळ आठ जणांचे गठबंधन केलं आहे. यावरुन त्यांचा शिस्तप्रिय स्वभाव लक्षात येईल. सप्तसुरांच्या सुरावटीत फिरणा्-या अशा एका आगळया वेगळ्या राग दरबारीचा प्रवास प्रेक्षकांनी एकदा करुन पाहायला हरकत नाही.

(सौजन्य : यू-ट्यूब)

- मनोरंजन क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Musical Amalgamation Bandish Bandits review by Yugandhar Tajane