आरोग्य विभागाच्या 'मेरी मर्जी' कारभारावर जि.प. पदाधिकारी भडकले !  

दुर्गादास रणनवरे
Thursday, 10 September 2020

समन्वय बैठकीत पदाधिकाऱ्यांनी ओढले डॉ. उल्हास गंडाळ यांच्या कारभारावर ताशेरे. 

औरंगाबाद : ग्रामीण भागातही आता कोरोनाचे थैमान सुरु आहे. मात्र तरीही जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग मात्र अजूनही कुंभकर्णी झोपेतच असल्याचा घणाघात करत, दस्तूर खुद्द जिल्हा परिषदेचे कारभारी आणि जिल्हा परिषद सदस्यांनी आरोग्य विभागावर तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांच्या मेरी मर्जी कारभारावर तोफ डागल्याने पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देतांना डॉ. गंडाळ यांची चांगलीच भंबेरी उडाली अशी माहिती एका पदाधिकाऱ्यांने "सकाळ" शी बोलतांना दिली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

प्रशासनाकडून पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद सदस्यांनी सांगितलेली कामे हेतुपुरस्सरपणे टाळले जात असल्याचा आरोपामुळे प्रशासन आणि पदाधिकारी यांची समन्वय बैठक सोमवारी (ता.०७) पार पडली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना रामराव शेळके यांच्या उपस्थितीत व अध्यक्षांच्या दालनात झालेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे तसेच सर्व विभागाचे प्रमुख आणि सर्व सभापती व काही जिल्हा परिषद सदस्यांची या बैठकीला उपस्थिती होती. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रत्येक तालुक्यात कक्ष का स्थापन नाही ? 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडूनकडून शहरी भागाप्रमाणे पाहिजे तश्या सोयी सुविधा आणि जनजागृती अद्यापही झालेली नाही असा आरोप यावेळी करण्यात आला . ग्रामीण भागात पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांनी कुठल्या आरोग्य केंद्राशी, कोविड केअर केंद्राशी संपर्क साधावा याविषयी कसलीही माहिती आरोग्य विभागाने जाहीर केलेली नाही असा घणाघात पदाधिकारी, सदस्यांनी केला . कोरोना संदर्भात माहितीसाठी दूरध्वनी क्रमांकही प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. रुग्णांनी उपचारासाठी कुणाशी संपर्क साधावा ? कुठे उपचार घ्यावेत ? संप्रर्क अधिकारी कोण आहेत? प्रत्येक तालुक्यात कोरोना नियंत्रण कक्ष का स्थापन केला नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित केल्याने आरोग्य अधिकारी डॉ. गंडाळ यांची बोलती बंद झाल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले . संतप्त झालेल्या पदाधिकारी, सदस्यांना शांत करत डॉ. गोंदावले यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंडाळ यांना तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले व दिरंगाई झाल्यास कारवाईचा इशाराही दिल्याची माहिती या पदाधिकाऱ्यांने "सकाळ" शी बोलतांना दिली. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आला उपचार कुठे घ्यावे याची माहिती नाही ! 
वाळूज सर्कल मधील एका जिल्हा परिषद सदस्याने तर बैठकीत आपबिती सांगितली असता अधिकारी आणि पदाधिकारी अवाकच झाले. या सदस्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असता नेमके उपचार कुठे घ्यावे आणि कुठे दाखल व्हावे याची माहिती दिली नाही असा आरोप स्वतः उपस्थित असलेल्या एका सदस्याने केला असता बैठकीत क्षणभर शांतता पसरल्याचेहि पदाधिकाऱ्याने सांगितले. लोकप्रतिनिधींनाच जर आरोग्य विभागाचा असा वाईट अनुभव येत असेल तर मग सामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील ? असा सवालही या बैठकीमध्ये जिल्हा परिषद सदस्याने उपस्थित केल्याने सर्वांनी आरोग्य विभागाच्या मेरी मर्जी कारभारावर ताशेरे ओढले व डॉ. गंडाळ यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली असेही या पदाधिकाऱ्याने सांगितले. जिल्हा परिषद प्रशासन आणि पदाधिकारी यांच्या पहिल्याच समन्वय बैठकीत आरोग्य विभागाची लख्तरे वेशीवर टांगण्यात आल्याची चर्चा मात्र दबक्या आवाजात जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरु आहे. या विषयी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. 
(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad ZP Health Department news