तुमची सत्ता असताना गोट्या खेळत होतात का : इम्तियाज जलील यांचा भाजपला सवाल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 January 2020

केंद्रात आणि राज्यात पाच वर्ष भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होतात का, असा सवाल करत भाजपचे उपोषण म्हणजे नौटंकी आहे, असे इम्तियाज म्हणाले. 

औरंगाबाद : मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढा, या मागणीसाठी भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी (ता. २७) औरंगाबादेत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. त्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी चांगलाच टोला लगावला आहे. 

केंद्रात आणि राज्यात पाच वर्ष भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होतात का, असा सवाल करत भाजपचे उपोषण म्हणजे नौटंकी आहे, असे इम्तियाज म्हणाले. 

वाचा - शेवटी भाजपचा तिढा सुटला

पंकजा मुंडे यांनी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासह अन्य दहा मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाला माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह मराठवाड्यातील भाजपचे आजी-माजी आमदार व पदाधिकारी उपस्थित होते .

क्लिक करा - या प्रश्नावरही प्रशासन गप्पच 

याबद्दल विचारले असता इम्तियाज जलील म्हणाले, की मी विरोधी पक्षाचा खासदार आहे म्हणून उपोषणावर टीका करतोय असे नाही. तर अनेक सर्वसामान्य नागरिक देखील भाजपला पाच वर्षात तुम्ही काय केले असा प्रश्न विचारत आहेत.

सत्तेत असताना काही करायचे नाही आणि सत्ता गेली की उपोषणासारखी नाटकं करायची, हा जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना तुम्हाला सगळं करणं शक्य होतं मग तेव्हा काय गोट्या खेळत होतात का, असा सवालही इम्तियाज यांनी भाजपला केला आहे.

हेही वाचा - विमानांना औरंगाबादेत धोका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MIM MP Imtiaz Jalil Trolled BJP Over Pankaja Munde Strike Aurangabad News