अरे देवा...त्यांनी म्हशींनाही सोडले नाही...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 February 2020

संशयितांनी औरंगाबादसह बुलडाणा, नाशिक, नगर, नांदेड, जळगाव जिल्ह्यातही जनावरे खासकरून म्हशी चोरी केल्या व नांदेड, परभणी जिल्ह्यात विक्री केल्याचे संशयितांनी सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
 

औरंगाबाद : एकीकडे अस्मानी संकटाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर नापिकीचेही संकट आहे. त्यातच दुभती जनावरे चोरी जात असल्याने समस्यांत आणखी वाढ होत आहे; परंतु स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी जनावरे चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केल्याने शेतकऱ्यांना त्यांची जनावरे परत मिळणार आहेत.

स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी सातजणांना अटक केली असून, जनावरेही ताब्यात घेतली आहेत. दरम्यान, संशयित दिवसा चटई, प्लॅस्टिक, टोपले व जुन्या कपड्यावर भांडी विक्री करतात. चोरी करण्याचे ठिकाण हेरून तेथे रात्री म्हशी पळवून नेत होते. अशी माहिती पोलिसांनी दिली. 

स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, बालाजी दादाराव भोसले, मारोती दुर्गाजी भोसले, शिवाजी दुर्गाजी भोसले, बबन मारोती भोसले (तिघे रा. पडेगाव रोड परभणी) कैलास नामदेव हरगावकर (रा. अर्धापूर, जि. नांदेड), तान्हाजी दुर्गाजी भोसले (रा. पडेगाव रोड, परभणी) व आयशरचालक सय्यद पाशा सय्यद रशीद (रा. आनंदनगर, परभणी) अशी संशयितांची नावे आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील पिशोर, फर्दापूर भागात वारंवार म्हशी चोरीचे प्रकार घडत होते. त्यामुळे म्हशीचे मालक शेतकरी हवालदिल झाले होते. डोंगरगाव, ता. कन्नड येथील उत्तम आग्रे यांच्या शेतातून 26 नोव्हेंबर 2019 ला तीन म्हशी चोरी झाल्या होत्या.

हेही वाचा : 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार एवढ्या कोटींची कर्जमाफी

व्हायरल क्लिपमधला अमोल कोण...

तसेच फर्दापूर ता. सोयगाव येथील जावेदखॉं हुसेनखॉं पठाण यांच्या तसेच अजिंठा येथील मुबारक बिनअली चाऊस यांचीही जनावरे चोरी झाली होती. प्रकरणात स्थानिक गुन्हेशाखेने तपास केला. त्यानंतर संशयित बालाजी भोसले याला ताब्यात घेत चौकशी केली असता, इतर साथीदारांसोबत मिळून जनावरे चोरीची त्याने कबुली दिली. अशी पोलिसांनी माहिती दिली.

यानंतर इतर संशयितांनाही पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, सुधाकर दौड, विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे, नामदेव शिरसाठ, धीरज जाधव, संजय भोसले, ज्ञानेश्‍वर मेटे, योगेश तरमाळे, जीवन घोलप, संजय तांदळे यांनी केली. 

आंतरराज्य टोळी 
संशयितांनी औरंगाबादसह बुलडाणा, नाशिक, नगर, नांदेड, जळगाव जिल्ह्यातही जनावरे खासकरून म्हशी चोरी केल्या व नांदेड, परभणी जिल्ह्यात विक्री केल्याचे संशयितांनी सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा : 

राज ठाकरे असे अडकले - वाचा 

आदित्य ठाकरे यांचं औरंगाबादेत मोठं वक्तव्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News Buffalo Thief Gang Arrested