10 जुलैला चित्रपट होतोय प्रदर्शित; भारतीय वितरकांनी केली तयारी; पण कुठे ?

संतोष भिंगार्डे
शनिवार, 4 जुलै 2020

'माय स्पाय' हा एक पीटर सीगल दिग्दर्शित अॅक्शन, कॉमेडी चित्रपट आहे. एक गुप्तहेर (स्पाय) वडील आणि त्यांच्यापेक्षाही स्मार्ट त्यांची मुलगी यांची ही कथा आहे. गुप्तहेर म्हणून काम करण्याचं ट्रेनिंग मुलीला देताना तीच त्यांना जास्त शिकवून जाते आणि त्यात या चित्रपटाची खरी मजा लपलेली आहे

मुंबई : कोरोनाच्या प्रभावामुळे भारतातील चित्रपटगृहे बंद आहेत. काही देशांचा अपवाद वगळता अन्य देशांतही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणे सध्या तरी अवघड आहे. परंतु भारतातील दोन चित्रपट वितरण कंपन्या लॉकडाऊनंतर पहिल्यांदाच हॉलीवूडचा चित्रपट श्रीलंकेत प्रदर्शित करणार आहेत. 'माय स्पाय' असे या चित्रपटाचे नाव आहे आणि तो श्रीलंकेतील 22 स्क्रीन्सवर 10 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. पीव्हीआर पिक्चर्स आणि तृप्ती एन्टरटेन्मेंट या वितरण कंपन्या हा चित्रपट तेथे प्रदर्शित करीत आहेत. भारतासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.

मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक; काय झालं बैठकीत वाचा सविस्तर...

'माय स्पाय' हा एक पीटर सीगल दिग्दर्शित अॅक्शन, कॉमेडी चित्रपट आहे. एक गुप्तहेर (स्पाय) वडील आणि त्यांच्यापेक्षाही स्मार्ट त्यांची मुलगी यांची ही कथा आहे. गुप्तहेर म्हणून काम करण्याचं ट्रेनिंग मुलीला देताना तीच त्यांना जास्त शिकवून जाते आणि त्यात या चित्रपटाची खरी मजा लपलेली आहे. जॉन आणि एरिक होबर यांनी हा चित्रपट लिहिलेला आहे. डेव्ह बटिस्टा, क्लोई कोलमन, क्रिस्टन शाल, पॅरिसा फिट्ज-हेन्ली आणि केन जोंग यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट जानेवारी महिन्यात काही ठिकाणी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर भारतासह अन्य देशांमध्ये तो मार्च महिन्यात प्रदर्शित करण्यात येणार होता. 

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; वीज बिलांबाबत बेस्ट उपक्रमाने घेतला महत्वाचा निर्णय...

मात्र कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद झाली आणि या चित्रपटाचे प्रदर्शन होऊ शकले नाही. मात्र कालपासून श्रीलंकेतील चित्रपटगृहे सुरू झाली आहेत. तेथे 'माय स्पाय' हा चित्रपट 10 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. लॉकडाऊननंतर भारतातील दोन वितरण कंपन्या प्रथमच हा चित्रपट प्रदर्शित करीत आहेत. लॉकडाऊनपूर्वी ज्या ज्या ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित झाला त्या त्या ठिकाणी समीक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्यामुळे आता श्रीलंकेतील चित्रपट रसिक या चित्रपटाला कसा काय प्रतिसाद देतात हे लवकरच कळेल. 

लॉकडाऊनचा रेल्वेला मोठा आर्थिक फटका; तब्बल इतक्या कोटींचा झाला तोटा

याबाबत तृप्ती एन्टरटेन्मेंटचे हरेश सांगाणी म्हणाले की, पीव्हीआर पिक्चर्स आणि आमची कंपनी हा चित्रपट २० मार्च रोजी भारतात प्रदर्शित करणार होती. परंतु लॉकडाऊन झाले आणि आमचे सगळे प्लॅन्स फिसकटले. आता पहिल्यांदा श्रीलंकेत हा चित्रपट प्रदर्शित करीत आहोत. तेथील थिएटर्स आता खुली झाली आहेत. आसनव्यवस्थेच्या केवळ पन्नास टक्के प्रेक्षकांना चित्रपटगृहात प्रवेश आहे. आता तेथे त्यांच्या भाषेतील चित्रपट प्रदर्शित होत आहेत. तेथील एका वितरकाचा मला फोन आला आणि त्याने चित्रपट प्रदर्शनाबाबत विचारले. आम्ही हा चित्रपट दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two indian distributors going to publish hollywood movie on 10 july