भयंकर घटना...बलात्कार प्रकरणातील संशयिताची डोंगरावरून उडी मारत लाईव्ह आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 August 2020

तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील मुख्य संशयिताने तीसगाव शिवारातील खवड्या डोंगरावरुन उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

वाळूज (बातमीदार) - औरंगाबाद जिल्ह्यातील शरणापूर परिसरातील भांगसी गडावर दोन दिवसांपूर्वी २० वर्षीय तरुणीवर बलात्काराची खळबळजनक घटना घडली होती. यातील संशयित आरोपीने तीसगाव येथील खवड्या डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. सहा) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. त्याचे नाव राऊसाहेब भाऊसाहेब माळी (वय ३१, रा. तीसगाव परिसर) असे आहे. दरम्यान, आत्महत्येच्या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे.

​हेही वाचा- जेव्हा वकीलच होतो आरोपी....अन् न्यायाधीशांसमोर... 

तरुणीवर झाला होता बलात्कार
शहरातील २० वर्षीय तरुणी मित्रासमवेत मंगळवारी (ता.चार) भांगसी गडावर फिरण्यासाठी आली होती. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास तरुणी व तिचा मित्र हे दोघे गडाच्या बाजूला गप्पा मारत बसले असताना दोन अनोळखी तरुण त्या ठिकाणी आले. त्यांनी गप्पांमध्ये दंग असलेली तरुणी व तिच्या मित्राला मारहाण करून तरुणीला उचलून घेऊन नेले. यातील एका आरोपीने त्या तरुणीला खोल खड्ड्यात नेऊन बलात्कार केला. तर आरोपीचा साथीदार हा खड्ड्याच्या वर पहारा देत बसला होता. त्या तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपीने या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास ठार मारून टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर दोन्ही संशयित आरोपी घटनास्थळावरून फरारी झाले होते. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

दौलताबाद पोलिसात गुन्हा
या घटनेनंतर पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून फरारी झालेल्या दोन्ही संशयित आरोपींविरुद्ध दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीचा साथीदार राजू माळी याला बुधवारी (ता. पाच) ताब्यात घेतले परंतु रात्रीच्या सुमारास लघुशंकेचा बहाणा करून राजू माळी हा दौलताबाद पोलिस ठाण्यातून फरारी झाला होता. विशेष म्हणजे, बलात्कार प्रकरणातील दोन्ही संशयित आरोपी राजू व राऊसाहेब हे भाऊ आहेत. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

डोंगरावरून लाईव्ह उडी 
बलात्कार प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी राऊसाहेब भाऊसाहेब माळी (३०, रा. तीसगाव परिसर) हा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरारी झाला होता. त्याचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी त्याचे वडील भाऊसाहेब माळी यांना ताब्यात घेतले होते. गुरुवारी गुन्हे शाखेचे पथक आरोपीच्या शोधासाठी तीसगाव परिसरात आले असता पोलिस आल्याची कुणकुण लागताच आरोपी राऊसाहेब हा अटकेच्या भीतीमुळे घटनास्थळावरून फरारी झाला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास तो तीसगावच्या खवड्या डोंगरावर आला. तेथून त्याने उडी मारून आत्महत्या केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा प्रकार लक्षात येताच सहायक पोलिस आयुक्त गुणाजी सावंत, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड, एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत, दौलताबादच्या निरीक्षक राजश्री आडे आदींनी घटनास्थळ गाठले. गंभीर जखमी राऊसाहेब यास बेशुद्धावस्थेत उपचारार्थ घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. 

संपादन ः प्रवीण मुके
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Live suicide of a rape suspect jumping off a mountain