सिल्लोड : बोगस बियाणे, कीटकनाशके उत्पादन करणाऱ्या कंपनीवर छापा, इतक्या लाखांचा माल केला जप्त  

krushi.jpg
krushi.jpg

सिल्लोड (औरंगाबाद ) : भवन (ता.सिल्लोड) येथे सोयाबीनचे बोगस बियाणे व किटकनाशक उत्पादित करणारी कंपनी उघडकीस आली आहे. सोयाबीन बियाणे उगविले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता.०७) रोजी सिल्लोड तालुक्यातील भवन येथे छापा टाकून सोयाबीन बियाणे व किटकनाशके उत्पादन करणारी बोगस कंपनी उघडकीस आणली.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
बेंबळेचीवाडी (ता.औरंगाबाद) येथील शेतकरी प्रल्हाद मोतीराम बहुरे यांनी सोयाबीन बियाणे खरेदी केले. त्यांनी मे. किसान अॅग्री टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, गट नंबर १५, बाळापुर फाटा, बीड बायपास औरंगाबाद असा सोयाबीन बियाणे बॅगवर पत्ता छापलेल्या व मे. किसान अॅग्री टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, गट नंबर २२, माणिक नगर भवन तालुका सिल्लोड या ठिकाणावरून पावती क्रमांक ०१२३ दिनांक १०/ ६ /२०२० नुसार सोयाबीन के २२८ या वाणाच्या लॉट क्रमांक ००७७ च्या दोन बॅग खरेदी केल्या होत्या.

परंतू या दोन्ही बॅगमधील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी औरंगाबाद पंचायत समिती या ठिकाणी केली होती. तेथील कृषी अधिकाऱ्यांच्या पाहणीमध्ये मे. किसान ॲग्री टेक्नॉलॉजी प्रा. ली.नावाची कंपनी बीड बायपास येथे अस्तित्वात नसल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांना माहिती दिली. सदरील बियाणे पावतीवरील व बॅगवरील ऊत्पादकाचा पत्ता भवन तालुका सिल्लोड येथील असल्याचे आढळुन आल्याने श्री. गंजेवार यांनी पंचायत समिती सिल्लोडचे गुणनियंत्रण निरीक्षक तथा कृषी अधिकारी संजय व्यास यांना तपास करण्याचे आदेश दिले. 

मंगळवारी रोजी श्री. व्यास यांनी विभागीय स्तरावरील भरारी पथकाचे प्रशांत पवार (तंत्र अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय) संजय हिवाळे (मोहिम अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद) दिपक गवळी (तालुका कृषी अधिकारी सिल्लोड), श्री.पाडळे (मंडळ कृषी अधिकारी), शैलेश सरसमकर, विश्वास बनसोडे (विस्तार अधिकारी कृषी), कृषी सहाय्यक श्री. कस्तुरकर यांचेसह भवन येथील तसवर बेग मिर्झा बेग यांचे दुकान व व्यवसाय घर क्रमांक २२ भवन (ता.सिल्लोड) या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजता छापा टाकला.

पथकास या ठिकाणी १०७ बॅग सोयाबीन बियाणे आढळून आले. ज्याची एकूण किंमत ३,९७,५००/- रुपये आहे तसेच या ठिकाणी बियाणे पॅकिंग करण्यासाठी लागणाऱ्या पॅकिंग बॅग, पायाभूत व सत्यतादर्शक  बियाण्याचे बनावट टॅग, बिल बुक, पावती पुस्तके, वजन काटा या वस्तू आढळून आल्या. तसेच या ठिकाणी संबंधित व्यक्ती मे. किसान अग्री टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाने बनावट, विना परवाना बियाणे ऊत्पादन व विक्री करणा-या बनावट कंपनी बरोबरच बनावट किटकनाशकाची ऊत्पादन, वितरण व विक्री अवैधरित्या करीत असल्याचे दिसून आले. येथून ७ हजार २६८ रुपये किमतीचे बनावट कीटकनाशके, कीटकनाशकाचे लेबल, कीटकनाशके बनवण्यासाठी लागणारी सामग्री, इत्यादी साहित्य जप्त केले.

याप्रकरणी पोलीस स्टेशन सिल्लोड (ग्रामीण) येथे बुधवार (ता.०८) रोजी विविध कलमांनुसार तसवर बेग मिर्झा बेग (वय.३२) यांचेसह बोगस कंपनीच्या नावे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद डी. एल. जाधव यांचे आदेशानुसार डॉ. तुकाराम मोटे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com