कुत्रा माणसाजवळ आला आणि पाच लाखांचा झाला....

file photo
file photo

औरंगाबाद- काही दिवसांपासून शहरात श्‍वानप्रेमींची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता श्‍वान विक्रीचा व्यवसायही वाढीस लागला आहे. देशी श्‍वानांच्या तुलनेत परदेशी श्‍वानांची मागणी वाढली आहे. श्‍वानांच्या सौंदर्य, वैशिष्टांनुसार एक हजारांपासून तब्बल पाच लाखांपर्यंत किमती आहेत.

पुरातन काळापासून श्‍वान हा माणसांचा सोबती आहे. आदिम काळात आदिमानव जेव्हा मांस शिजवत असत तेव्हा वासाने कुत्रा मानवाच्या जवळ आला असावा. तेव्हापासून श्‍वान आणि मनुष्याचे नाते जडल्याचे संदर्भ इतिहासात आहेत.

आता तर श्‍वान माणसांचा सर्वांत जवळचा प्राणी आहे. शहरी भागात स्वतःचा निवारा असल्यास प्रत्येकाची एक छानसा श्‍वान पाळण्याची इच्छा असते. काहींना घरातील एकटेपणा घालवण्यासाठी तर काही मुलांच्या हट्टापायी श्‍वान पाळतात. डॉग शो, शर्यतीसाठी श्‍वान पाळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. श्‍वानांच्या ४०० प्रजातींपैकी जवळपास सर्वच प्रजाती मागणीनुसार शहरातील व्यावसायिकांकडे उपलब्ध आहेत.

यांना पसंती

शहरात सर्वांत जास्त कारवान, लॅब्रेडॉर, रॉटविलर, कॉकर स्पॅनियल, डॅशहून्ड, जर्मन शेफर्ड, पॉमेरेअन, डॉबरमॅन, पग, बॉक्‍सर , ग्रेट डेन, बीगल, बुल डॉग आदी प्राजतींच्या श्‍वानांची मागणी आहे. यासाठी इतर राज्यासह परदेशातून श्‍वान मागवले जातात. पूर्वी एक दोन असलेले श्‍वान व्यावसायिक आता गल्लो-गल्ली झाले आहेत. यातील अनेकांकडे परवाने नसतानाही सर्रास श्‍वानांची विक्री करतात.

प्रजननासाठी चुकीची पद्धत

देशी-परदेशी प्रजातीचे श्‍वान चोरून त्यांची चुकीच्या पद्धतीने प्रजनन प्रक्रियेतून जन्माला आलेल्या श्‍वानांची पिल्ले हजारो रुपयांना विकली जातात. शहरातही अशी टोळी सक्रिय असून, ती अशा श्‍वानांवर नजर ठेवते.

सकाळी अनेकजण श्‍वान फिरायला नेतात, तेव्हा लघुशंकेसाठी त्यांना मोकळे सोडतात. याचाच फायदा घेऊन ही टोळी श्‍वानांची चोरी करते; परंतु चुकीच्या प्रजनन प्रक्रियेमुळे श्‍वानात डोके-मोठे असणे, हृदयाला छिद्र, टाळू नसणे, अविकसित, दात नसणे असे दुष्परिणाम निर्माण होतात, असे पशुचिकित्सक डॉ. अनिल भादेकर यांनी सांगितले.

श्‍वान चोऱ्या वाढल्या

प्रेमाने वाढवलेला आणि किमती श्‍वान थोडा जरी नजरेआड झाला तर तो गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. एखाद्या श्‍वानावर पाळत ठेऊन श्‍वान चोरीच्या अनेक घटना गेल्या अनेक वर्षांत समोर आल्या आहेत. ऍनिमल शेल्टरध्ये अनेकजण त्यांचे हरवलेले श्‍वान शोधण्यासाठी येतात.

यासाठी श्‍वान मालकांनी आपला श्‍वान ओळखता यावा यासाठी माईक्रोचीप आवश्यक बसवावी, असे मत डॉ. भादेकर यांनी व्यक्त केले. प्रजनन केंद्र सुरू करण्यासाठी प्राणी कल्याण मंडळाची परवानगी तसेच अनेक कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. श्वान विक्रीतून मोठ्या प्रमाणावर पैसा कमावता येऊ शकतो; पण प्रक्रिया मोठी असल्याने अवैध मार्गाचा वापर केला जात आहे.

पॉमेरेअनपेक्षा लाडका बनला लॅब्रेडॉर

पूर्वी प्रत्येकाच्या घरात छोटासा पांढरा शुभ्र पॉमेरेअन (पोम) मोठ्या प्रमाणात पाळला जात होता; परंतु त्याच्या केसांची गळती वाढायला लागल्याने त्यांना घरात सांभाळणे किचकट झाले. त्यानंतर लॅब्रेडॉर, रॉटविलर, सेन्ट बर्नड, ग्रेन डेड, डाग्निशीयन पाळणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

 यात लॅब्रेडॉरला जास्त पसंती असल्याचे व्यावसायिक सांगतात. या जातीचे वैशिष्ट दिसायला आकर्षक असून तो अधिक विश्‍वासू समजला जातो. यामुळे लॅब्रेडॉर पाळणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे व्यावसायिक सांगतात.

श्‍वान मालकांनी आपल्या श्‍वानांच्या आरोग्याची काळजी घेताना तडजोड करू नये. कुठल्याही आजारासंबंधी तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे. श्‍वानांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी वेळ काढून फिरवावे. त्याचे राहण्याचे ठिकाण नेहमी स्वच्छ ठेवावे.
 डॉ. अनिल भादेकर, पशू वैद्यकीय चिकित्सक

मला लहानपणापासून श्‍वानांची आवड होती. त्यामुळे वयाच्या १६ व्या वर्षांपासून मी श्‍वानांचा व्यवसाय सुरू केला आहे. पूर्वीच्या तुलनेत श्‍वान पाळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. श्‍वानांच्या आवडी बदलल्या आहेत. आपण विकत घेतलेल्या श्‍वानांची किंमत मोजून स्वतःची सुटका करून घेऊ नये. त्या पैशांपेक्षा त्यांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.
किरण रगडे, श्‍वान विक्रेता

मी लॅब्रेडॉर मादी पाळली आहे. आता ती तीन वर्षांची असून तिने काही दिवसांपूर्वी पिल्ले दिले आहेत. हा प्राणी खूप प्रामाणिक आहे. श्‍वानाकडून शारीरिक व्यायमासोबतच मानसिक व्यायाम करून घेऊन त्यांना तंदुरुस्त ठेवावे.

 निकुंज सवाईवाला, श्‍वान प्रेमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com