esakal | दख्खनच्या ताज महालासमोरील रस्ता वादाच्या भोवऱ्यात; भारतीय पुरातत्व विभाग, लोकप्रतिनिधी आमने-सामने
sakal

बोलून बातमी शोधा

Bibi Ka Maqbara

भारतीय पुरातत्व विभागाने त्यांची जागा असल्याचे सांगत आक्षेप घेतला आहे. तसेच माजी नगरसेवक अफसर खान यांनी जागेवर दावा सांगितला आहे.

दख्खनच्या ताज महालासमोरील रस्ता वादाच्या भोवऱ्यात; भारतीय पुरातत्व विभाग, लोकप्रतिनिधी आमने-सामने

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : दख्खनचा ताज म्हणून ओळख असलेल्या बिबी का मकबराच्या तिकिट खिडकीच्या मागील बाजूस असलेल्या मिस्तरी कब्रस्तानात जाण्यासाठी रस्ता बनवण्यात येणार आहे. मात्र, याला भारतीय पुरातत्व विभागाने त्यांची जागा असल्याचे सांगत आक्षेप घेतला आहे. तसेच माजी नगरसेवक अफसर खान यांनी जागेवर दावा सांगितला आहे. तर वक्फ बोर्डाच्या ग्रेव्हयार्ड समितीने हा रस्ता नको असल्याचे सांगितले आहेत. यात बुधवारी (ता.१३) अफसर खान, भारतीय पुरातत्व विभागाचे अधिक्षक मिलनकुमार चावले यांनी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या मध्यस्तीने त्या जागेची पाहणी केली.

दोन्ही बाजूंचे म्हणणे एकून घेत यावर महसूल व नगरविकास विभागाशी चर्चा करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. यामुळे या पाहणीदरम्यान गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मकबऱ्याच्या समोर ही जागा आहे. मकबरा बनवण्यासाठी जे कारागीर होते, त्याच बरोबर त्या काळातील राजघराण्यातील कुटुंबासाठी हे कब्रस्तान तयार केल्याचे या कब्रस्तानाची काळजी घेणाऱ्या कमिटीचे लोक सांगतात. सध्या ही जागा पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. या कब्रस्तानात दफन विधीसाठी व दर्ग्यात जाणाऱ्या लोकांना त्रास होत असल्यानेच रस्ता बनविण्यात येत असल्याचे लोकप्रतिनिधींतर्फे सांगण्यात आले. ही जागा पुरातत्व खात्याची असून या भागात पर्यटकांच्या सोईसाठी कंपाऊडवॉलचे काम सुरु करायचे आहे.

हे कब्रस्तान पुरातत्व खात्याचा भाग असून नवीन पिढीला त्याचे महत्व कळावे, यासाठी ते सुरक्षीत करण्यात येणार असल्याचे पुरातत्व विभागाचे अधिकारी सांगतात. याच रस्त्याच्या जागेबाबत पुरातत्व विभागाने आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याशी पत्रव्यवहार केला होती. त्यानुसार आज दुपारी आमदार जैस्वाल, एएसआयचे अधीक्षक मिलनकुमार चावले, माजी नगरसेवक अफसर खान, ग्रेव्हयार्ड कमिटीचे सदस्य, वक्फ बोर्डचे अधिकारी आले होत. दोन्ही बाजूंतर्फे कागदपत्रे व नकाशे दाखविण्यात आले. दोन तास चर्चा होऊनही तोडगा निघाला नाही. जागेची मोजणी करून पुढील निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर काही आक्षेप आल्यास दोन्ही पक्षकारांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा असा सल्लाही आमदार जैस्वाल यांनी दिला.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा


मकबरा ही राष्‍ट्रीय संपत्ती आहे. ती टिकणे, त्याचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोचणे गरजेचा आहे. हे टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. स्थानिक लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून येथे पर्यटनवाढीसाठी तसेच पर्यटनस्थळाच्या विकास करणे हे आमचे ध्येय आहे. यातच मकबऱ्याच्या जागेतील कब्रस्तान परिसरातून रस्ता काढण्याचा प्रयत्न होत आहे. नियमानुसार पुरातत्व विभागाच्या जागेत कुठला बदल करता येत नाही. नकाशा व गॅझेटमध्ये ही जागा पुरातत्व विभागाची असल्याची नोंद आहे.
-मिलनकुमार चावले, अधीक्षक, पुरातत्व विभाग


मिस्तरी कब्रस्तानातील रस्त्याची जागा पुरातत्व विभागाची नाही. मृतदेह घेऊन जाताना लोकांना अडचण येत असल्यामुळे रस्ता बनवित आहोत. यासाठी निधीही मंजूर केला आहे. या जागेचा पन्नास वर्ष जुना नकाशा आमच्याकडे आहे. पुरातत्व विभागाचे अधिकारी दिशाभूल करीत आहे. हे काम लोकांच्या हिताचे असल्याने हे सहन करणार नाही.
-अफसर खान, माजी नगरसेवक

संपादन - गणेश पिटेकर