esakal | Look Back 2020: नव्या वर्षाने तरी भराव्या जखमा मनातल्या... 
sakal

बोलून बातमी शोधा

2020

चिंता, तणाव, दुःख, संकटांनी भरलेल्या २०२० वर्षाच्या कटू आठवणीच राहतील स्मरणात 

Look Back 2020: नव्या वर्षाने तरी भराव्या जखमा मनातल्या... 

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद: Look Back 2020: मानसिक ताणतणाव, चिंता, दुःख, वेदनांनी भरलेले २०२० हे वर्ष अनेकांच्या स्मरणात राहील पण कटू आठवणी ठेऊनच. कोरोनाच्या संकटामुळे जगण्यासाठीच नव्हे, तर फक्त जिवंत राहण्यासाठीचा संघर्ष, लॉकडाऊनमुळे सर्व काही ठप्प असताना सर्वांच्या वाट्याला आलेला आर्थिक संघर्ष, जीवनावश्‍यक वस्तूंसाठी धावपळ, कोरोना रुग्णांनी हॉऊसफुल्ल झालेली रुग्णालये, ऑक्सिजन बेडसाठी विनवण्या करणारे नातेवाईक, हजारो, शेकडो किलोमीटर आपल्या घराकडे पायी जाणाऱ्या कामगार कष्टकरी, अशा अनेक वेदना २०२० ने दिल्या.

चांगल्यापेक्षा अनेक वाईट गोष्टी कोरोनामुळे सर्वांच्या वाट्याला आल्या. शहर जिल्हावासीयही यातून सुटले नाहीत. ३० डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात ४५ हजार ५४४ जणांना कोरोनाची लागण झाली तर तब्बल १२०० जणांनी जीव गमावला. शिवाय वर्षभरातील सर्व सण, उत्सव, यात्रा, जत्रांच्या आनंदावरही विरजण पडले. आता नव्या वर्षाने तरी या खोलवर गेलेल्या जखमा भरून काढाव्यात, अशी आशा सर्वचजण करीत आहेत. 

नुसता धुरळा! अकरावीतील मुलाने आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल

लॉकडाऊन आणि रस्त्यावर मजूर-

केंद्र सरकाकडून २४ मार्चरोजी रात्री देशभर लॉकडाऊन जाहीर झाले. २१ दिवसांच्या लॉकडाऊन काळात सर्वच जण आहे त्या ठिकाणीच अडकले. पहिल्या लॉकडाऊनमध्ये जमा असलेले पैसे खर्च करुन दिवस काढले. मात्र, जेव्हा १५ एप्रिल ते ३ मेदरम्यान दुसरा १९ दिवसांचा लॉकडाऊन जेव्हा जाहीर झाला, तेव्हा कामगार आपल्या गावाकडे जाण्यासाठी पायीच निघाले. औरंगाबाद शहरातील मुख्य रस्त्यावरुंन कामगारांचे जत्थेच्या जत्थे शेकडो, हजारो किलोमीटरची पायपीट करत गेले. औरंगाबादच्या वाळुज, शेंद्रा, चिकलठाणा, चितेगाव एमआयडीसी तसेच बांधकाम कामगार, कष्टकरी आपल्या गावाकडे गेले. नंतर १४ दिवसांचा तिसरा लॉकडाऊन जाहीर झाला तर त्यानंतर १८ ते ३१ मेदरम्यान चौथा लॉकडाऊन लागू झाला. तब्बल तीन महिने लॉकडाऊन असल्याने शहरासह जिल्ह्यातील सर्व काही ठप्प राहिले. या दरम्यानच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींची पगार कपात झाली तर अनेकांना नाईलाजाने आपले व्यवसाय, दुकाने कायमची बंद करावी लागली. 

१६ मजुरांना रेल्वेने चिरडले -

तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये देशाला हादवणारी घटना औरंगाबादच्या करमाडजवळ घडली. जालना येथील कंपनीत काम करणारे कामगार पायी चालत निघाले होते. ८ मेरोजी रात्री रेल्वे पटरीवर झोपलेले असतांना १६ मजुरांना रेल्वेने चिरडले. घटनेचे पडसाद देशभर उमटले तसेच कामगारांना त्यांच्या गावी जाण्यासाठी गाड्यांची व्यवस्था करण्याची मागणी पुढे आली. यानंतर कामगारांसाठी विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्थाही करण्यात आली. 

जातपंचायतीच्या दंडावरून उस्मानाबाद जिल्ह्यात तरुणाचा खून; आईने केली तक्रार, संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

उद्योग, व्यवसाय बंदचा फटका -

शहरातील उद्योग, व्यवसाय लॉकडाऊन काळात तीन महिने पूर्णपणे बंद राहिले. त्यामुळे लाखो नागरिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व व्यवहार बंद असल्याने जीवनावश्‍यक वस्तूंसाठी औरंगाबादेत सगळ्यांना धावधाव करावी लागली. विशिष्ट वेळ खरेदीसाठी दिल्याने बाजारात कोरोनाला आमंत्रण देणारी गर्दी झाली. मात्र प्रशासनाला गर्दी कमी करण्यात अपयश आले. या अनलॉकमध्ये उद्योग, दुकाने, व्यवसाय सुरु झाले तरी त्यांचे न भरून निघणारे नुकसान झाले. 
 
शाळा, कॉलेज बंद-

कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात सर्व शाळा, महाविद्यालय बंद राहिले. त्यानंतर अनलॉकमध्ये शाळा सुरु करण्यात आल्या नाहीत. या दरम्यान ऑनलाईन शिक्षण पुढे आले. मोबाईलवर शिक्षण घेत असतांना पालक, विद्यार्थी यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यातच शाळांकडून शुल्क वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याने पालकांनी शाळांसमोर आंदोलनेही केली. या वर्षी शैक्षणिक सत्र पूर्णपणे कोलमडले. शिवाय स्पर्धा परिक्षांच्या तारखासुद्धा पुढे ढकलण्यात आल्या तर विद्यापीठाच्या परिक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. 

रस्त्यांच्या श्रेयावरून पेटला शिवसेना-भाजपमध्ये वाद, भाजप आमदाराने फोडले नारळ

कॉलनी, गावे राहिली बंद -

कोरोनाची भीती वाढल्याने शहरातील लोकांनी गावांकडे धाव घेतली. मात्र शहरातून आलेल्या लोकांना गावबंदी झाली तर काहींना क्वारंटाईन व्हावे लागले. काहींना माघारी पाठविण्यात आले. शहरातील अनेक गल्ल्या, कॉलनी पत्रे ठोकून बंद करण्यात आल्या. गावातील रस्ते दगड टाकून बंद करण्यात आले. गावाच्या वेशीबाहेर गस्त लावण्यात आली. गाव, गल्लीत बाहेरील व्यक्तीस प्रवेश बंदी झाली, असे अनेक प्रकार औरंगाबादकरांनी अनुभवले. 

कोविड सेंटर, हॉस्पीटल फुल्ल -

कोरोनाच्या काळात शहरात दररोज दोनशे ते तीनशे रुग्ण वाढत होते. राज्यात मुंबई, पुण्यानंतर सर्वात मोठे हॉटस्पॉट हे औरंगाबाद शहर होते. शहरातील घाटी रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच कोविड केअर सेंटर फुल झाले. यामध्ये ऑक्सीजन बेड, व्हेंटीलेटरसाठी धावधाव झाली तर काहींना जीव गमवावा लागला. शिवाय काही खासगी रुग्णालयांनी ओपीडी बंद ठेवल्याने, रुग्णास ॲडमीट करुन घेण्यास नकार दिल्याच्या घटनाही घडल्या. 

१ जूनपासून अनलॉकने दिलासा -

तीन महिने लॉकडाऊनच्या परिस्थितीतून जाणाऱ्या नागरिकांना अनलॉकने दिलासा दिला. टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरु झाले. वाहतूक सुरु झाली. मात्र, या काळातही भरुन न निघणारे नुकसान अनेकांना सहन करावे लागले. यात कष्टकरी, कामगार, गरीब वर्गाला मोठा फटका बसला. मात्र, त्यांच्या मदतीसाठी हजारो हातही पुढे आले. अनेक संस्था, व्यक्तींनी गरीबांना त्यांच्या परिने भरभरुन मदत केली. तर केंद्र सरकाच्या मोफत रेशनसाठी दुकानांसमोर रांगाच रांगा राहिल्या. याच अनलॉकच्या काळात मराठवाडा पदवीधरची निवडणूक झाली तर ग्रामपंचायत निवडणुकाही जाहिर झाल्या. 

‘पेट’चे वेळापत्रक जाहीर, नोंदणीसह परीक्षाही होणार ऑनलाइन
 
शेतकऱ्यांवर दुहेरी संकटात, बिबट्याचीही दहशत -
 
कोरोना, लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात असतांना या वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. अनेक ठिकाणी पिके वाहून गेली. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला. गंगापूर, कन्नड, सिल्लोड भागात जोरदार पावसामुळे शेतीसोबत मोठे आर्थिक नुकसान झाले. पैठण तालुक्यासह औरंगाबाद जिल्ह्यात बिबट्याची दहशत राहिली. पैठण येथे बिबट्याच्या हल्ल्यात पिता-पुत्राचा मृत्यू झाला. 
 
पाणीपुरवठा योजनेचे उद्‍घाटन, रस्ते मार्गी- 

महापालिकेची मुदत एप्रिलमध्ये संपली. मात्र कोरोनाच्या संकटात महापालिका निवडणूक पुढे ढकलण्यात आली. शिवाय प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यामुळे महापालिकेत आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्याकडे प्रशासक पदाची जबाबदारी आली. यानंतर १५२ कोटींच्या रस्त्यांची कामे सुरु झाली. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या १६८० कोटी रुपयांची जलवाहिनी, बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान, सफारी पार्कचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन झाले. नवीन व जुन्या शहराचा विकास आराखडा एकत्र करण्याचे आदेश शासनाने दिले. मात्र या दरम्यान महापालिकेची सर्व यंत्रणा कोविड मध्ये असल्याने मालमत्ता, पाणीपट्टी वसुली मात्र घटली. 

औरंगाबादमध्ये‘थर्टी फर्स्ट’साठी तगडा बंदोबस्त, कोरोना संसर्गाचे भान ठेवण्याचे आवाहन
 
समृद्धीने केले समृद्ध -
 
कोरोनाच्या काळात एकानंतर एक नकारात्मक गोष्टी घडत असतांना सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील समृद्धी वाघिणीने पाच बछड्यांना जन्म दिला ही आनंददायी घटना शहरात घडली. 
 
सण-उत्सव, यात्रा-जत्रा झाल्या रद्द -

कोरोनामुळे या वर्षातील सर्व महत्वाचे सण, उत्सव घरातच साधेपणाने साजरे करावे लागले. आषाढी, खुलताबाद उरुस, कर्णपुरा यात्रा, गणेशोत्सव, ईद-उल-फित्र, बकरी ईद साधेपणाने घरातच साजरी करावी लागली. शिवाय लॉकडाऊन आणि अनलॉकमध्ये सर्व देवस्थाने बंद राहिली. ती उघडावी यासाठी आंदोलनेही झाली.

(edited by- pramod sarawale)