या समितीची महापालिकेला झाली साडेतीन वर्षांनंतर आठवण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

अॅडव्हायझरी कमिटी नियुक्त करण्यात आली होती. ही कमिटी कामांची शिफारस करण्यासाठी तयार करण्यात आली आहे; मात्र अशी समिती असल्याचा अनेकांना विसर पडला होता. कारण समितीची एकही बैठक झालेली नाही. आता साडेतीन वर्षांनंतर प्रशासनाला या कमिटीची आठवण झाली आहे.

औरंगाबाद- स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी स्थापन करण्यात आलेल्या अॅडव्हायझरी समितीची महापालिका प्रशासनाला तब्बल साडेतीन वर्षांनंतर आठवण झाली आहे. शहर बससेवा, एमएसआयसह इतर कामे झाल्यानंतर आता मंगळवारी (ता.14) या समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात तब्बल 135 कोटींचे प्रस्ताव चर्चेसाठी ठेवण्यात आले आहेत. 

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांशी स्मार्ट सिटी प्रकल्पात औरंगाबाद शहराची वर्ष 2016 अखेरीस निवड झाली. त्यावेळी शहर स्मार्ट करण्यासाठी अनेक मोठमोठ्या घोषणा झाल्या; मात्र शहर बससेवा वगळता अद्याप एकही मोठे काम या प्रकल्पाअंतर्गत झालेले नाही. दरम्यान, स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट असलेली कामे करण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन प्रा. लिमिटेड या कंपनीची स्थापना करण्यात आली.

कंपनीमध्ये शासकीय, निमशासकीय संचालकांची नियुक्ती करण्यात आली असली तरी यासोबतच ऍडव्हायझरी कमिटी नियुक्त करण्यात आली होती. ही कमिटी कामांची शिफारस करण्यासाठी तयार करण्यात आली आहे; मात्र अशी समिती असल्याचा अनेकांना विसर पडला होता. कारण समितीची एकही बैठक झालेली नाही. आता साडेतीन वर्षांनंतर प्रशासनाला या कमिटीची आठवण झाली आहे. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी बैठक आयोजित केली आहे. 
 
असे आहेत प्रस्ताव 
कमिटीसमोर सध्याच्या पाणी योजनेत सुधारणा करण्यासाठी व पन्नास एमएलडी पाणी वाढविण्यासाठी 50 कोटी रुपये खर्चून नवीन पंपिंग मशिनरी बसविणे, ई-गव्हर्निंगसाठी 20 कोटींचा खर्च करणे, शहरातील ऐतिहासिक स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या सुशोभीकरणासाठी पन्नास कोटी, ज्युबली पार्क, हनुमान टेकडी यासारख्या उंच भागात पाणीपुरवठा करण्यासाठी 15 कोटी रुपये खर्चून आवश्‍यक यंत्रणा उभारणे, सफारी पार्कची निविदा काढणे, शहरातील जुन्या भागात फूड सफारी उभारणे अशा विषयांवर चर्चा होणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. 
 
हे आहेत सदस्य 
समितीत खासदार, आमदार, महापौरांसह महापालिकेतील पाच पदाधिकारी, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, एनजीओंचे प्रतिनिधी 28 सदस्य आहेत. मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात ही बैठक होणार आहे. 

हेही वाचा -
प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन 

 कलाग्राम वर अवतरली उद्योगनगरी   

या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले तान्हाजीत बदल  

मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Smart City News