Raja Badhe: 'गर्जा महाराष्ट्र माझा' गाण्याचे गीतकार राजा बढे आहे तरी कोण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raja Badhe

Raja Badhe: 'गर्जा महाराष्ट्र माझा' गाण्याचे गीतकार राजा बढे आहे तरी कोण?

आपण सातवीत असतांना सर्वांनीच 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत ऐकलं आणि गायलं असेलच. ही कविता एक स्फूर्ती गीत म्हणून ओळखली जाते. हे गीत गायल्यानंतर प्रत्येक महाराष्ट्रीयन नागरिकाचं हृदय गर्वांने फुलतं यात काही शंकाच नाही. आता 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत राज्यगीत म्हणून घोषित झाले आहे.

सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे गीत लागू करण्यात येणार आहे

महाराष्ट्र राज्याचे वर्णन करत असताना कवी राजा बढे यांनी या काव्याची रचना केली आहे. या गीताचे गीतकार राजा बढे हे आहेत तर या गीताला श्रीनिवास खळे संगीतबद्ध केलं आहे. शाहीर साबळे यांनी हे गीत गायलं आहे. राजा बढे यांच्या बद्दल आपण जाणुन घेवुयात.

(Raja badhe who wrote Jay Jay Maharashtra Maza Song which is now State Song)

राजा नीळकंठ बढे यांचा जन्म १ फेब्रुवारी १९१२ रोजी नागपूर येथे झाला. नागपूर उपराजधानीतील ज्येष्ठ कवी राजा बढे यांच्या ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्य गीताचा दर्जा दिला जाणे हे फार अभिमानाची गोष्ट आहे. राजा बढे यांना संपादक, अभिनेते, गद्य लेखक, नाटककार, कादंबरीकार, मराठी कवी आणि गीतकार अशी वेगवेगळी पद भुषवली असली तरी त्यांची खरी ओळख मराठी कवी आणि गीतकार अशीच होती.

बढे यांचे प्राथमिक शिक्षण छिंदवाडा येथे तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात झाले. १९३५ मध्ये त्यांनी पंजाबची मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली.

त्यानंतर राजा बढे यांनी अनेक वृत्तपत्रात महत्वाच्या पदांवर भुमिका बजावली. दरम्यान १९५६ ते १९६२ या कालखंडात त्यांनी आकाशवाणीवर' निर्माता' काम पाहिल्यानंतर त्यांनी आकाशवाणीसाठी माहितीपट तयार करून देण्याचे कामही त्यांनी केले. यानंतर राजा बढे यांनी चित्रपट व्यवसायातही काम केलं आहे. 'सिरको फिल्म्स'मध्ये दोन वर्षे काम केल्यानंतर १९४२ मध्ये ते 'प्रकाश स्टुडिओ 'ते रुजू झाले. त्यांनी 'रायगडचा राजबंदी' हा संभाजीमहाराजांच्या जीवनावरील चित्रपटाची निर्मिती केली.

राजा बढे यांचा संस्कृत काव्याचा आणि उर्दू शायरीचा अभ्यासही चांगला होता. त्याचबरोबर त्यांनी अनेक अजरामर गीतेही दिली. आजही त्यांची अनेक गीते लोकप्रिय आहेत. " जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" हे गीताला तर राज्य गीताचाच दर्जा मिळाला. त्याचे 'चांदणे शिंपीत जाशी' किंवा 'त्या चित्तचोरट्याला का', 'दे मला गे चंद्रीके', 'माझीया माहेर जा' अशी भावगीते लिहिली.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे राजा बढे यांचे दैवत होते. त्यांचे राष्ट्रप्रेम त्याच्या ' क्रांतिमाला' (१९५२) या संग्रहातून वेळोवेळी दिसून येते. त्यात २२ कविता आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील देशभक्तिपर गीते आहेत. बढे यांची गाणी हिराबाई बडोदेकर, लता मंगेशकर, मालती पांडे, कुमार गंधर्व, ज्योत्स्ना भोळे, सुमन कल्याणपूर, सुलोचना चव्हाण, जितेंद्र अभिषेकी, आशा भोसले, आशा खाडिलकर अशा अनेकजणांनी गायली आहेत.

आई वडिलांच्या निधनानंतर मोठा भाऊ म्हणून त्यांनी लहान भावंडांची जबाबदारी स्वीकारली. त्यासाठी ते स्वतः अविवाहित राहिले. राजा बढे हे दिल्ली येथे त्यांचे अचानक ७ एप्रिल १९७७ रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राची खुप मोठी हानी झाली.