रोजगार देणाऱ्या उद्योगांना बळ हवे : रोहित पवार

राजेभाऊ मोगल
रविवार, 12 जानेवारी 2020

'मसिआ'तर्फे आयोजित 'महाराष्ट्र अॅडव्हॉन्टेज एक्‍स्पो'मध्ये युवासंवाद कार्यक्रमात उद्योजक सुनील किर्दक यांनी श्री. पवार यांची मुलाखत घेतली.

औरंगाबाद : ज्या उद्योगांच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध होतात, अशाच उद्योगांना बळ मिळायला हवे. त्यासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करणारे शिक्षण देणारे अभ्यासक्रम देखील राबवावे लागतील. विकास करताना राज्यात तो सर्वसमावेशकच असेल, याचीही काळजी घ्यावी लागणार आहे, असे मत आमदार रोहित पवार यांनी येथे व्यक्‍त केले.

'मसिआ'तर्फे आयोजित 'महाराष्ट्र अॅडव्हॉन्टेज एक्‍स्पो'मध्ये युवासंवाद कार्यक्रमात उद्योजक सुनील किर्दक यांनी श्री. पवार यांची मुलाखत घेतली. श्री. पवार म्हणाले, की मोठ्या उद्योगांपेक्षा लघुउद्योगांना अधिकची मदत करायला हवी. कारण त्यांच्याकडून जास्त रोजगार उपलब्ध होऊ शकतो. विद्यार्थ्यांना सक्षम करणारे शिक्षण हवे. त्यामुळे शिक्षणक्षेत्रात आवश्‍यक ते बदल करावे लागतील.

एकीकडे बेरोजगारांची संख्या वाढत असताना उद्योगाला चांगले मनुष्यबळ मिळेनासे झाले, यासाठी काहीतरी करायला हवे, असा प्रश्‍न त्यांना विचारला असता, त्यांनी सांगितले, की अभियांत्रिकीचे शिक्षण करण्यासाठी देखील विद्यार्थ्यांना कर्ज घ्यावे लागते. त्यामुळे साहजिकच त्यांना हवा तसा पगार मिळत नाही, अशी युवकांची खंत आहे; मात्र उद्योगासाठी हवे तसे मनुष्यबळ देण्यासाठी स्वतंत्र कौशल्य विकासाचे शिक्षण निर्माण करावे लागेल. शिक्षण, पाणी, उद्योग, रोजगार, शेतीचे प्रश्‍न सोडवत असताना कुठल्या विभागावर अन्याय होणार नाही, याची देखील काळजी घेतली जाईल; तसेच लघुउद्योजक देखील मल्टिनॅशनल कंपनी चालवू शकतात, तशा सुविधा त्यांना द्यायला हवेत, अशा सूचनाही त्यांनी मांडल्या. 

दहा तालुक्‍यांत प्रयोगशाळाच नाहीत कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्‍नोत्तरे झाली. एका विद्यार्थ्याने म्हटले, की मराठवाड्यातील दहा तालुक्‍यांतील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रयोगशाळाच नाहीत. मग चांगले विद्यार्थी कसे तयार होतील? याबद्दल काय व्हीजन आहे? त्यावर श्री. पवार म्हणाले, की मी स्वत: जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून काम केल्यामुळे शाळांच्या अडचणी माहिती आहेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्‍यक त्या सर्व सुविधा मिळायलाच हव्यात आणि त्या द्याव्याच लागतील. काही विद्यार्थ्यांनी उद्योग-व्यवसाय वाढत असताना पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याची सूचना केली.

त्यावर ते म्हणाले, की सर्वच उद्योगांनी पर्यावरणाबाबत असलेले सर्वच नियम पाळायला हवेत, मनुष्यच जगला नाही तर उद्योग जगून काय उपयोग, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. रोहित पवार यांच्यासाठी सेल्फी घेण्यासाठी युवक- युवतींनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रम संपल्यानंतर 15 मिनिटे युवक मंडळींनी त्यांना फोटोसाठी रोखून धरले होते.

हेही वाचा -
प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन 

 कलाग्राम वर अवतरली उद्योगनगरी   

या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले तान्हाजीत बदल  

मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Employers Businesses need strength - Rohit Pawar