पीपीई किट घालून शेतकऱ्यांचे स्टेट बँकेसमोर अनोखे आंदोलन, गैरव्यवहाराची चौकशीची मागणी

प्रकाश बनकर
Tuesday, 22 December 2020

भारतीय स्टेट बँक, माजलगाव शाखेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे माजलगाव तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता.२२) अनोखे आंदोलन केले.

औरंगाबाद : भारतीय स्टेट बँक, माजलगाव शाखेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे माजलगाव तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता.२२) अनोखे आंदोलन केले. कोरोनाचे कारण सांगून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या बँक शाखेच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांनी पीपीई किट परिधान करून सिडको येथील स्टेट बँकेच्या प्रादेशिक कार्यालयासमोर आंदोलन केले. तुम्ही आता कोरोनाची भीती बाळगू नका, आम्ही पीपीई किट घालून आलोय, आमच्या व्यथा ऐकून न्याय द्या, असे साकडे आंदोलनकर्त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे घातले.

 

 

माजलगाव येथील एसबीआय शाखेत माफी मिळालेल्या सुमारे बाराशे लाभार्थी शेतकऱ्यांचे पीक कर्ज नाकारण्यात आले आहे. पीककर्ज कोणत्या कारणाने नाकारले याची माहिती देण्यात आली नाही. हे विचारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना कोरोनाचे कारण सांगून भेटण्यास टाळाटाळ करण्यात येते. बँकेच्या गेटसमोर शेतकऱ्यांना ताटकळत उभे राहवे लागते. शेतकऱ्यांबरोबरच पेन्शनधारक वयोवृद्धांची हेळसांड बँकेतील अधिकारी, कर्मचारी करतात. गुराळासाठी कर्ज मंजूर झालेले परंतु बँकेची पॉलिसी न घेतल्यामुळे वर्षभरापासून कर्ज देण्यात आलेले नाही. कर्जाची कामे दलालांमार्फत केल्यास त्यांची फाईल त्वरित मान्य करण्यात येते.

 

 
 

बँकेच्या शाखाधिकाऱ्यांना यासंदर्भात भेट घेण्याचा प्रयत्न केल्यास कोरोनाचे कारण पुढे करून ते भेट घेण्यास चार-पाच महिन्यांपासून टाळाटाळ करत आहेत. या व्यथा मांडण्यासाठी शेतकऱ्यांनी सिडको येथील बँकेच्या प्रादेशिक कार्यालयासमोर आंदोलन केले. पीपीई किट परिधान करून शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. बँकेचे कारभार, शाखाधिकारी आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करावी, एसबीआयने माजलगाव तालुक्यात नवीन स्वतंत्र कृषी शाखा सुरू करावी. यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

 

 

भाजपचे माजलगाव तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात बबन सोळुंके, ज्ञानेश्वर मेंढके, डॉ.भागवत सरवदे, बबनराव सिरसाट, कल्याणराव शेप, राधाकिशन सरवदे, नामदेव मुळे, अनंतराव जगताप, ईश्वरअप्पा खुर्पे, डॉ. अशोक तिडके, ज्ञानेश्वर सरवदे, अनंत शेंडगे, दत्तात्रय साडेगावकर, रमेशराव कुटे, सतीश राठोड यांच्यासह शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. दरम्यान, माजी महापौर बापू घडामोडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांनी भेट घेऊन मागण्यांच्या अनुषंगाने चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PPE Kit Equipped Farmers Agitation Before State Bank Aurangabad