८ डिसेंबरपासून मातोश्रीसमोर आमरण उपोषण : कोपर्डीतील पीडितेच्या आई वडीलांचा इशारा  

प्रकाश बनकर
Sunday, 29 November 2020

कोपर्डी येथील पीडितेच्या आई-वडीलांचा इशारा. औरंगाबादेतून निघणाऱ्या उपेक्षित मराठा मशाल जागृती यात्रेला कोरोना महामारीच्या सावटामुळे स्थगिती 

औरंगाबाद : मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती उठवण्यासह मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने काढली जाणारी उपेक्षित मराठा मशाल जागृती यात्रा तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न केल्यास येत्या ८ डिसेंबरपासून मातोश्रीवर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा कोपर्डी घटनेतील पीडितेच्या आई-वडिलांनी रविवारी (ता.२९) औरंगाबादेत दिला.
 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
उपेक्षित मराठा मशाल जागृती यात्रेविषयी रविवारी (ता.29) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. औरंगाबादेतील क्रांतीचौक ते मुंबईतील आझाद मैदानापर्यंत शनिवारी (ता.२८) मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने उपेक्षित मराठा मशाल जागृती यात्रा काढली जाणार होती. मात्र राज्यात सर्वत्र कोरोनाच्या संसर्गामुळे जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. या कारणामुळे जिल्हाधिकार्‍यांसह शहर पोलीस व ग्रामीण पोलीस प्रशासनाने या यात्रेला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे ही यात्रा तूर्तास स्थगित केली आहे, अशी माहिती मुख्य समन्वयक रमेश केरे यांनी आज दिली. याप्रसंगी कोपर्डी घटनेतील पीडितेचे आई-वडिल देखील उपस्थित होते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पीडितेच्या आईने सांगितले की, चार वर्ष उलटली तरी अद्याप माझ्या मुलीला न्याय मिळालेला नाही. तसेच मराठा आरक्षणासह मराठा समाजाच्या विविध मागण्याही राज्य सरकारने पूर्ण केलेल्या नाहीत. राजकारण बाजूला ठेवून मराठा समाजाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण कराव्यात. यासाठी आम्ही मुंबईत ८ डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत. त्यांनी भेट नाकारली तर ८ तारखेपासूनच मुंबईत मातोश्रीवर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोपर्डीतून राज्यव्यापी आंदोलनाची तयारी 
शांततेच्या मार्गाने ही यात्रा काढली जाणार आहे. करीता प्रशासनाकडून परवानगी मिळवण्यासाठी आम्ही आणखी चार दिवस वाट पाहणार आहोत. नसता आठ तारखेला कोणत्याही स्थितीत आम्ही मुंबईला जाणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांवर ठोस पाऊ उचलले नाही. तर ८ डिसेंबरपासून आमरण उपोषण केले जाईल. तसेच कोपर्डी येथे मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक बोलावून तीव्र आंदोलनासाठी पाऊले उचलली जातील, असा इशारा केरे यांनी दिला. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha warns indefinite fast front of Matoshri from December 8