एकावेळी दुकानात फक्त पाच ग्राहकांना प्रवेश, औरंगाबाद महापालिकेचा निर्णय

माधव इतबारे
Thursday, 26 November 2020

औरंगाबाद महापालिकेचा निर्णय :  मास्क नसल्यास होणार कारवाई 

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची भीती व सध्या वाढत असलेली रुग्ण संख्या यामुळे महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. मंगल कार्यालयामध्ये फक्त ५० जणांना प्रवेश द्यावा, दुकानात मास्कविना ग्राहक आढळला तर आठ दिवस दुकान सील करण्यात येईल, असा इशारा महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी (ता. २४) दिला होता. आता दुकानांमध्ये एकावेळी आता फक्त पाच जणांना प्रवेश देण्यासंबंधी आदेश देण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी बुधवारी (ता. २५) सांगितले. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

प्रशासकांनी मंगळवारी मंगल कार्यालय चालकांनी बैठक घेतली. त्यात लग्न समारंभासह विविध कार्यक्रमासाठी ५० व्यक्तींनाच प्रवेश द्यावा, प्रवेश देताना सर्वांना मास्कची सक्ती करावी. विनामास्क वऱ्हाडी दिसला तर मंगल कार्यालय महिनाभरासाठी सील केले जाईल असा इशारा प्रशासकांनी दिला आहे. तसेच दुकानदारांनी विनामास्क ग्राहकाला साहित्य देऊ नये. दुकानात विनामास्क ग्राहक आढळल्यास दुकानाला सील लावण्यात येईल, असेही प्रशासकांनी बजावले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यात आता एकाचवेळी पाच ग्राहकांना दुकानामध्ये प्रवेश देण्यात यावा, मास्क न लावता दुकानामध्ये ग्राहक दिसून आले तर ग्राहकांना दंड करून पहिल्यावेळेस सात दिवसासाठी दुकान सील केले जाईल, त्यानंतरही दुकानात विनामास्क ग्राहक आढळून आल्यास १५ दिवसासाठी दुकानास सील ठोकले जाईल. थर्मलगन, ऑक्सीमिटर ठेवावे, सॅनिटायझरची व्यवस्था करावी, सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्यात यावे, या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी वॉर्ड कार्यालयांना देण्यात आली आहे. वॉर्ड कार्यालयांनी पथके स्थापन करून वेळोवेळी तपासणी करावी, असे आदेश प्रशासकांच्या स्वाक्षरीने काढण्यात आल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

चार राज्यांतील प्रवाशांवर लक्ष 
सध्या दिल्ली, गुजरात, गोवा, राजस्थान या चार राज्यात कोरोनाची लाट आहे. त्यामुळे या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याचे आदेश शासनाने दिली आहे. त्यानुसार रेल्वे व विमानाने येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या केल्या जात असल्याचे पाडळकर यांनी सांगितले. 

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only five customers entry shop one time