नाशिक कला कट्टा : कलाकारांचा कलेशी अन् वाचकांशी संवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Singer Sachin Chandratre

नाशिक कला कट्टा : कलाकारांचा कलेशी अन् वाचकांशी संवाद

'पुण्यभूमी' अशी आपल्या नाशिकची मूळ ओळख ! परंतु आता ही ओळख एक 'कलाभूमी' अशीही होऊ लागली आहे ... विविध प्रायोगिक आणि दृकश्राव्य कलांची उपासना करणारे अनेक साधक ही नवी कलात्मक ओळख आपल्या नगरीस देत आहेत.

अभिजात कला-विचार दर्शनाने, आपापले क्षेत्र समृद्ध करणा-या अशा कलाकारांशी आणि त्यांच्या कलेशी संवाद साधणारे हे सदर म्हणजेच "नाशिक कला कट्टा ..."

संगीत, चित्र, शिल्प, अशा काही कला प्रांगणांमध्ये तरुणाईच्या नजरेतून केलेली ही मुशाफिरी ... आजच्या तरुणाईचा, कलेकडे वाढणारा ओढा, तसेच, त्यांचे 'घडणे' आणि 'बिघडणे' डोळ्यासमोर ठेवून, आपापल्या कलेत गुणवत्ता कशी आणता येईल याचे तंत्रमंत्र उलगडणारे... "नाशिक कला कट्टा ..." (Nashik Kala Katta Artists interaction with art and readers interview by trupti chavare tijare of classical singer sachin chandratre nashik manoranjan news)

हेही वाचा: Shahid Kapoor च्या घरात भाड्यानं राहणार कार्तिक आर्यन..एका महिन्याचं भाडं ऐकाल तर फिरतील डोळे..

आज आपण संवाद साधणार आहोत अष्टौप्रहर या काळाराम मंदिर संगीत महोत्सवात ध्रुपद गायकीने आपल्या कलेची आगळीवेगळी छाप पाडणाऱ्या ध्रुपद गायक सचिन चंद्रात्रे यांच्याशी ‌...

मुलाखत - तृप्ती चावरे-तिजारे

प्रश्न - ध्रुपद गायकी म्हणजे नेमके काय ?

उत्तर - ध्रुव म्हणजे अढळ आणि पद म्हणजे वर्णाक्षरांची पाऊले, अर्थात गाणे .. ख्याल संगीताचे जनकत्व ज्या गायकीकडे आहे तिला "ध्रुपद"असे म्हणतात. आज ही गायकी ऐकणे दुर्मिळ झाले असले तरी भारतीय गायनातील मुळाक्षरे आणि राग गायनाचे शुद्धत्व याच गायकीत दडलेले आहेत ...

प्रश्न - असे म्हणतात की, भावभावनांचा शृंगार नसलेली काहीशी रूक्ष अशी ही गायकी आहे, हे खरे आहे का ?

उत्तर - होय. या गायकीत उत्शृंखल किंवा मादक सौंदर्य नाही कारण मूळतः ही 'मंदिर गायकी' आहे. भक्तीभावाच्या रसपरिपोषाने अलौकिकत्वाची प्रचिती देणारी, अंतर्मुख करणारी अशी ही गायकी आहे ...

हेही वाचा: Ameya Khopkar: असा चित्रपट आजवर मराठीत झालाच नाही! अमेय खोपकर ट्विट करत म्हणाले..

प्रश्न - ख्याल गायकीपेक्षा ही गायकी वेगळी कशी ?

उत्तर - ख्याल गायकी ही फार अलिकडे उदयास आली. त्या आधी ध्रुपद गायकीच प्रचारात होती. नोमतोम आलापीपासूनच लयदार गायकी हे या शैलीचे वैशिष्ट्य ... या आलापीतील "री द न ना" हे निरर्थक वर्ण म्हणजे वेदमंत्रातील बीजाक्षरे आहेत ... संगीताचे विलोभनीय अखंडत्व सिद्ध करणारी अशी ही गायकी आहे ...

प्रश्न - ध्रुपद गायकीत काही वेगळ्या प्रकारे सूर लावले जातात का ?

उत्तर - होय. त्यालाच सुरांचे 'लगाव' असे म्हणतात. एका सुराचा दुसऱ्या सुराशी असलेला संवाद उलगडत, रागातील सूर हे जणू एक कुटुंब आहे अशा पद्धतीने एका व्यक्तिमत्त्वाचा दुसऱ्या व्यक्तिमत्वाशी संवाद सुरू असतो ... हा संजीवन सूरसंवाद प्रस्थापित व प्रसारित करण्याचा आनंद गायक अथवा वादक घेत असतो आणि देत असतो ...

प्रश्न - आजच्या काळात ही गायकी गाणे आपल्याला आव्हानस्पद वाटते का ?

उत्तर - होय नक्कीच. सौंदर्य बाजूला ठेवून गायनाचा शुद्ध भाव शोधणे व तो जपणे फार कठीण आहे. ज्याप्रमाणे तबलावादनात कायदा पाळला जातो त्याचप्रमाणे ध्रुपदाच्या बंदिश गायनात देखील कायदा पाळवा लागतो, कल्पनाप्रांताला फारसा वाव नसतो, कायद्याच्या चौकटीत बसेल त्या लयकारीच्या अंगाने ही प्रयोगात्मक कला शुद्ध स्वरूपात सादर करणे हे मला आव्हानस्पदच वाटते.

हेही वाचा: Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांसोबत रीलवर थिरकणारा रियाज आहे तरी कोण?

प्रश्न - शृंगार नाही, सौंदर्य नाही, भावपक्ष नाही, केवळ शुद्धत्वाच्या जोरावर ही गायकी किती तग धरेल असे तुम्हाला वाटते ?

उत्तर - नेमका हाच प्रश्न मला काळाराम मंदिरात विचारण्यात आला होता. त्यांना मी एक उदाहरण दिले. विज्ञान खूप पुढे गेलेले आहे, आणि चकाकणारे अनेक रंगदेखील बाजारात उपलब्ध आहेत.

ते रंग काळाराम मंदिराच्या दगडावर आपण लावले का ? नाही. कारण शिल्पकलेतील त्या दगडी, पाषाण-सौंदर्याचे जतन झाले पाहिजे असे आपल्याला वाटते. होय ना ? हे झाले शिल्प ह्या 'दृश्य' कलेबाबत. मग असाच विचार आता आमच्या गायन या 'श्राव्य' कलेबाबत का करू नये ?

प्रश्न - एकंदरच, शास्त्रीय गायकीचा रसिक वर्ग यामुळे वाढेल असे आपल्याला वाटते ?

उत्तर - हो नक्कीच. पण यासाठी, ज्यांच्यात क्षमता आहे अशा कलावंतांनी गुणवत्तापूर्ण कला सादर करण्याचा आग्रह धरला पाहिजे. सध्या रसिकांच्या अभिरुचीच्या कक्षा रूंदावण्याऐवजी संकुचित होत आहेत. कारण त्यांना शुद्ध संगीत ऐकविलेच जात नाही. 'मनोरंजन' आणि 'करमणूक' यातला फरक, काही अपवाद वगळता, बरेचसे कलाकार नजरेआड करू लागले आहेत.

'कराओके' च्या नावाखाली एक उथळ विदुषकी समाज, संगीत कलेला, सुरांच्या आणि कलेच्या परिघाबाहेर फरफटत घेऊन चाललेला आहे. भावसंगीताच्या सौंदर्याशी झोंबाझोंबी करायचा हल्ली जो खेळ सुरू झाला आहे, तो मला बघवत नाही. म्हणून मी दुसऱ्या टोकाशी कलेची शुद्धता, माझ्यापुरती तरी मनापासून घट्ट पकडून ठेवलेली आहे.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

हेही वाचा: Swapnil Joshi: मराठी भाषेवरनं स्वप्निलची नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले,'जोशी..'

प्रश्न - ध्रुपद ही गायकी फक्त मंदिरांमधूनच सादर होते, हे खरे आहे का ?

उत्तर - हो. मंदिर परंपरेतील ध्रुपद हे मागच्या पिढीपर्यंत मंदिरातच गायले जात असे. आजची मंदिरे बदलत चालली आहेत. दुर्दैवाने जी मंदिरे पारंपारिक होती, ती पारंपारिक न राहता झपाट्याने 'आधुनिक' होत चालली आहेत.

दृश्य व श्राव्य अभिजात कलांचे मंदिरातून आयोजित करण्यापेक्षा खूपशा मंदिरांमधून कर्कश्य आवाजात स्पीकरवर आरत्या व गाणी लावली जातात, ऑर्केस्ट्रा आणि भावगीतांचे कार्यक्रम ठेवले जातात. नवीन विचारांच्या आयोजकांनी 'उत्सव' आणि 'इव्हेंट' यातला फरक लक्षात घेतला पाहिजे.

ध्यानासाठी, दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा 'स्वसंवाद' घडवून आणण्यासाठी शास्त्रीय ध्रुपद गायनाद्वारे पोषक वातावरण तयार केले पाहिजे. आम्हाला मंदिरात गायला मिळत नाही म्हणून, जिथे शास्त्रीय संगीताचा आणि भक्तीभावाचा आदर केला जातो अशा व्यासपीठांवरून आजकाल आम्हाला ध्रुपद गायन सादर करावे लागते.

प्रश्न - नाशिक नगरीत ध्रुपद गायन शैलीचा प्रचार आपण कसा करता ?

उत्तर - रसिकांसाठी ध्रुपद रसास्वाद कार्यशाळा मी घेत असतो. मंदिरातून ध्रुपद गाण्याची व समजावून सांगण्याची माझी इच्छा आहे. तसेच ज्यांना राग संगीताची मूळ साधना करायची आहे त्यांना, स्वरचाचणीनंतर या शैलीचे टप्प्याटप्प्याने प्रशिक्षणही देण्याचा मानस आहे.

जिद्द, चिकाटी, सातत्य आणि शुद्धतेचे वेड असणाऱ्या कुणालाही ही गायकी सहज शिकता येईल. या गायकीचे अगदी प्राथमिक शिक्षण घेतले तरीही, गळा किंवा आवाज नेमका कसा चालवावा, हे समजायला लागते, आवाज तयार होतो, आणि कोणत्याही प्रकारच्या गायनाचा पाया पक्का होतो अशी माझी खात्री आहे.

प्रश्न - आपण स्वतः ख्याल गायकी उत्तम गात असताना, ध्रुपद शैलीकडे कसे वळलात ?

उत्तर - घराण्याची गायकी शिकवीत असताना मला माझे गुरु पं. गोविंदराव पलुस्कर यांनी पं. विष्णू दिगंबर पलूस्करांचे काही ध्रुपद-धमार शिकविले होते, काही मी स्वतःही बसविले होते. नाथद्वारा मंदिर परंपरेतील ध्रुपद मी पं. कृष्णशरण कुमावत यांच्याकडे शिकलो होतो.

डागर बंधूंची गायकी नेहमीच ऐकत असे, तसेच, इंटरनेटवरही मी या शैलीचा भरपूर अभ्यास केला. पुढे आवाजसाधना शिकण्यासाठी मी पं. राजेंद्र मणेरीकर यांचेकडे गेलो, आणि ही गायकी नेमकी कशी गायची ते उलगडत गेले.

आधी शिकलेल्याचा अर्थ समजत गेला व ख्याल गायकीपेक्षा हीच गायकी मला सोपी वाटू लागली, शिवाय ध्रुपद गायल्यानंतर, ख्यालही चांगले समजू लागले. 'दमसांस' आणि 'बोलबांट' याचा अभ्यास सहज होऊ लागला, म्हणून मी ध्रुपदाकडे वळलो.

हेही वाचा: Bhagya Dile Tu Mala: अखेर राज परीक्षेत पास! राज-कावेरीचा साखरपुडा दणक्यात..

प्रश्न - ध्रुपद गायकी शिकण्याआधी 'आवाज' शिकावा लागतो का ?

उत्तर - हो. आवाज हा शारीरिक विषय असून प्रत्येक गायकी शिकण्याआधी तो स्वतंत्रपणे शिकावा लागतो. आपला गळा आणि मन या दोन्ही गोष्टी अत्यंत नाजूक आहेत. त्या योग्य देखरेखीखाली घडवाव्या लागतात, नाहीतर बिघडण्याची अधिक शक्यता असते.

प्रश्न - ध्रुपद गायकीचे एक कला म्हणून भवितव्य काय ? यात करिअरच्या संधी कितपत आहेत ?

उत्तर - ध्रुपद गायकी ही कालही अस्तित्वात होती, आजही आहे आणि उद्याही राहणार. तिच्यात करियर आहे की नाही ते मला सांगता नाही येणार, पण ज्याची हिच्यावर भक्ती जडली, तोच ही गायकी गाणार ... हल्ली कोणत्याही क्षेत्रात करिअरची खात्री देता येत नाही.

संगीत ही तर एक साधना आहे, पूजा आहे. देवाची पूजा करतो तेव्हा त्या पूजेत करिअरची संधी शोधतो का आपण ? नाही ना ? इतके साधे आहे हे. कला ही आत्मिक प्रगतीसाठी असते.

जसे, मुलगा मोठेपणी डॉक्टर होणार की इंजिनियर, हे लहानपणी ठरत नसते, तर त्याचा अंदाज बांधण्यासाठी त्याला निदान दहावीपर्यंत तरी पुढे जावे लागते ... त्याप्रमाणेच कला शिकतांना, निदान दहा पावले तरी शिकत शिकत पुढे जावे लागते व नंतर करिअरचा विचार, जाणकारांशी चर्चा करून ठरवा लागतो.

प्रश्न - हल्लीच्या तरुण पिढीला, शालेय शिक्षण घेताघेताच, स्पोर्ट्स, स्पर्धा परीक्षा, ऑलिंपियाड, आणि एकाच वेळी अनेक प्रकारच्या कला शिकायच्या आहेत. अशा 'मल्टी-टास्कर्स' ना ध्रुपद शिकता येईल का ?

उत्तर - मुलांपेक्षा हल्ली पालकच महत्त्वकांक्षी होत चालले आहेत. मल्टी टास्कींगमुळे मुलांमध्ये, 'मला सगळेच येते' हा भ्रम तयार होण्याचा धोका असतो ... कला शिक्षणात असे भ्रम चालत नाहीत. तिथे 'एकाग्र' या शब्दाला महत्त्व आहे आणि मल्टी टास्किंग म्हणजे 'अनेकाग्र' ... 'सूर' आणि 'लय' या एकाग्र करणाऱ्या विषयांकडे केवळ माहिती म्हणून न बघता, 'अनुभवजन्य ज्ञान' म्हणून बघण्याचे गांभीर्य ज्या कुटुंबात आणि वातावरणात आहे, त्या वातावरणात 'मल्टी टास्किंग' हा विषयच नसतो.

'कला ज्ञान' हे शिकता, शिकविता येत नाही, तर ते 'मिळवावे' लागते. ते मिळविण्यासाठी मुलांना प्रोत्साहन जरूर द्यावे, परंतु लादले जाऊ नये, तरच त्यातील कला खुलेल असे मला वाटते. एकाच आयुष्यात अनेक विषयांची माहिती घेणे आता अवघड नाही, परंतु एखाद्याच विषयाच्या ज्ञानाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी, एक संपूर्ण आयुष्यही कमी पडते.

मुलांना एकाग्र होण्यास मदत करावी इतकेच सांगतो. ध्रुपद हा विचार 'मल्टी चॉईस' विचारसरणीत बसणारा नाही. इतकेच काय, पण गाणा-यासाठी ते 'चॉईसलेस' आहे असे माझे मत आहे.

हेही वाचा: Alia Bhatt Ranbir Kapoor Film Clash: नवरा - बायकोचे सिनेमे एकमेकांसमोर धडकणार, कोण घेणार माघार ?

प्रश्न - हल्ली एक जाणवते की, जरा थोडीफार चार दोन गाणी गुणगुणता येऊ लागली की, माणूस आधी शिकणे थांबवतो. मग गळ्याला येईल ते गायला लागतो ... त्याच्या गाण्याचा, स्वतःबरोबरच समाजालाही त्रास होतो ... यावर आपले काय म्हणणे आहे ?

उत्तर - आपली व आपल्या कलेची प्रतिष्ठा आपणच राखली पाहिजे. आपण किती गातो, यापेक्षा आपण कसे व कुठे गातो याला फार महत्त्व आहे. शिकणे थांबले की, घडणे थांबते. घडणे थांबले की रडणे सुरू होते. साधना ही दर्शनाची प्रक्रिया आहे तिला डावलून प्रदर्शन कसे असू शकेल ? आधी शिकावे मग गावे.

आधी गुरूला नंतर श्रोत्यांना ऐकवावे. गुणीजनांसमोर गावे, म्हणजे शिकायला मिळते. शिकण्याला पर्यायच नाही, कितीही शिकले तरी कमीच आहे .. गुरुसमोर बसल्यावरच आपल्या क्षमता आणि मर्यादांचाही अंदाज येत जातो. तरुण पिढीने शास्त्रीय संगीत चांगल्या गुरुजनांकडून शिकले पाहिजे. आज ते सहज शक्य व उपलब्ध आहे, उद्या कदाचित नसेलही.

नाशिकमधे बरेच गुणीजन आणि गुरुजन चांगली रागविद्या जाणून आहेत. त्यांचा शोध घेऊन, त्यांच्याकडून आजच्या पिढीने शास्त्रीय संगीत कलेचा वारसा शिकून घेतला पाहिजे.

प्रश्न - हौस म्हणून गाणे शिकणाऱ्या आजच्या तरुण पिढीला आपण काय मार्गदर्शन कराल ?

उत्तर - मार्गदर्शन गुरूंचे घ्यावे. मी एक छोटासा साधक आहे. हे अभिजात क्षेत्र आहे, इथे ज्याचे-त्याचे उत्तर ज्याला-त्याला शोधावे लागते. "'आवड' म्हणून सुरू केलेले गायन मी उच्च 'व्यासंगापर्यंत' नेले आहे का ?" असा स्वतःला प्रश्न विचारल्यास, प्रत्येकाला हे उत्तर सापडेल.

आजची पिढी अतिशय बुद्धिमान आहे, त्यांना साधनांची उपलब्धताही आहे. गळ्यात सूर, डोक्यात बुद्धी आणि मानवाचा जन्म, हा किती सुंदर योगायोग आहे ! या योगायोगाचे सोने करण्यासाठी आजच्या तरुण पिढीने योग्य 'साधनेचा मार्ग' निवडल्यास कुणाचेही भविष्य 'उज्वलच' आहे, कारण साधना हे एकमेव क्षेत्र असे आहे की, या क्षेत्रात स्पर्धाच नाही.

हेही वाचा: Rajkumar Rao: राजकुमार आणि नोरा फतेहीचं 'अच्छा सिला दिया' गाणं रिलीज