पोलिस ठाण्यात पार पडला आगळा-वेगळा विवाह सोहळा, एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे आले एकत्र

Marriage
Marriage

औरंगाबाद  ः सुवर्णाचे (नाव बदलले) बीएचएमएसच्या अंतिम वर्षाचे शिक्षण सुरु. ‘सुरेंद्र’ (नाव बदलले) यानेही पदवी घेऊन व्यवसाय थाटला. दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम. मात्र दोघांच्या जाती वेगळ्या असल्याने अर्थात आंतरजातीय असल्याने सुवर्णाच्या घरच्यांचा विरोध. त्यामुळे सुवर्णा आणि सुरेंद्रने कोर्ट मॅरेज केले. मात्र हे सुवर्णाच्या पित्याला समजल्यानंतर त्यांनी तिचा विवाह नात्यात लावून देण्याची ठरवले. मात्र दोघांचे एकमेकांवर असलेल्या प्रेम आणि तिला पोलिस, सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या साथीमुळे सुवर्णाची थेट पोलिस ठाण्यातून मिठाई भरवत, हारतुरे घालून उत्साहात सासरी पाठवणी करण्यात आली.

पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात घडलेल्या या आनंददायी प्रसंगाने वऱ्हाडी ठरलेल्या पोलिस निरीक्षक, महिला पोलिस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्याही डोळ्यांत पाणी आले होते. औरंगाबाद शहरात राहणाऱ्या सुवर्णा आणि सुरेंद्र यांचे एकमेकांवर प्रेम होते. सुरेंद्रच्या घरी विरोध नव्हता. सुवर्णाने मात्र आपल्या घरच्यांचा विरोध लक्षात घेऊन जवळपास सात महिन्यांपूर्वी कोर्ट मॅरेज केला. मात्र या लग्नानंतरही सुवर्णा वडिलांकडेच राहत होती. याच आठवड्यात तिच्या घरी लग्नाची बोलणी सुरु होऊन विवाह जमविण्यासाठी पाहुणे येणार असल्याची बोलणी झाली. तेव्हा नाईलाजाने सुवर्णाने आपण कोर्ट मॅरेज केल्याचे घरी सांगितले. त्यानंतही तिच्या आईवडिलांनी तिचे नात्यात लग्न लावून देण्याचा आग्रह केला.

यावर हतबल झालेल्या सुवर्णाने विनवणी करुनही काहीच तोडगा निघत नसल्याने हाताची नस कापून घेतली. त्यानंतर तिने पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री तसेच बुधवारी सकाळी, दुपारी फोन केले आणि घडले प्रकरण सांगत आपणास आत्महत्येचे विचार मनात येत असल्याचे पोलिसांना सांगितले. सुरेंद्रनेही पोलिसांना याबद्दल कल्पना दिली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांनी एक टीम मुलीच्या घरी पाठवून मुलगी, तिचे आईवडील यांना आदराने पोलिस ठाण्यात घेऊन आले.

सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब हरबक, पोलिस निरीक्षक सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक विकास खटके यांच्यासह महिला पोलिस नंदा तिडके, जयमाला धुळे, हिंगे, नंदा गरड आदींनी मुलीच्या आईवडिल तसेच मुलगा- मुलगी यांचे समुपदेशन केले. विशेष म्हणजे मुलीच्या पित्याला पोलिस, सामाजिक कार्यकर्ते यांनी समजावून सांगितल्यानंतर त्यांनीही सहमती दर्शवत मुलीला आशीर्वाद दिला. मिठाईने सर्वांचे तोंड गोड करत उत्साहाने वधूला निरोप दिला, अन वधू थेट पोलिस ठाण्यातून सासरी रवाना झाली. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांच्या डोळे ओले झाले होते.
 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com