मनसे कार्यकर्ते स्वगृही

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 January 2020

 कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या मोठ्या नेत्यांची अडचण झाली, पण मनसे सारख्या पक्षातील छोट्या, मोठ्या पदाधिकाऱ्यांनी मात्र घरवापसीची तयारी सुरू केली.

औरंगाबाद: स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून अन्याय केला जातो, विश्‍वासात घेतले जात नाही, पक्षही तक्रारीची दखल घेत नाही असे म्हणत बाहेर पडलेल्या अनेक जुन्या मनसैनिकांनी सोमवारी (ता.20) राज ठाकरे यांच्या उपस्थितीत घरवापसी केली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य विजय चव्हाण, मनसेतून भाजप मध्ये गेलेले संदीप कुलकर्णी व त्यांचे सहकाऱ्यांचा यात समावेश आहे. यातील चव्हाण यांनी पैठण विधासभा मतदारसंघातून वंचितच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. 

राज्यात शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर तेच सत्तेवर येणार हे गृहित धरून अनेक राजकीय पक्षातील मोठ्या नेत्यांनी भाजपची वाट धरली होती. पण शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस या तीन्ही पक्षांनी महाविकास आघाडी करत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. सत्तेसाठी शिवसेनेने देखील सॉफ्ट हिंदुत्व स्वीकारत काही मुद्यावर तडजोडीचे धोरण स्वीकारले. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या मोठ्या नेत्यांची अडचण झाली, पण मनसे सारख्या पक्षातील छोट्या, मोठ्या पदाधिकाऱ्यांनी मात्र घरवापसीची तयारी सुरू केली. औरंगाबाद मनसेत गेल्या वर्ष-दीड वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या. पुन्हा महापालिकेच्या तोंडावर भाजप मध्ये गेलेले मनसेचे जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी, विधानसभा संघटक प्रविण मोहिते, चेतन पाटील, तुषार नरवडे व विशाल कारभारे यांची पुन्हा घरवापसी झाली आहे. 

हेही वाचा नाशिकच्या मुलीसोबतही झाला होता तो प्रकार!

वरिष्ठांवर तक्रारी करत इतर पक्षात गेले होते

मनसेच्या पदाधिकाऱ्याने स्थानिक नेत्यांवर आरोप करत आत्महत्येचा केलेला प्रयत्न, लोकसभा निवडणुकीत पक्षादेश डावलून आर्थिक व्यवहार केल्याच्या तक्रारी, वरिष्ठांकडून न घेतलेली दखल आणि विश्‍वासात न घेता मनमानी पध्दतीने हाकला जात असलेला कारभार अशा अनेक तक्रारी या काळात करण्यात आल्या होत्या, त्यानंतर काही भाजप मध्ये तर काही इतर पक्षात गेले. 

हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल

भाजपची  मनसेला साद

शिवसेनेने केलेल्या दगाबाजीचा बदला घेण्यासाठी नव्या मित्राच्या शोधात असलेल्या भाजपने देखील मनसेला साद घातली. राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या गुप्त भेटीतून एक सूचक इशारा देण्यात या नेत्यांना यश आले. आता 23 जानेवारी रोजी मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिवेशनातून नव्या राजकीय समीकरणांना सुरूवात होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेतील नाराज आणि आपल्या पक्षातून निवडणुकीच्या काळात बोहर गेलेल्यांसाठी मनसेने पायघड्या अंथरल्याचे चित्र आहे.

जाणून घ्या - नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या बाराव्या पिढीत सध्या कोण काय करतेय, वाचा... 

हर्षवर्धन जाधव, सुहास दाशरथे मनसेच्या गळाला

औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव, सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे हे दोन मोठे मासे मनसेच्या गळाला लागले आहेत. एप्रिलमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुका पाहता राज ठाकरे यांनी या दोघांनाही हिरवा कंदील दाखवल्याचे बोलले जाते. या शिवाय शिवसेनेचे काही विद्यमान नगरसेवक देखील मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 
जाणून घ्या - आंतरराष्ट्रीय गाजलेले चित्रपट पाहायचेत? चला औरंगाबादला! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex Mns Activists Came Back