शिर्डीतून बेपत्ता होणाऱ्य़ा लोकांच्या शोधासाठी विशेष पथक नेमा, खंडपीठाचे पोलिस महासंचालकांना आदेश.  

अनिलकुमार जमधडे
Saturday, 7 November 2020

मानवी तस्करी किंवा मानवी अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत काय, यासंदर्भातही तपास करावा, असे आदेशात म्हटले आहे. याचिकेवर २४ नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

औरंगाबाद : शिर्डीतून बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमून योग्य ती पावले उचलावीत, असा आदेश न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे आणि न्यायमूर्ती बी. यू. देबडवार यांनी पोलिस महासंचालकांना दिला आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

यामध्ये मानवी तस्करी किंवा मानवी अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत काय, यासंदर्भातही तपास करावा, असे आदेशात म्हटले आहे. याचिकेवर २४ नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. या संदर्भात इंदूर येथील रहिवासी मनोजकुमार सोनी यांनी त्यांची पत्नी शिर्डीतून बेपत्ता झाल्यासंदर्भात खंडपीठात हेबियस कॉर्पस याचिका सादर केली आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

इंदूर येथील रहिवासी मनोजकुमार सोनी यांनी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात हेबियस कॉर्पस याचिका सादर केली आहे. याचिकेनुसार, ऑगस्ट २०१७ मध्ये ते पत्नी आणि दोन मुलांसह शिर्डी येथे दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर प्रसादालयापासून त्यांची पत्नी बेपता झाली. बराच शोध घेतल्यानंतर त्यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. पत्नीच्या तपासाबाबत त्यांनी पोलिसांकडे वारंवार पाठपुरावा, चौकशी केली; परंतु त्यांना दाद देण्यात आली नाही.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रसादालयाजवळचे सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळले. त्यांनी माहितीच्या अधिकारात शिर्डीतून अशा प्रकारे बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती मागविली असता, जानेवारी ते ऑक्टोबर २०१७ या कालावधीतच ३० पेक्षा जास्त व्यक्ती बेपत्ता असल्याचे आढळले. यासंदर्भात खंडपीठात वेळोवेळी झालेल्या सुनावणीत नगर येथील पोलिस अधीक्षकांना पाचारण करण्यात येऊन यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार अधीक्षकांनी खंडपीठात अहवाल सादर केला. मात्र तो अहवाल समाधानकारक नसल्याचे मत व्यक्त करीत खंडपीठाने पोलिस महासंचालकांना वरील आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. सुशांत दीक्षित तर राज्य शासनातर्फे अ‍ॅड. के. एस. पाटील काम पाहत आहेत. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special team appointed to search for missing persons Shirdi high court news