लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यकृतींनी घातली मराठी चित्रपटसृष्टीला भुरळ

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यकृतींनी घातली मराठी चित्रपटसृष्टीला भुरळ

मुंबई : मराठीतील महान साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आजपासून सुरु झाले आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यकृतींवर आठ मराठी चित्रपट निघाले. त्यांच्या कादंबऱ्या वीररसप्रधान होत्या. संघर्ष हा त्यांच्या कादंबऱ्यांचा आत्मा होता. त्यामुळे अनेक निर्माते त्यांच्या कादंबऱ्यांकडे आकृष्ट झाले आणि त्यांनी चित्रपटनिर्मिती केली. अण्णाभाऊ साठे असे एकमेव साहित्यिक आहेत की त्यांच्या साहित्यकृतींवर एकाहून अधिक चित्रपट आलेले आहेत.

वैजयंता (1961), फकिरा (1963), डोंगराची मैना (1969), टिळा लावितो मी रक्ताचा (1969), मुरली मल्हारी रायाची (1969), वारणेचा वाघ (1970), अशी ही सातऱ्याची तऱ्हा (1974) आणि चित्रा (2011) असे मराठी चित्रपट अण्णाभाऊंच्या साहित्यकृतीवर निर्माण झाले. वैजयंता या कादंबरीच्या नावावरून अभिनेते तसेच निर्माते व दिग्दर्शक गजानन जागीरदार यांनी चित्रपट काढला. त्यामध्ये अभिनेत्री जयश्री गडकर यांनी काम केले. तमाशातील स्त्री ही उपभोगाचे साधन आहे, या पुरुषी मानसिकतेला तडा देण्याचे काम या चित्रपटातील वैजयंता करते. 

फकिरा ही सगळ्याच गाजलेली कादंबरी. या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही लाभला होता. अण्णाभाऊंचे मित्र शाहीर  द. ना. गवाणकर यांनी या कादंबरीवरून चित्रपट काढला. यामध्ये अण्णाभाऊंनी छोटीशी भूमिका साकारली. आवडी या कादंबरीवरून 'टिळा लावितो मी रक्ताचा' हा चित्रपट निघाला. यामध्ये आवडीची भूमिका जयश्री गडकर यांनी केली. आवडी ही तडफदार असते आणि संपूर्ण जातिव्यवस्थेला हादरा देते. 'माकडीचा माळ' या कादंबरीवरून 'डोंगरची मैना' हा चित्रपट राम देवताळे आणि रामकरे यांनी काढला.अनंत माने यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अरुण सरनाईक यांनी मुख्य भूमिका साकारली. 

'चिखलातील कमळ' या कादंबरीवरून दत्ताराम गायकवाड यांनी 'मुरली मल्हारी रायाची' हा चित्रपट काढला. जयश्री गडकर आणि सूर्यकांत यांनी यामध्ये काम केले. वसंत पेंटर यांनी 'वारणेचा वाघ' हा चित्रपट बनविला. अभिनेते सूर्यकांत यांच्या अप्रतिम आणि प्रभावी अभिनयाने हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटाला गीतकार आणि कवी जगदीश खेबूडकर यांनी पटकथा व संवाद लेखन केले. दिग्दर्शक मुरलीधर कापडी यांनी 'अलगुज' या कादंबरीवरून 'अशी ही साताऱ्याची तऱ्हा' हा चित्रपट बनविला. मधुकर पाठक यांनी पटकथा व संवाद लेखन केले. 'चित्रा' नावाच्या कादंबरीवरून 'चित्रा' हा चित्रपट बनविण्यात आला. मधु कांबीकर यांनी या चित्रपटात काम केले. वेश्याव्यवसायात फसवून आणलेल्या मुलीचे दुःख अतिशय उत्कंटतेने मांडण्यात आले आहे. 

अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांवरील निघालेल्या या चित्रपटांना राज्य सरकार तसेच अन्य काही पुरस्कारही लाभलेले आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांवरती अजूनही चित्रपट निघतील. कारण त्यांच्या कादंबऱ्या म्हणजे पीडितांच्या-शोषितांच्या व्यथा आणि वेदना मांडणाऱ्या परंतु तितकेच आदर्श मूल्ये जपणाऱ्या आहेत. त्यामुळे मराठी निर्मात्यांना व दिग्दर्शकांना त्यांची साहित्यकृती नेहमीच भुरळ घालणारी आहे. त्यामुळे भविष्यातही त्यंच्या कलाकृतींवर काही चित्रपट बनतील हे नक्की.
---
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com