हुतात्मा काकासाहेब शिंदे व्दितीय स्मृतीदिन : मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन; ३० जुलैला मंत्रालयात होणार बैठक.  

marath morcha.jpg
marath morcha.jpg

कायगाव (जि. औरंगाबाद) : जुने कायगावला जाणारीपूर्ण वाहतूक पोलिसांनी थांबवल्यामुळे मराठी क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांना गोदावरी नदीपासून सात किलोमीटर अंतरावर गंगापूर पोलिसांनी रोखले. यावेळी उपस्थित आंदोलकांनी भेंडला फाटा येथे ठिय्या आंदोलन करून हुतात्मा काकासाहेब शिंदे व अन्य ४१ जणांना अभिवादन केले.

मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी मराठा युवक काकासाहेब शिंदे यांनी जुने कायगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रात २३ जुलै २०१८ उडी घेऊन जलसमाधी घेतली होती. या घटनेला गुरुवारी (ता.२३) दोन वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी विविध मागण्यांसाठी जुने कायगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावर बलीदान ते आत्मबलिदान आंदोलन करण्याची घोषणा केली होती.

त्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता गृहीत धरून आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून औरंगाबाद-अहमदनगर-पुणे राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक पैठण, शेवगांव मार्गे वळविण्याचा निर्णय औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी घेतला होता. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग भेंडला फाटा ते प्रवरासंगम दरम्यान शुकशुकाट होता. सर्वत्र पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. 

हुतात्मा काकासाहेब शिंदे स्मृतिस्थळाकडे जाणारा रोड पोलिसांनी बंद करून तबबल ७ किलोमीटर अंतरावर आंदोलकांना रोखले होते. दहा वाजता मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत हुतात्मा काकासाहेब शिंदे यांना अभिवादन करण्यासाठी जाऊ देण्याची मागणी केली. पण पोलिसांनी जाऊ दिले नाही. त्यांनी तेथेच ४० मिनिटे ठिय्या आंदोलन करत मराठा आरक्षण मागणीसाठी हुतात्मा झालेल्या ४२ कुटुंबाच्या घरच्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून प्रत्येकी १० लाख रुपये मदत देऊन इतर मागण्या मान्य कराव्या. नसता ९ ऑगस्ट २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चा च्या समनवयकांनी दिला.

यावेळी प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांनी शासनाच्या वतीने मंत्री एकनाथ शिंदे यांनी बलिदान दिलेल्या ४२ कुटुंब आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समनव्यकांसोबत ३० जुलै २०२० रोजी मुंबई येथे मंत्रालयात सकारात्मक चर्चा करण्यासाठी निमंत्रित करणार आहे. असे आशयाचे पत्र गंगापूर तहसिलच्या वतीने देण्यात आले. दरम्यान पोलिसांनी १५ ते २० आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंध कारवाई करून पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या बाहेर सोडले. दुपारी बारा वाजेनंतर प्रशासन आणि पोलिसांच्या नियोजनबद्ध बंदोबस्तामुळे आंदोलन शांततेत पार पडले. 

स्वर्गीय काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतीस्थळी भाऊ, आई वडील आणि काका यांनी जाऊन अभिवादन केले. औरंगाबाद पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गांवडे, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, तहसीलदार अविनाश शिंगटे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक एम.टी. सुरवसे, मुकुंद आघाव आदी २२५ पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. बंद करण्यात आलेला महामार्गावर सायंकाळी ६ ते ८ दरम्यान वाहतूक सुरळीत सुरू करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

(संपादन- प्रताप अवचार)  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com