आंतरराज्यीय पूल बनणार 'बर्ड फ्लू'चे राजमार्ग, तेलंगणातून बिनधास्त वाहतूक

संतोष मद्दीवार
Saturday, 16 January 2021

दक्षिण गडचिरोली भागात तेलंगणाला जोडणारे सिरोंचा येथे चेन्नूर मार्गावर प्राणहिता नदीवर, सिरोंचा-कालेश्‍वर मार्गावर गोदावरी नदीवर आणि अहेरी जवळील वांगेपल्ली येथे प्राणहिता नदीवर एक असे तीन आंतरराज्यीय पूल आहेत.

अहेरी (जि. गडचिरोली) : कोरोना सोबतच आता देशात 'बर्ड फ्लू'चे संकट आले आहे. दक्षिण गडचिरोलीत तीन आंतरराज्यीय पूल आहेत. लगतच्या तेलंगणा राज्यात मोठे पोल्ट्री उद्योग असल्याने या पुलांद्वारे गडचिरोली जिल्ह्यात आणि पर्यायाने महाराष्ट्रात 'बर्ड फ्लू'चा फैलाव होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

हेही वाचा - महिलांनो! यंदा वाणाचे ट्रेंड बदलले, हळदी-कुंकू लावताना स्पर्श टाळण्यासाठी हटके ट्रिक्स

सर्वत्र कोरोनाचे संकट सुरू असतानाच आता बर्ड फ्लूची समस्या उभी ठाकली आहे. दक्षिण भारतात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळला आहे. त्यामुळे सर्वत्र सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. कुक्‍कुट पालन उद्योग या रोगाचा फैलाव होण्यास महत्त्वाचे कारण होऊ शकते. त्यामुळे त्यावर तेलंगणा सरकारचे विशेष लक्ष आहे. अहेरी उपविभागातील मांस विक्री केंद्रात बहुतांश माल हा तेलंगणातूनच येतो. तेलंगणा हे कुक्‍कुटपालन उद्योगाचे मोठे केंद्र आहे. केवळ विदर्भच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगड या राज्यातही तेलंगणातून कोंबड्या जातात. 

हेही वाचा - तिनं बोलवलं अन् नातेवाईकांनी चोपलं; विवाहितेशी चॅटिंग आलं युवकाच्या अंगाशी 

दक्षिण गडचिरोली भागात तेलंगणाला जोडणारे सिरोंचा येथे चेन्नूर मार्गावर प्राणहिता नदीवर, सिरोंचा-कालेश्‍वर मार्गावर गोदावरी नदीवर आणि अहेरी जवळील वांगेपल्ली येथे प्राणहिता नदीवर एक असे तीन आंतरराज्यीय पूल आहेत. या तीनही पुलांवरून नियमित मालवाहतूक सुरू आहे. कोरोना काळात काही कालावधीसाठी वाहतूक मर्यादित होती. त्यावेळेससुद्धा विदर्भापेक्षा तेलंगणात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होता. आंतरराज्यीय वाहतुकीवरचे निर्बंध उठवताच या परिसरात कोरोनाचा वेगाने प्रसार झाला. सध्याच्या परिस्थितीत पुलावरून होणाऱ्या वाहतुकीवर प्रशासनाची देखरेख असल्याचे दिसून येत नाही. 

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : ...अन् अंकिताच्या आईला रडू कोसळले; भावूक झाल्याने १५ मिनिटे कामकाज थांबले

इंद्रावती नदीवरील छत्तीसगड राज्याला जोडणारा पातागुडम पूल, असे एकूण चार आंतरराज्यीय पूल आहेत. पण, खरा धोका तेलंगणाला जोडणाऱ्या पुलांपासूनच आहे. आता बर्ड फ्लूने डोके वर केल्याने प्रशासनाने वेळीच जागरूक होऊन कारणीभूत ठरणाऱ्या या पुलांवरील वाहतुकींवर तत्काळ निर्बंध घालण्यात यावे, अशी मागणी होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: inter state bridge may dangerous for bird flu in aheri of gadchiroli