हप्तेखोरी, अतिक्रमणांनी घोटला फुटपाथचा गळा

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबाद : रस्त्यावर पहिला हक्क आहे पादचाऱ्यांचा असे नेहमीच सांगितले जाते; मात्र शहरातील मुख्य रस्त्यांच्या फुटपाथचे चित्र पाहता, पादचाऱ्यांनी चालायचे कुठून? असा प्रश्‍न प्रत्येकाला पडला आहे.

हातगाड्या, टपऱ्या, भाजीपाला विक्रेत्यांनी फुटपाथ आमच्या हक्काचे अशा आविर्भावात सर्वच ठिकाणी ताबा घेतला असून, या अतिक्रमणांमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. पोलिसांसह महापालिकेचेही अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत आहे. 

फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाया अनेकवेळा केल्या जातात. महापालिकेचे पथक माघारी फिरताच तासाभरात पुन्हा अतिक्रमण "जैसे थे' होते. हप्तेखोरीमुळे अनेक अतिक्रमणांना हात लावण्याची महापालिकेची अद्याप हिंमत झालेली नाही. 

राज्याची पर्यटन राजधानीचा दर्जा असलेल्या औरंगाबाद शहरात पर्यटकांना गेल्या काही वर्षांत अतिक्रमणांचे दर्शन घडत आहे. त्यात प्रामुख्याने फुटपाथला अतिक्रमणांचा विळखा पडला असून, महापालिकेने मुख्य बाजारपेठेसह शहरातील प्रमुख रस्त्याशेजारी कोट्यवधी रुपये खर्च करून गट्टूचे फुटपाथ तयार केले आहेत. 

मात्र, अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी फुटपाथवर जागाच शिल्लक राहिलेली नाही. फूल विक्रेते, माठ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, अंडा ऑम्लेटच्या हातगाड्या, किरकोळ विक्रेत्यांनी सर्वच रस्त्यांच्या फुटपाथचा ताबा घेतला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना फुटपाथऐवजी रस्त्यावरून वाहनांच्या गर्दीतून वाट काढावी लागत आहे. 

फेरीवाला धोरण कागदावरच 

फुटपाथवरील अतिक्रमणे वाढण्याचे कारण म्हणजे फेरीवाला धोरण अद्याप ठरलेले नाही. शासनाने काही वर्षांपूर्वी फेरीवाला धोरण ठरविण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. मात्र, धोरण ठरविणारी समिती स्थापन करण्यातच महापालिकेचे दोन ते तीन वर्षे निघून गेली. 

सध्या फेरीवाल्यांच्या नोंदणीचे काम सुरू असून, हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर समिती फेरीवाल्यांची यादी अंतिम करणार आहे. त्यानुसार फेरीवाल्यांना महापालिका वाहतुकीला किंवा फुटपाथला अडथळा येणार नाही, अशा जागा ठरवून देणार आहे. मात्र, यासाठी विलंब होत असल्याने सध्या फुटपाथची वाट बिकट झाली आहे. 

खर्च महापालिकेचा, वसुली दुसऱ्याचीच

फुटपाथ तयार करण्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले असले तरी फुटपाथवर दुकान थाटणाऱ्यांकडून हप्ते दुसरेच वसूल करीत असल्याचे चित्र शहरात आहे. आजघडीला शहरात सुमारे 25 ते 30 हजार हातगाड्या असून, यातील अनेकजण रोज एकाच जागेवर थांबून व्यवसाय करतात. त्यांना आपली जागा राखून ठेवण्यासाठी पैसे मोजावे लागतात. 

संबंधिताचा एजंट येऊन हप्ते वसूल करतो. बाजारपेठेच्या भागात यातून महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरू झाला असून, काही भागात तर हातगाडीदादाच निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

पथक फिरताच अतिक्रमणे 'जैसे थे' 

रस्त्यावरील, फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई महापालिकेतर्फे वारंवार केली जाते. मात्र ही कारवाई फक्त दिखावाच ठरते. महापालिकेच्या पथकाने पाठ फिरविताच तासाभरात अतिक्रमणे "जैसे थे' होतात. सिडको एसबीआय चौकात महापालिकेने आतापर्यंत शंभरदा कारवाई केली असेल. 

सेव्हन हिल्स ते गजानन महाराज मंदिर रस्त्यावरील माठ विक्रेते, फूल विक्रेत्यांसह औरंगपुरा शहर बसस्थानक, जिल्हा परिषद गेटचा परिसर, रेल्वेस्टेशन, शहागंज भागातही वारंवार कारवाया करण्यात आल्या. त्यातून शहरात अनेकवेळा तणावाचे वातावरणही निर्माण झाले; मात्र फुटपाथ काही मोकळे झाले नाहीत. महापालिका अधिकारी व अतिक्रमणवाले यांच्यात फिक्‍सिंग आहे की काय? असा प्रश्‍न शहरवासीयांना पडला आहे.

पोलिस करतात काय? 

महापालिका अधिकाऱ्यांप्रमाणेच पोलिस व फुटपाथवर पसारा मांडून बसणाऱ्या फेरीवाल्याचे लागेबांधे आहेत. अतिक्रमणे होऊ नयेत, ही महापालिकेप्रमाणेच पोलिसांचीदेखील जबाबदारी आहे. 

मात्र, रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या गाड्या ज्या भागात मोठ्या प्रमाणात हातगाड्या असतात, गर्दी असते त्याठिकाणी जाऊन अशा प्रकारे थांबतात, की पोलिस संरक्षण द्यायला आले का? असा प्रश्‍न पाहणाऱ्यांना पडतो. काही वेळानंतर पोलिसांची "गरज' पूर्ण होताच पोलिसांची गाडी जागा सोडते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com